Friday, September 20, 2024
Homeनगरगुरूजीच्या सभेत यंदा ‘गुद्या’ ऐवजी ‘मुद्दे’

गुरूजीच्या सभेत यंदा ‘गुद्या’ ऐवजी ‘मुद्दे’

नेत्यांनी एकमेकांना टोचल्या आरी || शेलक्या शब्दांसह हाणले शालजोडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून वादाची, हाणामारी, हमरी-तुमरीची परंपरा असणार्‍या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा यंदा ‘गुद्यां’ऐवजी ‘मुद्यां’वर गाजली. यावेळी सत्ताधारी कोण आणि विरोधी कोण अशी परिस्थिती व्यासपिठासह सभागृहात होती. यामुळे सुरूवातीला समर्थक शिक्षक सभासदांना सभागृहात कोणत्या गटात बसावे, असा प्रश्न होता.

दरम्यान, सकाळी 11.30 वाजता सुरू झालेली सभा दुपारी उशीरापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांना आरी टोचण्यात सुरू होती. अखेर नावाला सत्ताधारी असणारा मात्र दीड महिन्यांपूर्वी बँकेच्या पदाधिकारी निवडीत फूट पडून सत्तेतून बाहेर गेलेल्या बापूसाहेब तांबे गटाने सभेतून वॉकआऊट केले. त्यानंतर सभेत गुरूमाऊली मंडळाचे 12 संचालक आणि विरोधी मंडळाचे सर्व नेते, सदस्य आणि सभासद यांच्या उपस्थितीत सभा सुरू होती. यामुळे यंदाची शिक्षक बँकेची सभाही आगळीवेगळी ठरली. यात बँकेच्या सत्ताधारी संचालकांच्या विरोधात गुरूमाऊली मंडळाचे नेते आणि सभासदांनी दंड थोपटले. तर या संचालकांच्या मदतीला विरोधी मंडळाचे नेते आणि पदाधिकारी उभे राहिल्याचे दिसून आले.

जिल्हा शिक्षक बँकेची 105 वी सर्वसाधारण सभा रविवार (दि.8) रोजी कल्याण रोडवरील एका मंगल कार्यालयात झाली. यंदा गणेशोत्सवादरम्यान आणि दीड महिन्यांपूर्वी झालेल्या पदाधिकारी निवडीच्यावेळी गुरूमाऊली मंडळात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर सभा कशी पार पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यापूर्वी शिक्षकांच्या सभेत हाणामारी ते एकमेकांचे कपडे फाडणे, उद्धार करणे यासह खुर्च्यांच्या फेकाफेकीचे प्रकार घडलेले होते. बँकेची सभा ही सभासदांपुरती मर्यादित न राहता ते पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलेली होती. यंदा मात्र हाणामारीच्या पंरपरेला शिक्षकांनी फाटा दिल्याचे दिसून आले. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअमरन बाळासाहेब सरोदे होते. सुरूवातीपासून शांततेत सुरू असणारी सभा दुपारच्या टप्प्यात गरमागरमीच्या वळणावर चालली होती. मात्र, यावेळी सर्वांनी शांत राहण्याची भूमिका घेतल्यानंतर आणि बापूसाहेब तांबे यांनी त्यांचे भाषण संपताच सभेतून वॉकआऊटचा निर्णय घेतल्याने सभेत विरोध करणारे कोणीच शिल्लक राहिले नाही. त्यानंतर शांततेत सभा सुरू राहिली.

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत ही सभा शेवटपर्यंत चालविण्याचा निर्धार चेअरमन सरोदे यांनी पूर्ण केला. सभेत शिक्षक नेत्यांनी बँकेच्या सुरक्षावर होणारा खर्च, पैसे खा पण कमी खा, नार्‍याच्या लग्नात केर्‍याची मुंंज, कारभार एकाचा आणि उत्तरे दुसरेच देतात. सभासदांच्या पैशातून नेत्यांची प्रतिमा तयार करण्यासाठी खर्च, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, बेगाने शादी मे अब्दुला दिवाना, सोनेरी टोळीचे रुपांतर आता चंदेरी टोळीत झाले असून आता त्यांना रुपेरी टोळीची साथ मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सभासदांच्या हाती लोखंड देऊ नयेत’, या शेलक्या शब्दांत एकमेकांना शालजोडे हाणत राग व्यक्त केला.

माजी चेअरमनचा विद्यमान चेअरमनकडून निषेध
सभेच्या दुपारच्या सत्रात गुरूमाऊली गटाचे नेते पदाधिकारी पाठोपाठ माजी चेअरमन डॉ. संदीप मोटे आणि रामेश्वर चोपडे यांनी व्यासपिठ सोडत सभेतून निघून जाणे पसंत केले. यावेळी सभासदांनी त्यांना थांबवण्याची मागणी केली. मात्र, मोटे आणि चोपडे गेल्यानंतर विद्यमान चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी या प्रकाराचा निषेध करत मोटे आणि चोपडे यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या अहवालावर सभा सुरू आहे. यामुळे त्यांनी सभेला थांबणे गरजेचे होते. मात्र, ते निघून गेल्यामुळे सभासदांचा अवमान झाला आहे, अशा प्रकाराचा निषेध चेअरमन सरोदे यांनी केला.

शिक्षक नेते टेन्शनमध्ये
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण सभेत एरवी सर्वत्र मिरवणारे जवळपास सर्व शिक्षक नेते टेन्शनमध्ये दिसून आले. एकीकडे आपल्यामुळे अथवा आपल्या समर्थकांमुळे सभेत गोंधळ झाल्यास लक्ष ठेवून असलेले प्रशासन आपल्या कार्यक्रम करेल, या भितीपोटी दुपारी उशीरापर्यंत मोजक्यात नेत्यांशिवाय अन्य नेत्यांनी सभेत भाषण करणे सोडा सभेच्या व्यासपिठाकडे फिरकणे टाळले. सभेतून तांबे गट निघून गेल्यावर अनेकांनी आपले विचार हजर असणार्‍यांसमोर व्यक्त केले. सभेत जवळपास सर्वच नेत्यांच्या चेहर्‍यावरील टेन्शन लपून राहिले नाही.

सभा सोडून गुरूजींचा जेवणावर ताव
सभा सुरू झाल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास शिक्षक गाडेकर यांचे मनोगत सुरू होते. यावेळी चेअरमन सरोदे यांनी गाडेकर यांचे मनोगत झाल्यावर जेवणासाठी ब्रेक घेऊ असे सांगितले. यामुळे उपस्थित शिक्षक सभासदांनी सभा सोडून थेट जेवणावर ताव मारणे पसंत केले. यावेळी शिक्षकांनी चक्क शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे एका ओळीत पंगत धरत जेवणावर ताव मारला.

- Advertisment -

ताज्या बातम्या