लोकसंस्कृतीत लोकभ्रम आपली लहानपणापासून सोबत करतात. मग ते लहान बाळाची दृश्य काढणे असो किंवा स्मशानातील भुताची गोष्ट. तीन तिघाडा आणि काम बिघाडा हा लोकसंकेत तर बहुधा प्रत्येकानेच अनुभवलेला.लोकभ्रमाची अशी कितीतरी उदाहरणे आपण पहात असतो. संत गाडगेबाबांपासूनडॉ नरेंद्र दाभोळकरांपर्यंत अनेकांनी हे लोकभ्रम मिथ्या असल्याचे सांगितले पण लोकसंस्कृतीतले हे भाग आपण त्याज्य मानले नाहीत…
लहान बाळाला टीक का लावतात ? कुणाची दृष्ट लागू नये म्हणून खुदूखुदू हसणारे बाळ किरकिर करायला लागले की आयाबाया म्हणतात, दृष्ट काढ. मग एखादी आज्जी बाळावरुन मिठ मोहऱ्या उतरवून टाकते. एखादी आज्जी बाळावरुन तुटलेली चामडयाची चप्पल उतरवून जोरात आपटते. एखादी आज्जी बाळावरुन हंडा उतरवून पाणी असलेल्या परातीत उलटा ठेवते. हंड्यात विस्तव असल्याने पाणी चर्रर्र करते. आजी म्हणते, बाळाची दृष्ट उतरते. काही बायका बाळाला दृष्ट झाल्यावर करंडयातील कुंकू उतरुन त्याची तीन, पाच किंवा सात बोटे भिंतीवर ओढतात.
काही स्ञिया केरसुणी बाळावरुन तीन वेळा उतरवतात. मातीचे बोळके लाल होई पर्यंत तापवून तीन वेळा बाळावरुन उतरवतात आणि पाण्याने भरलेल्या परातीत पालथे घालतात. त्यातून बाळाची दृष्ट उतरते असा लोकभ्रम आहे. दृष्ट काही बाळालाच होते असे नाही. इमारतीला दृष्ट लागू नये म्हणून दरवाज्याला काळया बाहुल्या बांधतात. काही लोक उंबर्याला घोडयाची नाल ठोकतात. आपल्याकडे असे अनेक लोकभ्रम जन्मापासून मृत्यूपर्यंत जपले जातात. रात्री अपरात्री कुत्री विव्हळते, भुंकण्यापेक्षा त्याचा सूर रडल्यासारखा असला तर तो एखाद्याच्या मृत्यूचे सूचन समजला जातो. दोनतीन वर्षापूर्वी माझे वडील गेले. शेजारच्या ताई म्हणाल्या, दोन दिवसापासून रात्री, मध्यरात्री तुमच्या घराजवळ कुत्री विव्हळत होते.
लहानपणी कावळा ओरडला की आज पाहुणे नक्की येतील हा शकून मानला जायचा. तेव्हा प्रवासाला आपली लालपरी (एस टी) होती. ग्रामीण भागात दिवसभरात एखादी एसटी येई. मुक्कामी गाडीतून चारदोन पाहुणेही येत. याशिवाय कावळयाचे ओरडणे हा वयात आलेल्या मुलींसाठी खास संदेश मानला जायचा. कावळा शिवला असाही एक शब्दप्रयोग होता. घरातील स्त्रीया कावळा शिवला म्हणून चार दिवस कशालाही स्पर्श करत नसत. बालपणात हे संकेत काही कळत नसत. कुणी सांगतही नसत. बालमनावर लोकभ्रमाचे गारुड असते. तीन तिघाडा काम बिघाडा हा लोकसंकेत मानला जातो. तीन व्यक्तींनी एखाद्या चांगल्या कामाला जावू नये. तीन माणसे एखादे काम करायला गेली की ते काम होणार नाही, अडेल, बिघडेल हे मनावर ठसलेले. यावर तोडगाही होताच. तीन जण एकत्र चालले तर एखादा दगड (खरे तर खडाच) खिशात घेऊन जायचा. दगड माणसाचे प्रतिनिधित्व करायचा असे मानले जायचे.
