पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यात सहकारी सोसाट्याच्या अंतर्गत जिल्हा बँकेने शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. पण त्यात सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकर्यांची कर्जमाफी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्याची अजून पूर्तता झाली नाही तोच जिल्हा बँकेचे अधिकारी पाचेगाव येथील सोसायटीला भेट देत कर्जाची माहिती घेऊन कर्ज वसुलीसाठी ठोस भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मोहीम तालुक्यात सर्व ठिकाणी सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे.
एक तर शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतकर्यांच्या कोणत्याच पिकाला चांगला दर मिळाला नाही. शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत आहे. त्यात सरकारच्या कर्जमाफीची आश्वासनाने शेतकर्यांनी भरघोस मतदान करून आता आपली कर्जमाफी होईल या आशेने विश्वास ठेवला. पण निवडणुका झाल्या. कर्जमाफी तर दूरच पण कर्ज वसुलीसाठी ठोस भूमिका घेत शेतकर्यांना दिलेले कर्ज वसुली करण्याची सोसायट्यांना अधिकार्यांना मार्फत आदेश देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
नेवासा तालुक्यात जवळपास 131 सहकारी सोसाट्या असून त्यात जवळपास मागील आकडेवारीनुसार 28 हजार 204 शेतकर्यांकडे 299 कोटी रुपये थकीत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यात पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्जाचा समावेश आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने व शेतकर्यांनाकडे पैसे नसल्याने कर्ज थकले. पण कर्जमाफीचे लांबच राहिले. तोच कर्ज वसुलीसाठी स्थानिक सहकार सोसायट्यांना बँकेचे अधिकारी भेट देत कर्ज वसुलीसाठी सक्तीचे निर्णय घेणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपुर्वी जाहीर सभेतून सांगितले की, हे सरकार शेतकर्यांचे आहे, त्यामुळे आपली सत्ता आली की, आपण शेतकर्यांचा सात बारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. त्यानंतर नेवासा येथील सभेत आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या तिजोरीवर पहिला आधिकार शेतकर्यांचा आहे, त्यामुळे आमच्या सरकारने निर्णय घेतला की, आमची सत्ता आली की शेतकर्यांची कर्जमाफी करू. अशाप्रकारे दोन्ही नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा निवडणुकीपूर्वी केली होती. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही.
निवडणुकीनंतर आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगतात की, शेतकर्यांनी कर्जमाफीची वाट न पाहता आपले पीक कर्ज भरून टाका.कर्जमाफीची पूर्तता न करता शेतकर्यांकडून सक्तीची वसुली करण्यात येणार असल्याने शेतकरी धास्तावले असून सरकार बद्दल रोष दिसून येत आहे. पाचेगाव सोसायटी कडे 30 जून 2024 अखेर 1 कोटी 71 लाख रुपये थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात कर्ज वसुली मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात थकीत शेतकर्यांकडे जाऊन त्यांना प्रथम अ, ब नोटीस बजाविण्यात येईल. त्यानंतर 101 नोटीस बजावली जाऊन शेतकर्यांच्या सात बारा उतार्यावर संस्थेचा बोजा चढविण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
जिल्हा बँकेच्या अधिकार्यांशी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर यांनी चर्चा करून शेतकर्यांच्या अडीअडचणी सांगितल्या त्यावर वरिष्ठ अधिकार्यांबरोबर विचारविनिमय करून शेतकर्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आधी दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळावा,कर्जमाफीचा शब्द पाळता येत नसेल तर कमीत कमी सक्तीची कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांबरोबर शेतकरी संघटनेने केली आहे.
आश्वासन देवूनही कर्जमाफी न दिल्याने आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार व माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे हा निर्णय होऊपर्यंत शेतकर्यांची कर्जवसुली थांबवण्यात यावी अन्यथा आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागेल. शेतकर्यांची परिस्थिती कर्ज भरण्याची नाही. कर्जमाफी घोषणेची पूर्तता करावी.
– अॅड. अजित काळे, राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना