Monday, November 18, 2024
HomeUncategorizedकालातीत...आनंद निधान; आपल्या परंपरा - आनंद ढाकीफळे

कालातीत…आनंद निधान; आपल्या परंपरा – आनंद ढाकीफळे

अभ्यासपूर्ण विचार करुन जुन्या माणसांनी, ऋषींनी अनेक वर्षांपासून विविध प्रयोगातून घासुन-पुसून अनेक कसोट्यांवर पारखून परंपरा घडवली. म्हणूनच परंपरा जिवंत राहते. काळाच्या ओघात, प्रवाहात टिकून राहते. पुढील येणार्‍या पिढ्यांना हे आनंद निधान मिळत राहते.हेच भान जर तरुणांनी जागरुकपणे, डोळसपणे, अभ्यासाने आत्मसात केलं व प्रेमाने आपलं योगदान दिलं तर आपली परंपरा अशीच दिमाखानं आपली संस्कृती अभिमानाने मिरवत राहील…

माणूस आणि काळ यांचा कित्येक संघर्ष युगानुयुगांचा आहे. माणूस जी निर्मिती करतो, काळ ती क्षणार्धात जुनी करुन टाकतो. तरीही माणूस काळाच्या पटलावर टिकून राहण्याचा हट्ट काही सोडत नाही. अशा परिस्थितीत भारतीय हिंदु संस्कृती, मराठी परंपरा आणि ही जीवनशैली हजारो वर्ष टिकून आहे.

- Advertisement -

कारण प्रत्येक मानवी मनाला आनंद देणारं व सौंदर्यपूर्ण, सहज असं जे जे आहे ते काळ जुनं करु शकला नाही. माणसाला जगण्यासाठी अध्यात्म, कला आणि विज्ञान या तीनही गोष्टींची गरज आहे. अध्यात्माने मानवी अंतर्मनातलं सौंदर्य जोपासलं जातं तर कलेमुळे बाह्य जीवन सुंदर करण्यासाठी मदत होते. विज्ञानाने नाविन्य येतं. एकच एक, तेच तेच रटाळ जीवन माणसाला नको असतं.

या सगळ्याचा आतला व बाहेरचा अभ्यासपूर्ण विचार करुन जुन्या माणसांनी, ऋषींनी अनेक वर्षांपासून विविध प्रयोगातून घासुन-पुसून अनेक कसोट्यांवर पारखून परंपरा घडवली. व अशी परंपरा मग आपोआपच सर्वमान्य होते. कारण त्या मागे मानवी कल्याण, प्रेम एवढा एकच शुध्द हेतु असतो.

भारतीय परंपरांवर नजर टाकली तर लक्षात येते की भाषा, प्रांत वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती, कपडे, अन्न सगळ्याच बाबतीत वैविध्य असून ही एकसंधता आहे. आणि हेच या परंपरेचे वैशिष्टय आहे.

भारतात, महाराष्ट्रात अनेक जाती, पोटजाती आहेत. प्रत्येकाचा देव वेगळा… कुळाचार वेगळा… तरीही एकता कशी सहज सांभाळली जाते. या अभूतपूर्व परंपरेकडे आश्चर्याने बघत रहावं.

कुणाचा कुणाला त्रास नाही तर उलट प्रत्येकाचं वेगळेपण हाच आनंद.

रंग-आकार माणसाच्या मनावर, परंपरेच्या, धर्माच्या नावाने का होईना राज्य करतात. पिढ्या न् पिढ्या तेच रंग-आकार माणूस आपलेपणानं जपतो. कारण त्यातूनच मानवी मनाला समाधान मिळतं.

अन्न, वस्त्र, निवारा जगण्यासाठी माणसाला अत्यावश्यक आहेच पण त्याला एक शैली, सौंदर्य मिळालं तर तेच जीवन बदलतं, जगावसं वाटतं. एक देव हा जरी विषय घेतला तरी कवी, साहित्यिकांनी आरत्या, पोथ्या, कथा, पुराणं, वेद या स्वरुपात केवढं योगदान दिलं आहे. चित्रकारांनी चित्र, शिल्पकारांनी मुर्ती, मंदिरं, राजवाड्यांपासून पाटा वरवंट्यांपर्यंत तर विणकरांनी इरकल ,खण, पैठण्या, सुतारांनी, लोहारांनी तांबटानी…या सर्व बलुतेदारांनी,

समाजातल्या मागच्या प्रत्येकाने परंपंरेमधे जे-जे योगदान देता येईल ते-ते अंतःकरणापासून दिलं. मागच्या पिढीने पुढच्या पिढीला दिलं आणि आजही हा वसा जमेल तसा जतन केला जातोय.

म्हणूनच परंपरा जिवंत राहते. काळाच्या ओघात, प्रवाहात टिकून राहते. पुढील येणार्‍या पिढ्यांना हे आनंद निधान मिळत राहते.हेच भान जर तरुणांनी जागरुकपणे, डोळसपणे, अभ्यासाने आत्मसात केलं व प्रेमाने आपलं योगदान दिलं तर आपली परंपरा अशीच दिमाखानं मिरवेल.

कुसुमाग्रजांनी एका कवितेत म्हंटलच आहे की,

प्रेम आहे मानवी जीवनाचा

सारांश एकमेव.

व यातच मानवी जीवनाचं कल्याण आहे. परंपरा हा विषय किती मोठा आहे, की कितीही लिहिलं तरी शेष राहणारच. या जाणिवेने इथे थांबतो.

– आनंद ढाकीफळे.

(लेखक ज्येष्ठ सजावटकार आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या