Monday, November 18, 2024
HomeUncategorizedअनेक हातांचा मिडास टच लाभलेली पारंपरिक घरे - श्रीअमेय फडणीस

अनेक हातांचा मिडास टच लाभलेली पारंपरिक घरे – श्रीअमेय फडणीस

घर…या दोन अक्षरात आपलं आयुष्य सामावलं आहे. सध्या जरी आपण पॉश, आलिशान या शब्दांनी सजलेल्या घराची स्वप्न पाहत असलो तरी आपल्याकडे या घरांची एक समृद्ध, सहजसोपी, घराला घरपण देणारी, निसर्गाला साथ देणारी परंपरा आढळून येते…त्या त्या प्रदेशात ही घरे आपल्याला तेथील विशिष्ट शैलीत बांधलेली दिसतात. या घरांची रचना, बांधकाम, त्याची पद्धत, चित्रकला, शिल्पकला…सारं काही देखणं, सुबक….या घरांच्या निर्मितीत अनेक हातांचा एक मिडास टच लाभलेला आढळतो.

‘रोटी, कपडा और मकान’ या मनुष्याच्या तीन मुलभूत गरजा. त्यात ‘रोटी’ आणि ‘कपडा’ यांंचा वारंवार आपण उपयोग करतो. विकत घेतो किंवा उपभोग घेतो. मात्र ‘मकान’ हे आपण सारखे सारखे बनवतही नाही व त्याचा उपयोगही वेगळ्या प्रकारे घेतो.

- Advertisement -

खरं तर निवासाची उपज निवार्‍यातून होते. आदि मानव ऊन, पाऊस आणि इतर धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी निवारा शोधत- गुहांमध्ये व झाडांवर राहू लागला. जशी संख्या वाढत गेली, तशी या निवार्‍याची जडण-घडण सामुदायिक झाली. कुटुंब व कुटुंब नियोजनाची प्रक्रिया चालू झाली. अनेक कुटुंबांनी मग टोळी झाली. या प्रकारे निवारा मिळाल्यामुळे कुटुंब व ढोळी रचनां घडू लागली. प्रागैतिहासिक अशा सुंदर गुहांचे दर्शन आपल्याला भीमबेटका (भारत), शॉवे (फ्रान्स) व लास गील (सोमालिया) येथे होते.

कालांतरानी जशी एक व्यवस्थित सामाजिक व्यवस्था घडत गेली तशी निवार्‍याची उत्क्रांती निवासात झाली. ‘निवास स्थान’ अगोदर अल्पकालीन असायचे. ते आता कायमस्वरुपी झाले. व्यक्तीची आणि कुटुंबाची एका ‘निवास’/‘स्थानाशी’ ओळख होऊ लागली. भटक्या जमाती स्थायिक झाल्या. शिकार करणारे आता शेती करू लागले. शेतीसोबत शहर आले व घरासोबत शेजार आले. म्हणूनच घरयामुळे सभ्यता आली. हडप्पा, मोहेन-जो-दाडो, बॅबीलॉन,सारखी भव्य धान्य कोठी व बाजार इथल्या इमारतीचे घडण भाजलेल्या विटांनी केले होते व इमारती सहज 3-4 मजली उंच होत्या. घरांची व्यवस्थित योजना असेल, घरी दुमजली असेल, घरांना शौचकूप असे आंगण, स्वयंपाकघर, शयनकक्षी, वेगळ्या खोल्या असत. मुळात आपण घरांचे आज जे रुप पाहतो ते रुप तब्बल 4,500 वर्ष पूर्वी विकसित झाले होते!

या पुढील काळाची – 2000 बीसीइ ते 500 बीसीइ – ज्याला आपण वेदिक युग म्हणू शकतो. – आपल्याला फारशी माहिती मिळत नाही. अर्थात वेदांमध्ये घर, कुटुंब, समाज, शहर व त्याचे नियम, व्यवस्था प्रणाली इ. बद्दल बरेच लिहिले आहे. परंतु उत्खननातील भौतिक पुरावा, निवास स्थानांवर विशेष प्रकाश घालत नाही. पण ह्या काळात नक्कीच वरील पद्धतींमध्ये भर पडली असावी व विकासही झाला असावा.

