Thursday, October 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजस्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार; निफाडमध्ये ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार; निफाडमध्ये ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम

नाशिक, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) :

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सन्मान यांना प्राधान्य देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने निफाड नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘कॉफी विथ कलेक्टर’ या विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले.

‘स्वच्छता ही सेवा’ (SHS) २०२६ ही मोहीम १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हा प्रमुख उद्देश आहे.

निफाड येथे झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक आयुक्त शाम गोसावी, सहाय्यक आयुक्त स्नेहल विसपुते, निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चिराग भामरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेण्यात आली. तसेच काम करताना येणाऱ्या अडचणी, आरोग्यविषयक प्रश्न आणि आवश्यक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.

सफाई कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन, स्वच्छता कामासाठी आवश्यक सुरक्षा साधनांचा पुरवठा, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत जनजागृती आणि कौशल्यविकासासाठी प्रशिक्षण यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यावरही भर देण्यात आला.

सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे
स्वच्छ व सुंदर शहरांच्या निर्मितीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शहराची स्वच्छता राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सन्मान जपणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे नगरपंचायतीने या अभियानांतर्गत आवश्यक कार्यवाही करून कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

कार्यक्रमादरम्यान पीपीई किट, गमबूट, गणवेश आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांसारख्या आवश्यक सुविधांसह स्वच्छता व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापन आणि आधुनिक स्वच्छता पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन कामकाजात आवश्यक असलेल्या विविध बाबींची माहितीही कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

‘स्वच्छ निफाड – सक्षम कर्मचारी’चा संकल्प
‘कॉफी विथ कलेक्टर’ या उपक्रमातून सफाई कर्मचाऱ्यांना आपले प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली. त्यांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक निर्णय घेणे, कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, यावर या उपक्रमात भर देण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासोबतच शहराची स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘स्वच्छ निफाड – सक्षम व सुरक्षित सफाई कर्मचारी’ हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांमधील समन्वय अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.

परिसंवादाच्या शेवटी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना निफाड शहर कचरामुक्त करण्याच्या उद्दिष्टाने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या