Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedचित्रकला : शब्द नसलेलं काव्य ! - चारुदत्त (सी. एल.) कुलकर्णी

चित्रकला : शब्द नसलेलं काव्य ! – चारुदत्त (सी. एल.) कुलकर्णी

जे न देखे रवी, ते देखे कवी…असं आपण म्हणतो…पण त्याचबरोबर जे न देखे रवी, ते देखे चित्रकार…असं पण म्हणता येईल…अवघी सृष्टी आणि मानवाच्या भाव-भावनांचा सरल-तरल आविष्कार साकारणारी कला म्हणजे चित्रकला…आपल्या मानवी जातीला लाभलेलेे हे वरदान आहे. नियमित कामातून मिळणारा वेळ,येणारा शीण, तो घालवण्यासाठी आवश्यक असलेला कामाचा बदल, विरंगुळ्याची साधनं, नवीन काहीतरी करण्याची उपजत असलेली आस आणि सर्जनिक प्रयोगशीलता या अवधानांवर अक्षर लिपी आणि चित्रकलेचा पाया रचला गेला.

तसा मानव हा इतर प्राण्यांप्रमाणे प्राणीच. तोही भटक्याच आणि सुरक्षिततेसाठी कळपाने रहाणारा. उपजाविकेसाठी अन्न पाणी आणि रहाण्यासाठी; ऊन पाऊस थंडी वार्‍यापासून बचाव होण्यासाठी; आसरा शोधणारा, शोधत फिरणारा. फरक इतकाच की त्याला स्वसंरक्षण किंवा पोषणासाठी दात नखं पंजे शिंगं या ऐवजी हात आणि बुद्धी मिळाली. बुद्धी सर्वच चरांना आहे परंतु मानवाला बुद्धीसोबत भावना प्रतिभा, प्रज्ञाही मिळाल्या. ज्यातून विचार, संवाद प्रक्रिया आणि सर्जनशीलता जन्माला आली. संवादाचे संवादासाठी प्रामुख्याने चौसष्ठ प्रकार निर्माण झाले; ज्यांना कला ही संज्ञा प्राप्त झाली. या कलांच्या माध्यमांतूनच मानवाचा उत्कर्ष झाला. यातली एक कला म्हणजे रेखाटन..! चित्रकला..! जी आज आपण अतिशय प्रगल्भ स्वरूपात जगभर बघतो.

- Advertisement -

चित्रकलेची प्राचीनता, गुहा आणि लेण्यांसारख्या दुर्गम ठिकाणी पहायला मिळते. मध्य प्रदेशात भोपाळपासून 45 किलोमीटर वर रायसेन जिल्ह्यात असलेल्या भीम बेटका गुहांमधे 30,000 वर्षांपूर्वीचा भित्तीचित्र साठा 1957 साली सापडलाय. ही चित्रे ऑस्ट्रेलियातील काकाडू राष्ट्रीय उद्यानात सापडलेल्या चित्रांशी मिळती जुळती आहेत. 2003 साली युनेस्कोने भीम बेटकाला विश्व वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. ही चित्रे गुहेच्या नैसर्गिक दगडाच्या भिंतींवर लाल मऊ दगड, पांढरा चुनखडीचा खडा, कोळसा या माध्यमातून साकारलेली आहेत. हा भारतातला आणि जगातला आज मितीला ज्ञात असलेला सर्वात प्राचीन वारसा समजला जातो. ही सर्व एकाच रंगातली रेखाचित्रं आहेत.

आपल्या कल्पना, हेतू आणि विचार सहकार्‍यांपर्यंत पोहचवण्यासाठी, चित्रकला ही भाषा म्हणूनही वापरली गेलीय. आधी चित्र लिपी आणि मग अक्षर लिपी आली. रेषा आणि जोड रेषांमधून निरनिराळे आकार तयार झाले. या आकारांमध्ये निसर्गात दिसणारी पाने-फुले-पक्षी-प्राणी यांचे आकार प्रतिबिंबित होऊ लागले. आकारांप्रमाणे निसर्गातले वेगवेगळे रंग आणि रंगछटा यांचा वापर त्या त्या आकारांसाठी करायला सुरुवात झाली. या सर्वांचा प्राथमिक उपयोग, आपलं म्हणणं दुसर्‍याला सूचित करण्यासाठी होत होता. त्यातूनच अर्थदर्शक चिन्हे तयार झाली आणि मग पुढे चिन्हांमधून प्रतिकात्मक लिपी.

इसवीसनपूर्व दुसर्‍या शतकातली चित्रकला अजंठा लेण्यांमध्ये सापडली. तोवर रंग, ते तयार करण्यासाठी लागणार्‍या वस्तू आणि साधनं यांवर अनेक सृजनात्मक प्रयोग झालेले होते. निसर्गात उपलब्ध असलेले वनस्पती, रंगीत दगड, माती यांचे विविध रंग तयार झाले. त्यांचा नियमित वापर सुरू झाला. रंगांच्या मिश्रणात बेलफळाच्या तेलाचा वापर केल्याने रंगांना चमक येऊन त्यांचं ऊन पावसापासून संरक्षण करणं शक्य झालं.

रंग आणि आकारातून वास्तवातली दृष्य साकार होऊ लागली. सौंदर्यानुभूती आविष्कृत होणं विकसित झालं. निसर्गातलं सौंदर्य घरी-दारी-अंगणात आलं. पानं-फुलं-हार-गजरे अंगावर परिधान करण्याची प्रथा सुरू झाली. नैसर्गिक वस्तू, वनस्पती, फळं, पानं, रस, चीक, डिंक, झाडाची साल, यांचा वापर कुठे किती कसा करावा यांचे अनेक प्रयोग झाले. अंगावरची वस्त्रं रंगीत आणि नक्षीदार होऊ लागली. शृंगार उदयाला आला. कापड कागद अंगण छत भिंती आणि शरीरावरही गोंदण करून सजावट सुरू झाली. सडा-सारवण-रांगोळी आणि आदिवासींची वारली चित्र ही यांचीच उदाहरणं आहेत.

विविध प्रदेश, तिथलं वातावरण, तिथे उपलब्ध असलेल्या नसलेल्या वस्तू यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशातल्या आविष्कारांवर पडला आणि त्या तिथल्या शैली बनल्या.

त्या त्या ठिकाणांचं भौगोलिक स्वास्थ्य, नियमित कामांचं सर्वसाधारण स्वरूप, परीस्थितीनुरूप उपलब्ध रिकामा वेळ, येणारा शीण, तो घालवण्यासाठी आवश्यक असलेला कामाचा बदल, विरंगुळ्याची साधनं, नवीन काहीतरी करण्याची उपजत असलेली आस आणि सर्जनिक प्रयोगशीलता या अवधानांवर अक्षर लिपी आणि चित्रकलेचा पाया रचला गेला.

प्रचंड विविधता असलेल्या आपल्या भारतवर्षात काळानुरूप, बुद्ध, चालुक्य, पल्लव, पांडव, चैल यांच्या कार्यकाळात, वेगवेगळी विषय वैशिष्ठ्येे असलेल्या अनेक प्रादेशिक शैली विकसित झाल्या. शैलींची नांवं अशी जैन (7-12 वी शताब्दी), पाल (8-12 वी शताब्दी), अपभ्रंश (11-15 वी शताब्दी), मुघल, पटना कलम, दक्कन, गुजराती, राजपूत शैली अंतर्गत मेवाड-जयपूर- बिकानेर-माळवा-किशनगढ-बूंदी-कोटा-झालवाड-अल्वर, पहाडी शैली, नाथद्वारा, सिख इत्यादी

चित्रांमधे प्रामुख्याने शिकार, पशु, पक्षी, आकाश, मेघ, वस्तु, वृक्ष, निसर्ग, कथा, दरबार, समारंभ, जनसामान्य जीवन, बाजार, वेशभूषा, शृंगार, आभूषणे, भावप्रधान ऐतिहासिक पौराणिक प्रसंग, राग रागिणी, रास लीला, उद्यान, मंदिरे, वास्तुशिल्पीय दृष्ये, असे विषय असत.

