Wednesday, January 7, 2026
HomeनगरRain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

Rain News : पुढील दहा दिवस ‘अवकाळी’चे जोरदार संकट

नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीचे संकेत- उत्तमराव निर्मळ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. येत्या दहा दिवसांत चक्रीवादळ आणि काही भागात अतिवृष्टीचे तसेच नुकसानीचे संकेत आहेत, असे हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी सार्वमतशी बोलतांना सांगितले.

- Advertisement -

यावर्षी मान्सुनवर परिणाम करणारे एल निनो तसेच हिंदी महासागरातील द्विधृव स्थिती तटस्थ असल्याने यावर्षी मान्सुनसाठी सुरवातीपासूनच अनुकूल स्थिती होती. अंदमानला 20 मे पर्यंत हजेरी लावणारा मान्सून यावर्षी 23 मे रोजीच सक्रिय होईल. मध्यंतरी तापमान पातळी सरासरीपेक्षा जास्त झाली होती. परिणामी अवकाळी पाऊस आणि वादळाने काही भागात जोरदार हजेरी लावल्याने तापमानात घट झाली असली तरी मान्सुनच्या गतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला नाही ही समाधानाची बाब आहे.

YouTube video player

सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 25 तारखेपर्यंत त्याचे चक्री वादळात रुपांतर होईल. गुजरातपासुन मुंबई ते गोव्यापर्यंतच्या किनारपट्टी लगत कमी दाब असल्याने हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे वाटचाल करील. त्यामुळे कोकणपट्टी, घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल. या चक्रीवादळाचा फटका गुजरातला बसण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून 27 मे पर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. आरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सुनचे आगमन नेहमीपेक्षा पाच ते सहा दिवस लवकर होईल. संपूर्ण महाराष्ट्रात 10 जुनपर्यंत मान्सुन पोहचेल असे सध्याचे चित्र आहे. दि. 20 ते 31 मे पर्यंत सर्वदुर जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असून 27 ते 31 मे पर्यंत अतिवृष्टीचे प्रमाण जास्त राहणार आहे. ताशी 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.
साधारणपणे 96 ते 104 टक्के हा सरासरी पाऊस असुन यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात यावेळी 106 टक्के पाऊस पडेल अशी सद्यस्थिती आहे, असेही श्री. निर्मळ म्हणाले.

अवकाळी पावसाचा जिल्ह्यात कहर : 700 शेतकरी संकटात

325 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान; फळबागांना मोठा फटका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले असून, सुमारे 700 शेतकरी बाधित झाले आहेत. 325 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. फळबागा, भाजीपाला, चारा पिके आणि रब्बी हंगामातील शेतीला मोठा फटका बसला असून, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. दरम्यान, बाधित शेतकरी व हेक्टरची आकडेवारी अंतिम नाही. तसेच पावसाचा कहर देखील सुरूच असून आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

मे महिन्यात अवकाळी पावसाची सुरूवात 5 तारखेला झाली. त्यानंतर 9 ते 12 मे दरम्यान पाथर्डी, अकोले आणि अहिल्यानगर तालुक्यात वादळी पावसाचा प्रकोप दिसून आला. या काळात 35 गावांतील 250 शेतकर्‍यांचे 115.55 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये 183 शेतकर्‍यांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा कमी तर 67 शेतकर्‍यांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पाथर्डी तालुक्यातील 24 गावांतील 106 शेतकरी बाधित झाले असून त्यांचे 73.60 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील 6 गावांतील 73 शेतकर्‍यांचे 18.35 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर अहिल्यानगर तालुक्यातील 5 शेतकर्‍यांचे 5 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

16 मेपासून अवकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढला असून संगमनेर, राहुरी, नेवासा, कर्जत, पारनेर आणि जामखेड तालुक्यांतील अनेक गावांत पावसाचा फटका बसला आहे. 18 मे रोजी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे आणखी 121 शेतकरी बाधित झाले असून, सुमारे 48 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर 19 मे रोजी पण पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा, पपई, डाळिंब, मोसंबी, संत्रा, चिकू, लिंब, जांभूळ आणि केळी या फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. याशिवाय मका, कांदा, टोमॅटो, उन्हाळी बाजरी, मिरची यांसारख्या पिकांनाही फटका बसला आहे.

प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू
अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांची माहिती गोळा करून तालुकास्तरावर पंचनामे सुरू आहेत. कृषी विभागाने संबंधित अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यास सुरूवात केली असून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या 23 मेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी पिकांसह पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. विजा पडण्याचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे. अवकाळी पावसाचा धोका अद्याप कायम आहे. शेतकर्‍यांनी हवामानाचा अंदाज पाहून पुढील शेती कामे करावीत व पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रामपूर येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी तालुक्यातील रामपूर येथे काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला अन्य दोघे जखमी आहेत. कोल्हार खुर्द रामपूर शिवारात पठारे वस्तीजवळ निवृत्ती श्रीपती लोखंडे यांच्या शेतीत नांगरणीचे काम सुरु असताना पावसाचे वातावरण झाले म्हणून शेतीत बाभळीचे झाड होते.

त्या ठिकाणी झाडाखाली राहुल रावसाहेब पठारे वय(37), राहुल सोपान नालकर (वय 32) व भारत गोपीनाथ नालकर (वय 33) हे बसलेले असताना वादळी पाऊस सूरु झाल्यानंतर विजांच्या कडकडाटात त्या बाभळीच्या झाडावर वीज कोसळून राहुल रावसाहेब पठारे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. कोल्हार खुर्दचे कामगार तलाठी श्रीकांत पाटोळे यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे .मयत राहुल पठारे यांच्या मागे आई वडील, दोन भाऊ,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

भंडारदरा, मुळा पाणलोटातही जोरदार हजेरी

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात रविवारी आणि सोमवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या भागातील डोंगर दर्‍यांवरील धबधबे वाहू लागले असून ओढे-नाले खळखळू लागले आहेत.
अकोले तालुक्याच्या विविध भागात रविवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाची नोंद अकोलेत 53, आढळा 28, निळवंडेत 19 मिमी झाली. पाणलोटातही कमी अधिक पाऊस झाला. भंडारदरात काल दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.

अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी होता. रात्री उशीरापर्यंत अधूनमधून बारीक सरी कोसळत होत्या. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 19 दलघफू पाणी दाखल झाले आहे. रविवारी मुळा पाणलोटातील कोतूळ, हरिश्चंद्र गड व अन्य परिसरात विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात दोन तास मुसळधार पाऊस झाला. सोमवारीही दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास रविवारच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...