Monday, May 20, 2024
Homeनगरजिल्हा बँकेतील कारभाराची ईडी चौकशी केली तर अनेक भ्रष्टाचार बाहेर येतील -...

जिल्हा बँकेतील कारभाराची ईडी चौकशी केली तर अनेक भ्रष्टाचार बाहेर येतील – आ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

जिल्हा बँकेतील मनमानी कारभाराची ईडी चौकशी झाल्यास अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर पडतील. बँकेचे अध्यक्ष मनमानी कारभार करीत असून स्वतःच्या हव्यासापोटी 1 कोटी रुपयांच्या दोन वाहनांची खरेदी करण्यात आली. यासह अनेक कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करून सहकारात आशिया खंडात अग्रगण्य असलेल्या नगर जिल्हा बँकेला डबघाईत लोटण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका आ. प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. आ. तनपुरे म्हणाले, गतीमान शासनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पायदळी घेतले असून अनेक विकास कामांना स्थगिती दिली आहे. काही अधिकारी हे टक्केवारीसाठी कामे अडवित असल्याचे समजते. 2 हजार कोटींच्या एसीएफ योजनेबाबत मंत्रालयात प्रश्न उपस्थित केला. परंतु त्याबाबतही सध्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत आपणास घेणेदेणे नसल्याचे दाखवून दिले. परंतु एसीएफ मध्ये असलेल्या 2 हजार कोटी रुपये रक्कमेबाबत पाठपुरावा करीत ग्रामिण भागातील उर्जा प्रश्न सोडविण्याचा आपला मानस असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचा कारभार हाती घेतलेले नव्या अध्यक्षांनी पद मिळताच कोणतीही गरज नसताना 1 कोटी रुपये खर्च करून दोन वाहने खरेदी केली. जिल्हा बँकेत पद घेतल्यापासून अध्यक्ष जिल्हा बँक मालकीची झाल्याप्रमाणे वागत असल्याचे जिल्हा बँकेचे अनेक संचालक भेटून सांगतात. काही कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करून बँकेचे नुकसान केले जात आहे. त्याची चौकशी झाल्यास खरे काय ते समोर येईल. शेतकर्‍यांच्या जीवावर उठलेल्या भाजप पक्ष हा वॉशिंग पावडर भाजपा झाला आहे. शेतकर्‍यांना अनुदानाच्या कागदी घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात काहीच मिळाले नसल्याचा आरोप आ. तनपुरे यांनी केला.याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

- Advertisment -

ताज्या बातम्या