पुणे । Pune
सोशल मीडियावरील रील आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याच्या हव्यासामधून गुन्हेगारीकडे वळल्याचे एक धक्कादायक प्रकरण पुण्यात उघडकीस आले आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचा मोबदला मागण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून धिंगाणा घालणे, बेदम मारहाण करणे आणि तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वादग्रस्त सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याप्रकरणी पुण्याच्या काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदे, तिचा साथीदार अण्णा ऊर्फ आप्पा ढमढेरे आणि इतर ८ ते १० जणांच्या टोळक्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. विद्याधर गायकवाड (वय ६५) हे पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. सध्या ते ‘करूणादीप फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. या संस्थेच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे काम केल्याचा दावा करत दिव्या शिंदे आणि तिच्या सहकाऱ्यांनी डॉ. गायकवाड यांच्याकडे ५ लाख रुपयांच्या अवाजवी रक्कमेची मागणी लावून धरली होती.
डॉक्टरांनी ही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संशयितांनी थेट गुंडगिरीचा मार्ग अवलंबला. दिव्या शिंदेने ८ ते १० जणांच्या टोळक्यासह डॉक्टरांच्या निवासस्थानी बेकायदेशीरपणे प्रवेश केला. तेथे आरोपींनी घरात गोंधळ घालत सामानाची नासधूस केली आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या डॉ. गायकवाड यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
सोशल मीडियावरील रील्समुळे प्रकाशझोतात आलेली दिव्या शिंदे ही तिच्या वादग्रस्त वर्तनामुळे यापूर्वीही चर्चेत राहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहस्पर्धकांना धमकावल्याच्या गंभीर आरोपावरून तिची शोमधून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. आता थेट एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. काळेपडळ पोलिसांनी या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, संबंधित सर्व आरोपींचा शोध आणि पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू केली आहे.




