Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याबंडखोरांवर अपात्रतेची कारवाई अटळ

बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई अटळ

मुंबई । वृत्तसंस्था/प्रतिनिधी Mumbai

शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवरील (Shiv Sena’s rebel MLA’s) अपात्रतेच्या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांनी केवळ दोन तृतीयांश बहुमत दाखवल्याने त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही तर त्यांना कोणत्यातरी पक्षात विलीनच व्हावे लागेल. अन्यथा, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई (Disqualification action)अटळ आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant)आणि शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी केला. आता ही राजकीय लढाई राहिली नसून कायदेशीर लढाई सुरू झाल्याचेही सावंत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेने आता बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात शिवसेना भवनात नेत्यांची आज बैठक झाली. बैठकीला कायदेतज्ज्ञ देखील उपस्थित होते. बैठकीनंतर अरविंद सावंत आणि देवदत्त कामत यांनी माहिती दिली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी केवळ सभागृहातील वर्तनच ग्राह्य धरता येत नाही तर सभागृहाबाहेरील आमदारांचे वर्तनही ग्राह्य धरण्यात येते. देशात याआधी अशा घडलेल्या प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचेही त्यासंदर्भात निकाल आहेत. तसेच केवळ दोन तृतीयांश बहुमत दाखवून अपात्रतेची कारवाई टाळता येणार नाही. त्यासाठी त्यांना कोणत्या तरी पक्षात विलीन होणे हा एकमेव मार्ग आहे. 2003 सालापर्यंतच फक्त फुटीची परवानगी होती. मात्र नंतर घटनेच्या 10 व्या परिशिष्टात बदल करण्यात आले आहेत, असे सावंत म्हणाले.

उपाध्यक्षांविरोधात आणला गेलेला अविश्वास प्रस्ताव त्यांनी आमच्या माहितीनुसार फेटाळला आहे. कोणीतरी परस्पर कुरियरने पाठवलेला प्रस्ताव ग्राह्य धरता येत नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याचे आम्हाला समजते. उपाध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही हे बंडखोरांचे म्हणणेही चुकीचे आहे. अध्यक्ष नसताना उपाध्यक्षांना संपूर्ण अधिकार असतात. राज्यपालांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. आवश्यकता भासल्यास राज्यपाल मुख्यमंत्र्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देऊ शकतात, असेही सावंत आणि कामत यांनी सांगितले.

राऊत यांचे खुले आव्हान

जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता, पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांचे 22 लोक फुटले. त्यांनी राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले. जिंकून आले. त्यांनी सरकार बनवले. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही राजीनामे द्या. कितीही असू द्या. 54 असू द्या. राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझे खुले आव्हान आहे, असे राऊत म्हणाले. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार? अशा शब्दांत राऊत यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला फटकारले.

राज्यपालांचे आदेश

करोनामुक्त होऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवनात परतले आहेत. त्यानंतर ते लगेचच सक्रिय झाले आहेत. त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी, असे आदेश दिले आहेत. कोश्यारी पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या