अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा नियोजन समितीचा (डिपीसी) निधी मुद्दामच दिलेला नाही, त्यात काही अडचणी आहेत, तो कधी द्यायचा हे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरवतील. मागील काळात या निधीच्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये काही गैरप्रकार झाल्याचे पुढे येत आहे. ते तपासण्याचे काम सुरू आहे, हा जनतेचा पैसा आहे. तो जनतेसाठीच खर्च झाला पाहिजे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी नगरमध्ये बोलताना दिली.
उपमुख्यमंत्री पवार रविवारी नगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण व महात्मा ज्योतिराव फुले – सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या भूमिपूजनासाठी नगरमध्ये आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्हा नियोजन समितीचा निधी कधी द्यायचा हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरवतील. राज्याच्या नियोजन समितीकडे हा निधी जमा झालेला आहे. या निधीचा आराखडा व अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व नियोजन अधिकार्यांना दिलेल्या आहेत. लवकरच हा निधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री कोकाटेबाबत मुख्यमंत्री ठरवतील
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळात कोण असावे, कोण नसावे हा अधिकार मुख्यमंत्र्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. पत्रकारांना विचारून याबाबत निर्णय होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंडेबाबत महायुती एकत्र बसून निर्णय घेईल
धनंजय मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार याकडे लक्ष वेधले असता अजित पवार म्हणाले, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मी याबाबत एवढेच बोललो आहे की त्यांच्या संदर्भात न्यायालयीन व राज्य सरकारमार्फत चौकशी जी सुरू होती, त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मंत्रिमंडळात कोण असावे याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री व महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र बसून घेऊ.
रोहित पवारांच्या प्रश्नांवर दादा भडकले
आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) दोन गट पडले आहेत, असे विधान केले. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री पवार संतप्त झाले. ते म्हणाले कोण्या उपटसुंब्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. आम्ही आमच्या पक्षाचे काम करतो. ते त्यांच्या पक्षाचे काम करतात. त्यामुळे कोणी हा फुकटचा सल्ला देऊ नये, असे सल्ला पवार यांनी दिला.
दादांची क्रेझ आणि गर्दी रेटारेटी
उपमुख्यमंत्री पवार नगरला येणार म्हणून दुपारी चारपासून नगरच्या शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री पवार सायंकाळी पावणे सातच्या सुमारास नगरला आले. यावेळी विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळी. यावेळी दादांसोबत सेल्फी काढणे, दादांचा सत्कार करतांना फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. यावेळी विश्रामगृवर चांगलीच रेटारेटी झाली. पोलिस प्रशासनाची देखील यावेळी तारांबळ उडाली.




