Monday, May 27, 2024
Homeजळगावजिल्हा राष्ट्रवादी कार्यालय आमचेच

जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय आमचेच

जळगाव । jalgaon

राज्यातील शिंदे सरकारला समर्थन दिल्यानंतर ना. अजित पवार गटाकडून राज्यातील पक्ष कार्यालयांवर दावे केले जात आहे. नाशिकपाठोपाठ आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयावरही ना. अजितदादा गटाने दावा केला आहे. तर खा. शरद पवार यांच्या गटाने कार्यालयाचा ताबा आमच्याकडेच असल्याचे सांगितले आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी कार्यालय नेमके कुणाचे यावरून पवारद्वयी गटात वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदे पदरात पाडून घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेल्या अनिल भाईदास पाटील यांचाही या बंडात समावेश असून त्यांनी देखिल कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात ना. अनिल पाटील यांचा दौरा झाला असून पहिल्याच दौर्‍यात राष्ट्रवादीची समांतर कार्यकारीणी गठीत करण्यासंदर्भात नुकतीच पद्मालय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आगामी काळात होणार्‍या निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी करण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीनंतर मंत्री ना.अनिल पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्यात राष्ट्रवादीची कार्यकारीणी नव्याने गठीत केली जाणार आहे. जिल्हाध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर ही कार्यकारीणी जाहीर केली जाईल. तसेच जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयावरही ना. अनिल पाटील यांनी दावा केला असून हे कार्यालय माजी खा. ईश्वरबाबुजी जैन यांचे असून त्यांचे चिरंजीव माजी आमदार मनिष जैन हे आमच्यासोबत आहेत. काही काळापुरता त्यांनी ते कार्यालय पक्षाला वापरासाठी दिले होते. त्याच कार्यालयात माजी खा. ईश्वरबाबुजींना प्रवेश बंदी केली होती.

त्या कार्यालयाचा वापर काही बलाढ्य नेते करीत आहेत. त्या कार्यालयावर हक्क सांगताय. त्यामुळे त्या नेत्यांनी ते कार्यालय सोडून स्वत:च्या बळावर कार्यालय उभारावे असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यातील पक्षाचे कार्यालये ही वेल्फेअर ट्रस्टच्या नावे आहेत. या ट्रस्टमध्ये प्रफुल्ल पटेल हे देखिल सदस्य आहेत. त्यामुळे इतर कार्यालयांबाबत ट्रस्ट निर्णय घेईल. मात्र जळगावचे कार्यालय हे खासगी असून ते माजी खा. ईश्वरबाबुजीं जैन यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे ते आमचेच कार्यालय असल्याचा दावाही ना. अनिल पाटील यांनी केला. तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती नसून आमच्या शपथविधीची देखिल आपल्याला माहिती नव्हती. अचानक नाव पुढे आले आणि मंत्रीपदाचा शपथविधी पार पडल्याचेही ना. पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या