अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागे गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय 55, रा. यश अपार्टमेंट, बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
रवींद्र चव्हाण हे सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात असताना दोन अज्ञात व्यक्तींसोबत गाडीचा कट लागण्यावरून त्यांचा वाद झाला, असे सांगितले जात आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले. रागाच्या भरात दोन्ही अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांच्यावर शस्त्राने हल्ला करून त्यांना भोसकले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तातडीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेचे वृत्त समजताच चव्हाण यांचे नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आणि जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.
मयताचा मुलगा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच आ. जगताप यांनी घटनास्थळी तसेच जिल्हा रूग्णालयात भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा रूग्णालयाच्या आवारात तत्काळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दोन्ही अज्ञात आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.




