अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेत जमिनीच्या वादातून महिलेला शिवीगाळ, मारहाण करून विळ्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शकुंतला भाऊसाहेब वामन (वय 55 रा. खंडाळा, ता. नगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सदरची घटना 5 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खंडाळा शिवारात घडली आहे.
दरम्यान, जखमी शकुंतला वामन यांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव वामन, अक्षय सुखदेव वामन, किरण सुखदेव वामन (सर्व रा. खंडाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात शेत जमिनीवरून वाद आहेत. 5 डिसेंबर रोजी फिर्यादी शेतात माती टाकत होत्या त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांना माती टाकण्यास विरोध केला. तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाल्या, आपल्या शेताच्या वाटण्या झालेल्या आहेत, तुमचा काही संबंध नाही.
संशयित आरोपींना त्यांचा राग आला. त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीच्या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तुटून पडून गहाळ झाले आहेत. त्याच वेळी अक्षय वामन याने त्याच्या हातातील विळ्याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर मारून जखमी केले. पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार काळे करत आहेत.