आपल्याकडे मांजर आडवे जाणे हा अशुभ संकेत आहे. आम्ही तर लहानपणी मांजर आडवे गेल्यावर दुस-या रस्त्याने जात असू किंवा थांबून घेत असू किंवा मागून येणारा पुढे गेल्यावर जात असू . मांजर मारणे हे पाप समजले जाते. मांजर मारली तर त्या पातकाचे क्षालन करायला काशीला जावे लागत असे.टीटवीचे ओरडणे अपशकून मानले जाते. घुबडाचे तोंड पाहू नये हा आपला लोकभ्रम. एकदा राञी एक घुबड एका इमारतीला अडकले. चांदीचा वर्ख असणारे ते घुबड, त्याचा स्पर्श आम्ही अनुभवला. पक्षीमिञाला फोन करुन बोलवले आणि त्याची व्यवस्था केली. मी घुबडाचे तोंड पाहिले म्हटल्यावर मिञाची प्रतिक्रिया होती, यडा हे लोकभ्रम विविध व्यवसायातही असतात. पहिली विक्री म्हणजे भवानी. पहिल्या ग्राहकाने उधार मागू नये हे व्यवसायाचे सूत्र व्यापारी पाळतात. एखाद्याचे केस कोवळे असतील तर तो माणूस प्रेमळ समजला जातो अन् राठ केसांचा माणूस मायाळू नसतो असे आजही मानले जाते. भूत उलट्यापायाचे असते हा आपला लोकभ्रम. आमच्याकडे स्मशानसेवा करणाऱ्या सुनिता पाटील या भगिनी आहे. त्या प्रेताचा अंतिम संस्कार अतिशय मनोभावे करतात. त्यांचे आई वडीलही अंतिम संस्कारासाठी लाकडे आणि इतर साहित्य पुरवित. हे कुटुंब स्मशानातच राहते. त्यांची भावंडेही इथेच वाढली. त्यांचे संसारही फुलले. स्मशानात रहाताना तुम्हाला भूताखेताची भिती नाही वाटतं? असा मी प्रश्न सुनिता पाटील यांना विचारला. त्या म्हणाल्या, भूतखेत माणसाच्या मनात असते. मला कधीच भूताखेताची भिती वाटली नाही. तरीही भूतबाधा हा लोकभ्रम आजही जपला जातो. जूनपासून पावसाला सुरुवात होईल. मे महिन्यात आकाशात चांदणे लखलखत राहील. आकाशातले तारे पहाण्यात मौज असते. त्यात एखादा तारा तुटताना आपण पाहिला तर अशुभाने मन चिंतीत होते.
पाऊस पडू लागल्यावर आपल्याला आनंद होतो . मेघ गर्जना होवू लागली , विजा चमकू लागल्या तर आपण विजेपासून संरक्षण व्हावे म्हणून दरवाज्यात लोखंडाची वस्तू टाकतो . विजेपासून संरक्षण करणारा हा लोकभ्रम. काही माणसे पायाळू असतात. त्यांना विजेचे फार भय असते असे मानले जाते. शंकर पाटलांची वळीव ही कथा पायाळू म्हाताऱ्याच्या लोकभ्रमावरच बेतलेली आहे. पाठीत चमक निघाली तर या पायाळू माणसाचे पाय पाठीवरुन उतरवतात किंवा लहान बाळाचे कोवळे पाय पाठीवरुन उतरवल्याने पाठीतली चमक जाते. लोकभ्रमाची अशी कितीतरी उदाहरणे आपण पहात असतो. संत गाडगेबाबांपासून तर डॉ. नरेंद्र दाभोळकरांपर्यंत अनेकांनी हे लोकभ्रम मिथ्या असल्याचे सांगितले पण लोकसंस्कृतीतले हे भाग आपण त्याज्य मानले नाही.
– प्रा. डॉ. शंकर बोर्हाडे
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक व लोककला अभ्यासक आहेत.)