अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळ जवळ, माताजीनगर येथे एका युवकावर जुन्या वादातून चार जणांनी कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी (19 मे) सकाळी 6.45 वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी जमीर शौकत पठाण (वय 23, रा. मोरया पार्क, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना, अशिष शिरसाठ, चैतन्य सरोदे, प्रेम नायर उर्फ रावण व विशाल आडगळ (सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी त्यांना अडवून जुन्या वादातून शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर कोयत्याने दोन्ही पायांवर व हातावर वार करून जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या गुन्ह्यात संशयित आरोपींनी लाल रंगाची स्वीफ्ट कार वापरली होती. जखमी जमीर पठाण यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणार्या चौघा संशयितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पितळे करीत आहेत.
दरम्यान, एमआयडीसी परिसरात कोयता, तलवार या सारख्या धारदार शस्त्राने हल्ले केले जात आहे. व्यावसायिक, एमआयडीसी कामगार यांच्यावर वारंवार होणार्या हल्ल्यामुळे एमआयडीसीतील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन हल्ला करणार्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.