Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकइच्छाशक्ती असल्यास यश हमखास - घैसास

इच्छाशक्ती असल्यास यश हमखास – घैसास

'देशदूत'च्या यशस्वी उद्योजक पुरस्कारांचे वितरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अडचणींमधून संधी शोधल्यास तुम्ही यशस्वी उद्योजक (Success Entrepreneur) बनतात तसेच उद्योग विश्वात दीर्घकाळ टिकायचे असेल तर बदलत्या काळासोबत स्वतःमध्ये बदल करायला हवेत. तुम्ही तुमच्यात कशाप्रकारे बदल करता यावर तुमचा विकास अवलंबून आहे. तसेच कल्पनाशक्ती व नवीन प्रयोग करण्याची इच्छाशक्ती असल्यास आपण आपल्या क्षेत्रात यशस्वी होतो, असे प्रतिपादन जेनकोवाल कंपनीचे अध्यक्ष दीपक घैसास यांनी केले. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्योजकांची लक्षवेधी उपस्थिती, पुरस्कार विजेत्या उद्योजकांना मिळणारी मनापासून दाद अशा उत्साही वातावरणात ‘देशदूत’ च्या (Deshdoot) ‘यशस्वी उद्योजक पुरस्कारा’चे वितरण आज (दि.२०) प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे पार पडले, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक घैसास बोलत होते.

- Advertisement -

‘देशदूत’ वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा यानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून पॉझिटिव्ह मीटरिंग पंप कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मुतालिक उपस्थित होते. विशेष उपस्थितांमध्ये दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड, नितीन ठाकरे, अशोका ग्रुपच्या वतीने जनसंपर्क अधिकारी सतीश आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना यशाचे शिखर गाठून आपल्या उद्योगाच्या कक्षा रुंदावणाऱ्या व त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या उद्योजकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. सोहळ्याचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स व सहप्रायोजक अशोका बिल्डकॉन यांचे मोलाचे योगदान कार्यक्रमास लाभले.

यावेळी घैसास म्हणाले, उद्योगात जेव्हा तुम्ही उच्च स्थानावर असता, तेव्हाच तुम्ही त्या उद्योगाला पर्यायी उद्योग शोधायला सुरुवात केली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर उद्योगात बदल न घडवणाऱ्या अनेक कंपन्या कालांतराने बंद पडतात किंवा दुसरी कंपनी त्यांना टेकओव्हर करते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास दीर्घकाळ आपला टिकाव लागू शकतो, असे पैसास म्हणाले. सकारात्मक दृष्टिकोन, नख्या गोष्टी करायला शिकणे, आपली गुणबत्ता टिकवून ठेवणे आणि कालानुरूप बदल हा पंचसूत्री मंत्र त्यांनी उद्योजकांना दिला. सुधीर मुतालिक म्हणाले, हा पुरस्कार मानाचा आहे. उद्योगांसाठी हा सुवर्णकाळ असून उद्योजकांना आज देण्यात आलेले पुरस्कार अगदी योग्य वेळी देण्यात आले आहे. सध्या उद्योजकांना मोठी संधी आहे कारण गेल्या १० वर्षांत भारतीय उत्पादने व एकूणच भारताची पत जगभरात मोठी वाढली आहे. नाशिक शहर घडवण्यात सारडा परिवाराचे मोठे योगदान असल्याचे मुतालिक यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘देशदूत’ कायमच चळवळीसोबत उभे राहिलेले दैनिक आहे. समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मागे उभे राहण्याचे काम ‘देशदूत’ नेहमी करतो. ‘देशदूत’ने आजपर्यंत विविध क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कार दिले आहेत. ललित बूब यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सहभागी स्पर्धकांमधून विजेते निवडणे तसे अवघड काम होते. सर्वच जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. मात्र, त्यातील काही अधिक सरस ठरलेल्या उद्योजकांची आम्ही निवड केली. पुरस्कारार्थीच्या वतीने विवेक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, पुरस्कार मिळणे ही केवळ कौतुकाची गोष्ट नसून, ती एक जबाबदारीची गोष्ट आहे. ज्यातून समाजाला व देशालादेखील एक नवी दिशा मिळू शकते. ‘देशदूत’ने घेतलेला हा पुढाकार खरोखर प्रशंसनीय असा आहे. यशस्वी उद्योजकता पुरस्कारासाठी विविध सहा उद्योग क्षेत्रातील कर्तृत्ववान उद्योजकांची निवड करण्यात आली.

या पुरस्कारांची निवड करण्यासाठी निवडलेल्या परीक्षक मंडळावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन मनीष कोठारी, सुला विनियार्डचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर, आयमा अध्यक्ष ललित बूब व एव्हिएशन उपसमितीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी चोख भूमिका बजावली. सूत्रसंचालन आरजे भूषण यांनी केले. आभार ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी मानले. यावेळी रमेश वैश्य, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे अध्यक्ष समीर कोठारे, योगेश जोशी, प्रकाश बारी, राजाराम कासार, रमेश पवार, ज्ञानेश्वर गोपाळे, निमचे अध्यक्ष धनंजय बेळे, निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, क्रेडाईचे सुनील कोतवाल, अंजन भलोदिया, विवेक गोगटे, शरद शहा, नरेंद्र बिरार, निशांत ठक्कर, सचिन अहिरराव, अशोक बंग, सुरेश पटेल, नावा अध्यक्ष प्रवीण चांडक, सचिन गीते, गणेश नाफडे, दीपक जगताप, शाम पवार, विठ्ठल रजोळे, अरविंद राठी, जयश्री राठी, मलबार गोल्ड अॅण्ड डायमंडचे रोहित सोनार, राजेश आदी उपस्थित होते.

पुरस्कारार्थी

एस.एम.ई. टू लार्ज उद्योग
१. दिलीप गिरासे – नीलय इंडस्ट्री
२. टाइम्स लाईफस्टाईल – सुमित तिवारी
ॲग्रो व फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री
१. फूडस् ॲण्ड इन-मिलन दलाल
२. सिमला फूड प्रॉडक्ट- राजाभाऊ नागरे
इमर्जिंग इंडस्ट्री
१. युनायटेड हिट ट्रान्सफर लिमिटेड- विवेक पाटील
२. गोल्डी प्रिसिजन – सिद्धेश रायकर
३. मेटाफोर्ज इंजि. – कौस्तुभ मेहता
वूमन एंटरप्रेनर्स
१. ॲसेंट टेक्नोक्रेट- सारिका दिवटे
२. जयश्री इंडस्ट्री – जयश्री कुलकर्णी
स्टार्टअप ॲण्ड इन्होवेशन
१. कॅटस् ग्लोबल- बिरेन शहा
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
१. नेटविन सॉफ्टवेअर – अरविंद महापात्रा
२. ॲल्युमिनस- रिषिकेश वाकतकर
३. पॉईंटस् मॅट्रिक्स- निरज बोरखाल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...