Thursday, September 19, 2024
Homeराजकीयमहायुतीत मिठाचा खडा? भुजबळांच्या 'त्या' विधानावरून सेना-भाजप नेत्यांमध्ये नाराजी

महायुतीत मिठाचा खडा? भुजबळांच्या ‘त्या’ विधानावरून सेना-भाजप नेत्यांमध्ये नाराजी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून सात पैकी सहा टप्प्यातील मतदान (Polling) पार पडले आहे. सातव्या टप्प्यातील मतदान शनिवार (दि.०१ जून) रोजी होणार आहे. त्यानंतर मंगळवार (दि. ४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची (Ajit Pawar Group) मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीत (Mahayuti) अजित पवार गटाला विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिला असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर महायुतीतील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, लोकसभेचे जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपाबाबत काही मागणी असेल, तर ती मीडियाच्या माध्यमातून कधीही होत नाही. यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही मत असेल किंवा इतरांचे मत असेल, त्यावर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मीडियाच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्यात, असे म्हणणे गैर आहे. यामध्ये तुम्हाला कोणी आश्वस्थ केले, याचा कोणताही पुरावा नसतो, तरीही सांगायचे असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्यांने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचे धुके निर्माण करण्यात काहीही कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

तर संजय शिरसाट म्हणाले की, भुजबळांना अशा प्रकारची विधाने करून महायुतीमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. जागावाटपाबाबत महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते निर्णय घेतील. युतीच्या अटी लक्षात ठेवा,बाहेर तुम्हाला असे विधान करून काय सिद्ध करायचे आहे. राष्ट्रवादीला जागावाटपासंदर्भात इतकी घाई का आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून ४ महिने बाकी आहे. त्यामुळे निवडणुका आल्या का बघू, या विषयावर आज बोलणे योग्य नाही. लोकसभेचे निकाल लागू द्या. एकत्र राहायचे असेल तर एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला पाहिजे, असे शिरसाट यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते की, “विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिन्ही पक्षाला जागा मिळतील. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्या बरोबरच्या दोन्ही पक्षाचा सन्मान केला जाईल”, असं फडणवीस म्हणाले होते.

छगन भुजबळांनी नेमकं काय म्हटलं होतं?

लोकसभेच्या निवडणूकीत आपण कमी जागा लढवल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला विधानसभेसाठी महायुतीत योग्य तो मानसन्मान मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा भाजपने आपल्याला विधानसभेला ८० ते ९० जागा मिळतील असं सांगितलं होतं. मात्र, लोकसभेला जी जागावाटपाबाबत खटपट झाली ती खटपट पाहाता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला विधानसभेला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजे. हे त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तरच ५० ते ६० आमदार निवडून येतील. अन्यथा तुमच्या ५० आहेत, मग ५० घ्या. मग त्यातून पुन्हा किती निवडून येणार? असं भुजबळ म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या