Wednesday, June 19, 2024
HomeनाशिकNashik-Dindori Constituency Election 2024 : मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Nashik-Dindori Constituency Election 2024 : मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नाशिक | Nashik

- Advertisement -

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (Loksabha Election) २०२४ साठी नाशिक जिल्ह्यात २० दिंडोरी व २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी मतदान झाले होते. त्यांनतर उद्या मंगळवार (दि. ४ जून) रोजी होणाऱ्या मतमोजणीची (Counting of Votes) प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी दिली आहे.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा म्हणाले की, २० दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी एकूण १ हजार ९२२ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. तर २१ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी १ हजार ९१० मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम, अंबड, नाशिक येथे सकाळी ८ वाजल्यापासून होणार आहे. त्यासाठी नियुक्त मतमोजणी कर्मचाऱ्यांची तीन वेळा सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली आहे. तसेच, मजमोजणीसाठी नियुक्त मनुष्यबळाचे तीन वेळा प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच, मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच शर्मा पुढे म्हणाले, दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबलवर अशा सहा मतदारसंघांसाठी एकाच वेळी एका लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ टेबलवर ईव्हीएमची मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई असे एकूण ४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे शर्मा म्हणाले, ईटीपीबीएमएस स्कॅनिंग आणि पोस्टल मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी १० टेबल असणार आहेत. तर पोस्टल मतमोजणीसाठी एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एक पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक अशा पाच मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २० दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १२२ दिंडोरी (अ. ज.) विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक २६ फेऱ्या तर २१ नाशिक लोकसभा मतदारसंघात १२५ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक ३० फेऱ्या होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

२० दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे

११३ नांदगाव -२४ फेऱ्या, ११७ कळवण (अ. ज.) – २५ फेऱ्या, ११८ चांदवड – २२ फेऱ्या, ११९ येवला – २३ फेऱ्या, १२१ निफाड – २० फेऱ्या आणि १२२ दिंडोरी (अ. ज.) – २६ फेऱ्या

२१ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे

१२० सिन्नर – २३ फेऱ्या, १२३ नाशिक पूर्व – २४ फेऱ्या, १२४ नाशिक मध्य – २२ फेऱ्या, १२५ नाशिक पश्चिम – ३० फेऱ्या, १२६ देवळाली (अ. जा.) – २० फेऱ्या आणि १२७ इगतपुरी – त्र्यंबक ( अ. ज.) – २१ फेऱ्या

- Advertisment -

ताज्या बातम्या