या नंतरचा बौद्ध काळ ते गप्ता राजवंशाचा काळ, हा भारतासाठी सुवर्ण काळ होता. या काळातील भौतिक अवशेष हे स्तुप, विहार, चैत्य इ. प्रकारात आहेत. पण या काळात भारत वर्षाची प्रचंड भरभराट झाली. उत्तरेला गांधार आणि तक्षशिलपासून दक्षिणेत मुझिरीसपर्यंत, भारतात अनेक राज्य व राज्यवंश निर्माण झाले. ज्याचे पुढे महा जनपदे तयार झाली. स्थापत्य, वास्तुशास्त्र, शिल्प शैली इ. वर ग्रंथ लिहिले गेले. अगमशास्त्र, बृहृत संहिता, शिल्पशास्त्र इत्यादी. अर्थात या ग्रंथांमध्ये प्राधान्य मंदिर स्थापत्यांला होते. पण मंदिरसुद्धा शेवटी देव-देवतांचे निवास-स्थानच!

प्रतिहार गुर्जर, राष्ट्रकूट, सात्वाहन, चालुक्य, चौलुक्य, चोला, पंड्या, पालव, चेरा, प ाल कडंब, काकटिया, गंगा- अशा अनेक राज्यांनी भारताची वास्तु परंंपरा चालू ठेवली. या परंपरेशी हिंदू-बौद्ध, जैन धार्मिक परंपरा घनिष्ट जुळली आहे. हीच परंपरा पुढे यादव व विजयनगराने चालू ठेवली. या काळातील बांधकाम हे जास्त करुन दगडी असे. भक्कम बांधकाम, बलाढ्य रुप. मोकळ्या जागा, सुंदर व बारीक कोरीव काम/ शिल्प काम- अशी अचाट करणारी ही वास्तुकला. पण, ही वास्तुकला व बांधकाम कोरडे असे. यात चुना किंवा रेतीचा वापर केला जात नसे.

भारतात चुुन्याचे बांधकाम हे इस्लामसोबत आले. 1000-1200 सीईपासून आपल्याला चुन्यातले बांधकाम आढळते. चंदेल, बुंदेल, परमार यांंचे किल्ले, कुंड, महाल इ. दिल्ली तसेच दख्खनच्या सल्तनतींनी अरबी, फारसी, उजबेकी इ. शैली व शिल्पकार भारतात परिचित केले. परंतु या काळात देखील सर्वसामान्यांचे घर/निवास कसे होते? हे सापडणे अवघड आहे. काळासोबत, यात इतर शैल्यांचा अस्त होऊ लागला. शीख, इंग्रजी, पोर्तगीज, फ्रेंच, डच इ. पारतंत्र्याच्या काळाची देण आपण आजही पाहतो. पोस्ट ऑफिस, रेल्वे स्थानक, लॉज इ.त्याची ठळक उदाहरणे आहेत.

मुळात, भारत देश हा एवढा मोठा व वैविध्यपूर्ण आहे की त्यातील वास्तुकलेबद्दल लिहायचे झाल्यास अनेक विषयांवर लिहावे लागेल. हिमाचल प्रदेशच्या ‘काथ कोणी’ पासून ते केरळच्या ‘वाळकेट्टू’ पर्यंत विविध बांधकाम शैली भारतात आहेत. पंंजाबच्या लाखोरी/नानकशाही विटांपासून ते महाराष्ट्रातील पुस्तकी विटांपर्यंत… केवळ विटांचेच केवढे प्रकार आहेत. पोरबंदर, मालाड, घरंगधरा, जयपुरी, लाल जांभा, काळा पाषाण असे असंख्य दगडाचे प्रकार, गल्ली, नुक्कड, कट्टा, कूचा, कसबा असे अनेक शहरी भाग. पण आपण कुठेही भारतात फिरलो. तरी घर हे शेवटी घरच.

गेल्या 400-500 वर्षात, आपल्याला घरांचे काही विशिष्ट प्रकार दिसतात- जसे की अहमदाबादचे ‘पोळ’ घरे किंवा दक्षिण कर्नाटकातली ‘गुत्थु’ घरे. महाराष्ट्रात सुद्धा, छत्रपती व पेशवेकाळातील घराचे बरेच अवशेष सापडतात. अर्थात, काळासोबत त्या वास्तुत बदल घडलेला असतो. पण हेच तर घराचे वैशिष्ट्य. बदलत्या काळानुसार व गरजांनुसार, घरात बदल अनिवार्य आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात, विविध शैलीचे घरे दिसतात.

