Wednesday, September 11, 2024
HomeUncategorizedपाचशे मोरांचं गाव... रावणाच्या भाच्यांचे गाव - प्रा. आनंद बोरा

पाचशे मोरांचं गाव… रावणाच्या भाच्यांचे गाव – प्रा. आनंद बोरा

महात्मा गांधीजी नेहमी म्हणांयचे, खेड्याकडे चला. कारण खेडयांमध्ये शांतता, एकोपा असतो. निसर्ग तुमच्या साथीला असतो. म्हणूनच आपल्या आजूबाजूची गावे आपण निदान पालथी तरी घातली पाहिजे. या गावांमधील लोकसंस्कृती आजही गुण्यागोविंदाने नांदते आहे…या गावांमध्ये निसर्ग, इतिहास, एकोपा, बंधुभाव यांची आजही जपणूक होत आहे. अनेक परंपरा जतन केल्या जाताहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधने यांच्या साथीने वाटचाल करतानाही ही गावे गावपण सोबत घेऊन पुढे जाताहेत…

नाशिक ते त्रंबकेश्वर…या रस्त्याने प्रवास करतांना सातपूर सोडल्यावर पाच किमी अंतरावर एक रस्ता बेळगाव ढगा या गावात जातो. साडेतीन हजार वस्तीचे हे गाव राजवाडा, मातोश्री नगर आणि त्रंबक विद्या मंदिर अशा तीन भागात विभागले गेले आहे. तिन्ही भागात शंकर, हनुमान, मरीआई, अशी विविध मंंदिरे आहेत. या गावात पिरबाबाची यात्रा भरते. यावेळी कुस्त्यांच्या दंगलीचे देखील आयोजन केले जाते.

- Advertisement -

गावात अनेक ठिकाणी दगडी चिरा बघावयास मिळतात. गावात आठ वर्षांपासून सप्ताहचे आयोजन केले जाते. महिरावणीच्या पाझर तलावातून पिण्याचे पाणी गावाला पुरविले जाते. गावात सत्तरीतील अनेक पहिलवान आजही या गावात आहेत. गावात अनिल कपूर आणि करिष्मा कपूरच्या रिश्ते आणि धर्मेंद्रच्या करिष्मा कुदरत का या चित्रपटांच्या शुटिंंग (चित्रीकरण) गावात झाले आहे. गावातील जंगलात तब्बल पाचशेपेक्षा जास्त मोर आहेत. संतोशा डोंगराचा पर्यटन विकास झाल्यास मोरांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. 1960 मधील शाळा गावात आहे. पूर्वी या गावातून ब्रिटिश आर्मी संतोषा डोंगरावर तोफांचा सराव करीत असल्याचे गावातील जेष्ठ नागरिक सांगतात. नाशिक-त्रंबक रस्त्यावरील बहुतांश आदिवासी जनसंख्या असलेले आणखी एक गाव म्हणजे महिरावणी. रावणाचे भाचे अहिरावण व महिरावण या दोन राक्षसांच्या नावावरून महिरावणी नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.

गावाची लोकसंख्या 3169 इतकी आहे गावा जवळून नंदिनी नदी वाहते गावात मारुती, भोलेनाथ, प्रचितराय मंदिर आणि श्री गहिनीनाथ पीरबाबा समाधी स्थळ आहेत . मे महिन्यात श्री गहिनीनाथ पीरबाबा समाधी स्थळाजवळ गावाची यात्रा भरते. त्यावेळी कुस्त्यांची दंगल देखील भरविली जाते. गावात 29 वर्षांपासून हरिनाम सप्ताहचे आयोजन केले जाते. हे गाव आदिवासी असून, पेसा अंतर्गत येते. गावात प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळा देखील आहे. गावातील युवक सुनील खांडबहाले भारतातील यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यामुळे या गावाची नवीन ओळखच खांडबंहाले यांच्या नावामुळे तयार झाली आहे.

तब्बल 10 लाख शब्द आणि वाक्यांशांच्या शब्दसंग्रहात 42 भाषांसाठी विनामूल्य बहुभाषिक डिजिटल शब्दकोष आणि भाषांतर व्यासपीठ असलेले खांडबहाले डॉट कॉमचे ते संस्थापक देखील आहेत. गावात अनेक चित्रपटांच्या शुटिंंग (चित्रीकरण) देखील झाले आहे. अनिल कपूर यांच्या चित्रपटाचे तसेच इश्क या चित्रपटाचे चित्रीकरण गावात झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते स्व.विक्रम गोखले यांनी देखील गावास भेट दिली आहे. गावातील सभा मंडपात महिला शिवणकाम शिकतांना दिसतात. महिलांना स्वयंरोजगार देण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. निवृत्तीनाथ दिंडीचे स्वागत या गावात केले जाते. गावाजवळील आकर्षक पाझर तलाव आजू-बाजूच्या तीन गावांची तहान भागवितो. गावात पर्यटनाच्या मोठ्या संधी असून गावाजवळील संतोषा डोंगर आणि पाझर तलाव येथे पर्यटन क्षेत्रास मोठा वाव आहे. तसेच पाटबंधारे खात्याच्या 25 एकर पडित जागेवर देखील पर्यटन विकास होऊ शकतो. या परिसरात निसर्ग उद्यान केल्यास नाशिककरांना एक निसर्ग स्थळ बघावयास मिळल. या डोंगरावर औषधी वनस्पतींचे माहेर घर असून तिचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