वर्षानुवर्षे अथक चाललेल्या अनेक सर्जनशील प्रयोगांच्या निष्कर्षांतून, नवनवीन पृष्ठं, माध्यमं, उपकरणी, त्यांची उपयोजिता, यांचे शोध लागत गेले, त्यांचा प्रचार प्रसार व्यवहार होत गेला आणि शास्त्र निर्माण झालं.

गुहेतल्या दगडांवर दगड घासून काढलेल्या चित्रांनंतर भिंतींवर आणि अंगणातही, शेणमातीचा गिलावा करून त्यावर बाभूळ अथवा तत्सम काट्याचा लेखणीसारखा आणि पांढरा चुन्याच्या कोळ शाई/रंगासारखा वापरून वारली चित्रकला अस्तित्वात आली. गारगोटीचे दगड कुटून रांगोळी तयार झाली आणि तिच्या रेखनाची शैली सर्वदूर रोजच्या वापरात आली. हळू हळू झाडाची साल, केळीच्या बुंध्याचा पापुद्रा, विशिष्ट झाडाची पानं (भूर्जपत्र) यांवर काट्याने कोरून चित्रं अथवा आरेखन केलं गेलं. ओलेपणी केलेलं हे आरेखन वाळल्यानंतरही सुस्थितीत राहून अनेक वर्षे टिकू शकत असे. प्राचीन काळची अशी लिखाणं आजही उपलब्ध आहेत.

भूर्जपत्रानंतर कागद, कापड यांचा वापर होऊ लागला. ओरिसात जगन्नापुरीजवळ रघुराजपूर गावात, आजही अशा पाचव्या शताब्दीतील जुन्या पारंपारिक प्रथांप्रमाणे पट्ट चित्रकारिता चालू आहे. या संपूर्ण गावालाच, भारत सरकारने हस्त शिल्प ग्राम म्हणून मान्यता दिली आहे.

नाशिकमधे काही जुन्या वाड्यांच्या भिंती आणि छतांवर, अशा, निसर्गातले रंग वापरून चितारलेल्या कलाकृती आहेत. आज अनेक प्रकारचे पट, जसे कागद आणि कॅनव्हास मिळतात. कागदांचेही खूप प्रकार अस्तित्वात आले आहेत. ते विविध प्रकारच्या रंगांना आणि निरनिराळ्या माध्यमांना अनुरूप तयार केलेले असतात. उदा. पेन्सिल/ चारकोलसाठी रफ टेक्श्चरचा, वॅाटरकलरसाठी प्युअर कॅाटनचा हँडमेड, ऑईल पेंटसाठी ऑईल पेपर इ. जगभरातील अनेक कंपन्यांनी त्यावर प्रायोगिक संशोधन केलंय. अजूनही सुरु आहे.

रंगांची माध्यमे..

पेन्सिल, बोरू, टाक, शाई पेन, ड्राय पेस्टल्स, ऑईल पेस्टल्स, ऑइल पेंट, पोस्टर कलर, वॅाटर कलर, अ‍ॅक्रेलिक कलर्स, चारकोल, शाई.! वस्तूंमधे लाकूड, प्लायवुड, चिनी मातीची भांडी-उपकरणी, धातूंमधे तांबं, पितळ, लोखंड, ल्युमिनियम, चांदी, सोनं, कांच, पारदर्शक रंग इ..

रंग देण्यासाठीची अनेक उपकरणे आणि साधनं: पातळ रंगांसाठी वेगवेगळ्या आकारमानाचे तसेच वेगवेगळ्या आकाराचे ब्रश, निरनिराळ्या आकार आणि आकारमानाच्या निब, घट्ट रंगांसाठी गवंड्याच्या थापीसारख्या थाप्या, पुट्टी भरायच्या पट्ट्या इ..

