मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. अशातच भाजप गृहनिर्माण खाते सोडण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली आहे. गृहनिर्माण खात्यासाठी राष्ट्रवादीत छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यात कमालीची स्पर्धा आहे. मात्र, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना वारंवार गृहनिर्माण खात्याची आठवण करून द्यावी लागत आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होऊन चार महिने होत आले आहेत. सरकारमध्ये सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण १२ मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले. मात्र, भाजपने सध्या अजित पवार यांच्यासह ९ जणांना मंत्री केले आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे उर्वरित तीन आमदारांचा मंत्रिमंडळात लवकर समावेश करावा, असा लकडा राष्ट्रवादीने लावला आहे.
मात्र, सध्या सामाजिक आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण तापले असताना भाजप मंत्रिमंडळ विस्ताराच्या मनःस्थितीत नाही. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार लांबत चालला आहे. त्यामुळे मंत्रिपदाचे आश्वासन मिळालेल्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये खदखद सुरू आहे, असे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
मंत्रिमंडळात वित्त आणि नियोजन हे महत्वाचे खाते मिळाले असले तरी राष्ट्रवादीला पायाभूत सुविधांशी संबंधित महत्वाचे खाते हवे आहे. ऊर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती भाजपकडे आहेत. यापैकी गृहनिर्माण खाते देण्याचा शब्द भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस गृहनिर्माण खाते सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीत भाजपबद्दल नाराजी निर्माण झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडे गृहनिर्माण खाते येण्यापूर्वीच या खात्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.