कोकणातील घर माजघराचे घर या घराला आंगण, पडवी, ओढी, .स्वयंपाकघर, माजघर व वरती माळा. अशा अनेक घरांची बनते कोकणातील एक ‘वाडी’. देशातले घर वेगळे. त्याला घराच्या मधोमध चौक, खोलींची लांबी व रुंदी ठरलेली. त्याचे नाव ‘खण-घर्ड’ प्रणाली, दगड, वीट व लाकडाच्या आकारामुळे खोलीचा आकार ठरत असे. इमारतीचा ‘ताण-भार’ सुद्धा कारणीभूत असे. या बांधकामाचे सर्वात सोपे व सुंदर उदाहरण म्हणजे वाडे.

वाड्यांंचे क्षेत्र, शैली आणि परिसर वेगवेगळे, पण वापर एकच. घर/निवास, मग तो वाडा छत्रपती/पेशव्यांचा असो किंंवा कारकुनाचा. वाड्यात कोठार घर, जामदारखाना, धान्यघर, कारंजे, तबेले हे सर्व काही असायचे. अगदी मंदिर व मशीद सुद्धा! हा प्रकार मुलत: देशात व खानदेशात दिसे. यातच बारीक बदल करून विदर्भात ‘बाडा’ प्रकार दिसतो व मराठवाडा, तेलंगणामध्ये ‘देवडी’ प्रखर आढळतो. म्हणूनच, आजही हैद्राबादच्या देवड्यांमध्ये – घुसलखाना अशूरखाना इ. दिसतात.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर नवीन देश घडवण्याची जबाबदारी शासनावर आली. स्वस्त, टिकाऊ व गतीशील बांधकाम गरजेचे होते. म्हणूनच सन 1950 पासून सिमेंटचे बांधकाम भारतात सर्वव्यापी झाले आहेत. हा इतिहास नुकताच घडला आहे. ही नवीन वास्तुकला व नवीन साहित्य अधिक तंत्र कालजयी आहे की नाही हे काळच सांगेल.

खरं तर भारतातील घरं/निवास व त्यांची वास्तुकला व बांधकाम आणि त्याचा वारसा संपदा-यावर छोटा लेख लिहिणे फार कठीण, मुळात ज्या देशाचा इतिहास इतका विस्तारित व श्रीमंत आहे त्या देशाच्या कुठल्याही घटकाचा ऐतिहासिक दृष्टिकोन संक्षिप्त लिहिणे, फार कठीण उदाहरणार्थ, पाश्चात्य राज्यांमधील बांबूची घरे, तामिळनाडूतील चेट्टीनाड शैलीची घरे, बंगालच्या ‘हवेल्या’- असे अनेक प्रकार, अशा नितांत सुंदर रचना आपल्याला भारतात दिसतात. या रचना केवळ घरे नसून त्या अत्यंत मोलाचा ठेवा आहेत.

या क्षेत्रात काम करणारे वास्तुशास्त्रज्ञ, वास्तुविशारद, इंजिनिअर, गवंडी, विश्वकर्मा इ. अनेक यांचे बांधकाम क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे आणि शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराला घरपण देणारे कुटुंब. ज्याच्यामुळे ‘निवास स्थानाचे’ घर होते. भारतीय जीवनशैली, कुटुंब पद्धती आणि नाते-गोते जोपासणारे भारतीय कुटुंब अर्थात काळाच्या ओघात यात सुद्धा वेगाने बदल घडत आहे. मात्र एक गोष्ट खरी- कसेही असले तरी आपले घर हे फक्त ‘आपलेच’ असते. ती केवळ चार भिंतीतली जागा नसून, कुटुंबाची संपदा असते. त्याचा वारसा आपण नक्कीच जपला पाहिजे आणि वेळोवेळी संवर्धन केले पाहिजे.

– श्रीअमेय फडणीस

(लेखक हेरिटेज कन्सल्टंट आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या