अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
घराच्या बांधकामाच्या पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पती-पत्नीवर शेजार्यांनी हल्ला केला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणी मनेश बोरूडे (वय 28, रा. वकील कॉलनी, बुरूडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. संजय हजारे व त्याची पत्नी अनिता हजारे, संजय हजारेचा भाऊ व भावजई (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. वकील कॉलनी, नक्षत्र लॉन समोर, बुरूडगाव रस्ता) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
1 मार्च रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास, फिर्यादी राणी व त्यांचे पती मनेश बोरूडे हे घरी असताना, शेजारी राहणार्या संजय हजारे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या घराच्या भिंतीवरून येणारे पाणी राणी यांच्या रसवंतीसाठी ठेवलेल्या उसावर पडत होते, ज्यामुळे ऊस खराब होत होता. याबाबत राणी व मनेेशने संजय हजारे व त्यांच्या कुटुंबियांना पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र, त्यावरून त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या संशयित आरोपींनी राणी व मनेशला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संजयने मनेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी, अनिता हिने हातातील भाजी कापण्याच्या चाकूने राणीच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला, त्यामुळे त्या जखमी झाल्या. अधिक तपास पोलीस अंमलदार वाघमारे करत आहेत.