Saturday, September 28, 2024
Homeनगरडॉ. पोखरणासह पाच जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी नाकारली

डॉ. पोखरणासह पाच जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी नाकारली

अतिदक्षता विभागाला आग लागून झाला होता 14 जणांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तीन वर्षांपूर्वी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेसंदर्भात रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांच्यासह अन्य पाच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास आरोग्य संचालनालयाने पोलिसांना परवानगी नाकारली आहे.

- Advertisement -

करोना संसर्गाच्या लाटेत जिल्हा सरकारी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार होणार्‍या अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी भीषण आग लागली. उपचार घेणार्‍या 11 रुग्णांचा जागेवरच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर स्वरूपात भाजले गेले. त्यातील तिघांचा नंतर मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात घटना घडूनही रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य विभागापैकी कोणीही पोलिसांकडे तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर यांनी फिर्याद दिली. या गुन्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा राजेंद्र शिंदे, आरोग्य कर्मचारी सपना उत्तम पठारे, आस्मा राज्जाक शेख व अनंत दत्तात्रय चन्ना या पाच संशयित आरोपींविरूध्द दोषारोप दाखल करण्यास परवानगी मागण्यात आली होती.

आरोग्य संचालनालयाने पोलिसांना परवानगी नाकारली आहे.आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांचे हे परवानगी नाकारणारे पत्र तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना प्राप्त झाले आहे. त्यांनी या माहितीस दुजोरा दिला. फौजदारी दंड संहिता 197 अन्वये परवानगी नाकारणार्‍या या पत्रात न्याय व विधी खात्याचे मत मागवण्यात आले होते, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, डॉ.पोखरणा यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला तर इतर चौघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक पोखरणा यांना निलंबित केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या