Friday, November 22, 2024
Homeक्राईमपाण्याच्या वादातून खून करणार्‍या आरोपीला जन्मठेप

पाण्याच्या वादातून खून करणार्‍या आरोपीला जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल || पाथर्डी तालुक्यातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून सहहिस्सेदाराचा खून केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीला दोषी धरीत जन्मठेप व 25 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला. भागवत उर्फ मिठू भगवान बडे (वय 28, रा. रामकृष्ण नगर, वडगाव, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. भागवत मारूती गर्जे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

21 डिसेंबर 2021 रोजी रामकृष्णनगर, वडगाव, येथील शेतकर्‍यांचे शेती पंपासाठीचे थ्री फेजचे वीज कनेक्शन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी वीज बिल न भरल्यामुळे बंद केले होते. 27 डिसेंबर 2021 रोजी तेथील शेतकर्‍यांनी वीज बिले भरल्यानंतर महावितरणच्या अधिकार्‍यांनी वीजपुरवठा जोडून दिला. 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री साडेबारा वाजता थ्री फेज विद्युतपुरवठा झाला. त्यामुळे परिसरातील सर्वच शेतकरी रात्री पाणी धरण्यासाठी शेतात गेले होते. मयत भागवत मारूती गर्जे हे देखील त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी आला होता. त्यांची व आरोपीची विहीर सामाईक होती. घटनेच्या पूर्वी देखील आरोपी व मयत यांच्यामध्ये सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद होते. फिर्यादी संजय विठ्ठल गर्जे देखील इतर शेतकर्‍यांप्रमाणेच त्यांचे शेतीला पाणी देण्यासाठी आले होते. 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री साडेबारा वाजता विद्युतपुरवठा चालू झाल्यानंतर फिर्यादी त्यांच्या शेतात पाणी देत होते.

लाईट आल्यानंतर थोड्या वेळाने फिर्यादी यांनी मयत व आरोपी यांच्यामध्ये बाचाबाचीचा आवाज ऐकला होता. त्यानंतर 15 मिनिटांनी फिर्यादीचे चुलते व मयताचे वडील फिर्यादीकडे आले. त्यांनी विचारले की, भागवत तुझ्याकडे आला का? त्यानंतर मयताचे वडील व फिर्यादी यांनी मयताचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर मयताचे वडील व फिर्यादी हे मयताच्या विहिरीवर आले. त्या ठिकाणी त्यांना मयताची रक्ताने माखलेली मफरल दिसली. त्यामुळे त्या दोघांनी जोरजोरात आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील इतर शेतकरी हे देखील विहिरीवर घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी रामदास भानुदास ढाकणे हे सदर विहिरीवर आले व त्यांनी सांगितले की, मी आरोपी भागवत व त्याचा आतेभाऊ परमेश्वर यांच्या फोनवरील बोलणे ऐकले आहे. त्यावेळी आरोपी भागवत हा परमेश्वर यास म्हणत होता की, मी आताच भागवत गर्जे यास ठार मारून त्यास विहिरीत ढकलून दिले आहे. त्यानंतर रामदास ढाकणे व मच्छिंद्र नागरगोजे यांनी विहिरीच्या पाण्यात उड्या मारून भागवत गर्जे यास बाहेर काढले. त्याला डोक्याला जबर मार होता. उपचारासाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.

याप्रकरणी संजय विठ्ठल गर्जे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांनी आरोपीला दोषी धरीत वरीलप्रमाणे शिक्षा केली. तर, मयताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा आदेशही केला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांना मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. योगेश सूर्यवंशी, अ‍ॅड. सचिन बडे, अ‍ॅड. संदीप शेंदूरकर यांनी सहकार्य केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या