मर्यादित संपर्काच्या आणि दळणवळणाच्या काळात नाशिकला ऑईल पेंट, पोस्टर कलर, वॅाटर कलर या माध्यमांमध्येे बर्‍यापैकी साधना केली गेली. चित्रणात, नाशिकच्या गल्ल्या-वाडे- गोदाघाट-मंदिरं-डोंगर दर्‍या-तळी धरणे-सरोवरे-कुंड-बारव-वृक्षांचे पार-रस्त्यांचे चौक-साधू आदिवासी बैरागी, वैदू-सण यात्रा उत्सव सिंहस्थपर्व क्रियाकर्म यज्ञ याग अनुष्ठाने तीर्थस्नाने-विशेष स्थळ वैशिष्ठ्ये, असे अनंत विषय आले. एकाच ठिकाणाची वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कोनातून चित्रे काढल्या गेल्याने परिस्थितीनुरूप सहज होणार्‍या बदलांचा इतिहास चित्रबद्ध झाला.

प्रत्येक माध्यमाच्या आविष्काराची कृती आणि सौंदर्यानुभूती वेगवेगळी असते. मुळात त्यांच्या लेपनाच्या पद्धतीत फरक असतो. पोस्टर, ऑईल आणि अ‍ॅक्रेलिक हे रंग अपारदर्शक असतात. त्यामुळे त्यांचे एकावर एक थर देता येतात. पोस्टर कलर मॅट असतात. ते पाण्यात विरघळतात. त्यांच्या सूक्ष्म छटा तयार करण्याला, ऑईल पेंटच्या तुलनेत, काही अंशी मर्यादा येतात. ऑईल पेंट आणि अ‍ॅक्रेलिक चमकदार असतात. ऑईल पेंटची परस्परांत मिसळण्याची, पसरण्याची आणि ब्रशचे फराटे नाहीसे करण्याची क्षमता खूपच उच्च प्रतीची असल्याने त्यात अतिसूक्ष्म वास्तविकता आणणं शक्य होतं. शिवाय गाभा माध्यम ाईल असल्याने वाळायला लागणारा वेळ जास्त असतो. त्यात निवांत आणि निश्चिंतीने काम करता येतं. अ‍ॅक्रेलिक पेंटचं माध्यम पाणी आहे आणि ते लवकर वाळतात. त्यामुळे त्यात इतरांपेक्षा बोल्ड ठसठशीत आणि वेगाने काम करावं लागतं.

या तीनही माध्यमांमधे, एकावर एक थर देता येत असल्यामुळे, गडद रंगाचं काम (शेड्स) आधी करून, हाय लाईट्स नंतर केले जातात/करता येतात. वॅाटर कलर्स पारदर्शक असतात आणि हीच त्यांची विशेषता आहे. यात आधी फिक्या रंगांचं काम करून गडद रंग (शेड्स) नंतरच भरावे लागतात. रंग भरतांना गडद हवा असेल तर घट्ट आणि फिका करायचा असेल तर पातळ करून परिणाम साधावे लागतात. ही पद्धत अवलंबण्यासाठी संवय करावी लागते. चुकीचा पडलेला रंग दुरूस्त करताना चित्र मळकट होतं. म्हणून ही पद्धत जरा अवघड समजली जाते.

मात्र नाशिकमधे ही पद्धत अनुसरणारे साधक चांगले तयार झालेले असल्याने, वॅाटरकलरसाठी, नाशिकच्या कलाकारांचं आणि पर्यायाने नाशिकचं नांव जागतिक पातळीवर नोंदवल्या गेलंय.

