अहमदनगर (प्रतिनिधी)
एका विवाहितेचा माहेरून 10 लाख रूपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ करून पतीने मोबाईलवरून मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक देत घरातून बाहेर काढले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 1 एप्रिल ते 26 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली.
संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती खालेद ख्वाजा सय्यद, सासरे ख्वाजा मैमुद्दीन सय्यद, दीर परवेज ख्वाजा सय्यद, सासू परवीन ख्वाजा सय्यद, सासूची आई सुग्रावी ख्वाजा सय्यद (सर्व रा. मर्कज मस्जिद, रायमोह, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा खालेद सय्यद याच्यासोबत डिसेंबर 2017 मध्ये विवाह पार पडला.
यानंतर विवाहितेचा सासरच्या लोकांना पैशासाठी छळ सुरू केला. वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली. तेथे सामोपचाराने वाद मिटविण्यातही आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा विवाहितेचा छळ सुरूच राहिला. 26 ऑगस्ट रोजी विवाहितेच्या पतीने तिला मोबाईलवर ‘तलाक’ चा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. त्यानंतर घरातून बाहेर काढले. त्यामुळे विवाहितेने बुधवारी भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिली आहे. कॅम्प पोलिसांनी पती, सासू, सासरा, दीर व सासूच्या आईसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.