गावा जवळ नायकर यांनी बांधलेल्या मंदिरात वीस फुटी मारुती असून जवळ गायत्री मंदिर देखील आहे. वेद शिकविणारी गुरु गंगेश्वर वेध पाठशाला देखील गावाच्या शिवारात आहे. नाशिक- हरसुल रस्तावर नाशिकपासून अवघ्या 35 किमी अंतरावर वाघेरा हे गाव आहे गावातील वाघेरा किल्ल्यावर चक्रधर राजाची सत्ता असल्याचे सांगितले जाते. तसेच कश्यपी ऋषिची ही तपोभूमी म्हणून देखील हा किल्ला प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यावर कश्यपी नदीचे उगमस्थान देखील आहे. सह्याद्रीच्या पश्चिम रांगेत पेठच्या उपरांगेत हा किल्ला आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3517 फूट इतकी आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या साडे सहा हजाराच्या आसपास आहे बारा पाड्यांमिळून हे गाव तयार झाले आहे. गावात मिशीवाला हनुमान, सतीमाता, श्रप्तशृंगी, मरिमाता मंदिरे आहेत.

गावात पूर्वी ब्रिटिश अधिकारी येत असत. थंड हवेचे ठिकाण म्हणून. त्याकाळी गावाची ओळख होती आजही ब्रिटिश गेस्ट हाऊस पडक्या अवस्थेत बघावयास मिळते. गावातील कलगी तुरा जिल्हाभरात प्रसिद्ध आहे. किल्यावर सात वर्षाने फुलणार्‍या कारवी या वनस्पतीचे मोठे जंगल देखील आहे.

नाशिक जिल्ह्यातील आणखी एक सिद्ध पिंप्री. या गावाला खूप मोठा इतिहास आहे. पंधरा हजाराच्या लोकसंख्येच्या या गावात अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आहे. पूर्वी या गावाला रताळ पिंप्री म्हणायचे. गावात बैलगाडी इतका मोठा रताळे जमिनीतून निघाल्याचे गांवकरी सांगतात. पण नंतर त्याचे नाव सिद्ध पिंप्री झाले. पृथ्वीराज चव्हाण यांचे एक सरदार बिउजी ढिकले या गावात आले होते. त्यावेळी हे गाव लुटलायला लुटारू येत असत. त्यांच्या बंदोबस्तासाठी बिऊजी त्यांच्या पांढर्‍या घोड्यासह गावाच्या वेशीवर पहारा देत होते. त्या दिवसापासून गावात लुटारू आलेच नाही. याची आठवण म्हणून आजही ग्रामस्थ गावाचा सिद्ध पुरुष म्हणून बिऊजी आणि पांढर्‍या घोड्याची मिरवणूक काढतात.

गावाला दोन वेशी आहेत. पूर्वी गावाला तटबंदी होती. कानिफनाथांच्या शिष्यांच्या समाध्या गावात आहेत. शांतिगिरी महाराज यांचा जन्म देखील याच गावात झाला आहे. गावात लग्न करायचे असेल तर अकरा नियमांचे पालन करावे लागते. गावात लग्नाची मिरवणूक काढली जात नाही. हुंडा आणि आहेर घेतले जात नाही. गावाची आड दगडात बांधलेली आहे. गावामध्ये सप्तश्रुंगी, सप्तसिद्ध महाराज, मारुती, राम, शनी, विठ्ठल-रुखुमाई, श्रीकृष्ण, गणपती, महादेव, खंडेराव आदी मंदिरे आहेत.

पाडव्याच्या दुसर्‍या दिवशी गावात यात्रा भरते. कुस्त्यांची दंगल पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. पूर्वी टांगे शर्यत देखील गावात होत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र अस्थी जतन करणारे हे गाव असून बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक पी.एल.लोखंडे याच गावचे होते. त्यांनी बाबासाहेबांच्या अस्थी गावात आणून बाबा साहेबांच्या स्मूर्ती जतन केल्या आहेत.

30 मे 1958 रोजी गावात खा. दादासाहेब गायकवाड व मुकुंदराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत या स्तूप स्मारकाचे उद्घाटन झाले . हे स्तूप स्मारक राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.

– प्रा. आनंद बोरा

(लेखक नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष व प्रसिद्ध निसर्ग व वन्य छायाचित्रकार आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या