माझ्या आठवणीत मी, ही परंपरा जपणार्‍या चार पिढ्या पाहिल्या आहेत. प्रत्येक पिढी अधिक प्रगल्भ होतांना बघितली आहे. पूर्वीच्या तुलनेत आज होणार्‍या बदलांचा आणि संपर्क दळणवळणाचा वेग प्रचंड वाढला आहे. इलेक्ट्रॅानिक माध्यमांनी क्रांती घडवली आहे. जग लहान झालंय. जगाच्या कुठल्या कोपर्‍यात कोण काय करतंय हे कुणालाही बघता येतंय शिकता येतंय.

चित्रकला ही वैश्विक संवाद लिपी आहे. तिला देश प्रदेश जात पंथ किंवा अक्षर बोली भाषा यांसारख्या मर्यादा नाहीत. चित्रित केलेले प्रसंग, ठिकाणं, वस्तू , रंग, ऋतू, वेळा इ. जगाच्या पाठीवर कुणालाही समजू शकतात.

अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज, परिसर दृष्यांऐवजी भावना प्रदर्शित करतात. त्यातून होणारा बोध हा प्रत्येकाचा आपापला वेगळा आणि आत्मिक असतो. विविध आकार रंग आणि स्वर स्वतंत्रपणे अथवा त्यांच्या नियोजित समूहाद्वारे, त्या-त्या तशा विशिष्ट भावना प्रतीत करतात. आपलं म्हणजे माणसाचं संपूर्ण जीवन, शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत, या नवरसांनी भरलेलं आणि भारलेलं आहे. प्रत्येक रसाचा स्वभाव आणि भावना एक एक विशिष्ट रंग प्रभावित करतो. चित्रातला त्या त्या रंगांचा सुयोग्य प्रमाणात झालेला वापर, आकार आणि लय, बघणार्‍याच्या मनःपटलावर एक प्रतिक्षिप्त भावना निर्माण करतात. अचानक एखादा प्रसंग, जुनी आठवण जागृत होते आणि त्या आविष्काराशी जोडली जाते. ही प्रत्येक बघणार्‍याची स्वतंत्र अनुभूती असते.

एक उदाहरण बघा, सकाळी किंवा संधीकाळी क्षितिजावर उमललेले आकार आणि रंग पाहून, वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनांत वेगवेगळा भाव उत्पन्न झाल्याचा अनुभव आपण सर्वच घेतो. ढग दाटले अंधारून आलं की आपोआप अस्वस्थता येते. तेच पांढरे ढग हिवाळ्यात, निळ्या आकाशावर आणि कुठलाही ओळखी-अनोळखीचा सतत बदलणारा आकार घेतात तेंव्हा त्यावर पडलेले सूर्यकिरण; छाया प्रकाशाचा लोभसवाणा खेळ करतात आणि आनंद देतात. पावसाळ्याला हिरवा रंग, रंगाचा ओला ताजेपणा, एकाच रंगाच्या अनंत छटा, त्यावर त्या रंगाला शतप्रतिशत पूरक संगत करणारी इतर रंगांची कळ्या-फुलं, मन प्रसन्न करतात. या रचनांमधे कांहीही वस्तुनिष्ठ नसतं तरीही त्याचा प्रभाव जाणवतो..! हेच खरं अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचं गम्य असतं. त्यात विषयापेक्षा भावना प्रबळ असते.

प्रत्येक चित्र हे शतप्रतिशत परस्पर संवाद साधणारं, अंतर्मन व्यक्त करणारं, शब्द नसलेलं काव्य असतं. खरी कविता ही जशी, शब्द आणि अर्थ यातला आशयगर्भ अवकाश असते, तसंच चित्र हे ही एक सार्वभौम भाषा, अंतरंगाचा आविष्कार, सौंदर्यानुभूतीचा दस्त, विचारांची बखर आणि आनंद घेण्याची आणि देण्याची चिरंतन प्रक्रिया असते. किमान तिचा समजून उमजून आस्वाद घेता यावा म्हणून हा लेख प्रपंच.

– चारुदत्त (सी. एल.) कुलकर्णी.

(लेखक प्रसिद्ध चित्रकार आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या