Monday, June 24, 2024
Homeनाशिकअवैध व्यवसायांची माहिती कळविण्याकरिता पोलीसांकडून व्हॉटस् ॲप क्रमांक जारी

अवैध व्यवसायांची माहिती कळविण्याकरिता पोलीसांकडून व्हॉटस् ॲप क्रमांक जारी

नाशिक |प्रतिनिधी

- Advertisement -

अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून “खबर” हि मदत वाहिनी सुरु केली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळीबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते. यावेळी आ.सीमा हिरे, आ.प्रा. देवयानी फरांदे, आ.डॉ. राहुल आहेर, आ.सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप,उपाआयुक्त प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे,सहाय्यक आयुक्त सिताराम कोल्हे आदींसह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भुसे म्हणाले कि,गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येणाऱ्या अवैध व बेकायदेशीर घटनांबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या “खबर” या मदत वाहिनीचा व्हॉटस् ॲप क्रमांक ८२६३९९८०६२ व ६२६२२५६३६३ जाहीर करण्यात आले आहेत. या क्रमांकावर नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती द्यावी.संबंधित व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

सदरहू दोनही क्रमांकांवर प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागाने आठ दिवसांच्या आत कारवाई करावी. ज्या परिक्षेत्रात बेकायदेशीर व अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येईल त्यावर तातडीने आवश्यक कारवाई न झाल्यास तेथील सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.

यावेळी महाविद्यालयाबाबत माहिती देतांना भुसे म्हणाले कि, महाविद्यालय स्तरावर पालक, पोलीस यंत्रणेतील एक अधिकारी, अन्न व औषध विभागाचे अधिकारी, स्वयंसेवी संघटना, डॉक्टर्स अशा व्यक्तींचा समावेश असणारी समिती तयार करण्यात यावी.

ही समिती महाविद्यालयांमधील विद्यार्थी अमली पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहतील, यासाठी आवश्यक नियोजन करेल. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनामार्फत संशयित मेडिकल्स, किराणा दुकाने यांची तपासणी करून त्यामध्ये काही अवैध घटक आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या