Wednesday, September 11, 2024
Homeनगरएसटीच्या 585 गाड्या ठप्प; दोन लाखांहून अधिक प्रवाशांचे हाल

एसटीच्या 585 गाड्या ठप्प; दोन लाखांहून अधिक प्रवाशांचे हाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर एसटी बसेसवर दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील एसटी वाहतूक शनिवारी पहाटेपासून बंद करण्यात आली. जिल्ह्याच्या 11 आगारांतून 585 बसेसपैकी एकही एसटी शनिवारी रस्त्यावर धावली नाही. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील दोन ते अडीच लाख प्रवाशांना या निर्णयाचा फटका बसला. दरम्यान, रात्री 10 पर्यंत एकही एसटी डेपोच्या बाहेर निघाली नसल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, एसटी अचानक बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. नगर शहरातील तीनही बसस्थानके आणि तारकपूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारात एसटी बसेस स्थानकात उभ्या होत्या. दुसरीकडे नगरसह जिल्हाभर प्रवासी खासगी वाहनांतून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट केली. दरम्यान, एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत असल्याबाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती घेणार असल्याचे सांगितले.

एसटी महामंडळाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार नगर जिल्ह्यात एसटीच्या 630 एसटी गाड्या असून यापैकी 585 बसेस दररोज रस्त्यावर धावतात. शनिवारी पहाटे पाच वाजेपासून एसटीने आपल्या गाड्यांच्या सर्व फेर्‍या रद्द केल्या होत्या. एसटी महामंडळ दररोज 585 बसेसव्दारे 2 हजार 500 फेर्‍यामधून 2 ते अडीच लाख प्रवाशी प्रवास करतात. मात्र, गाड्या बंद असल्याने या सर्व प्रवाशांचे शनिवारी हाल झाले. आमच्याकडे एसटीचे वाहक आणि चालक तयार आहेत, तसेच बसेस धावण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाने एसटीच्या बसेस रस्त्यावर न धावण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

जिल्ह्यात शांतता असून सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना हद्दीत गस्त वाढविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी बंद आहे. तेथे बंदोबस्त तैनात आहे. एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला होण्याचे प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

– राकेश ओला, पोलीस अधीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या