Wednesday, July 24, 2024
HomeUncategorizedफराळांच्या पदार्थांचे संमेलन - कुंदा महाजन

फराळांच्या पदार्थांचे संमेलन – कुंदा महाजन

दिवाळी हा सण दिव्यांचा, आकाश कंदिलाचा, लहान मुलांचा बागडायचा आणि अर्थात मनसोक्त फराळ खाण्याचा. हेमंत ऋतूमध्ये येणारा हा सण जणूकाही जीवनाला एक नवीन ऊर्जा देत असतो. हा सण बहुतेक पारंपरिकरीत्या सर्वत्र भारतामध्ये साजरा होतो. याकाळात सर्वत्र थंडी वाढायला सुरुवात झालेली असते. बाहेरचे वातावरण आल्हादायक असते. ज्यामुळे मनाला प्रसन्न वाटते आणि काम करण्यास उत्साह वाटत असतो. त्याचप्रमाणे भूक पण चांगली लागते. म्हणूनच बहुतेक दिवाळीमध्ये आपल्या पूर्वजांनी फराळाचे प्रयोजन केले असावे.खरे म्हटले तर दिवाळीमध्ये सगळ्याच घरांमध्ये सुरुवात होते ती साफसफाईने. नवीन कपडे, नवीन वस्तू आणि फराळाची गडबड याने. तसे बघितले तर भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये फराळ बनतो. फराळाचे पदार्थ मात्र थोड्याफार प्रमाणात भिन्न असतात. महाराष्ट्रात चकली, शेव, चिवडा लाडू, करंजी, कडबोळी आणि शंकरपाळे हे शक्यतो प्रत्येक घरात बनतात. याशिवाय इतर पदार्थांचा समावेश पण होतो जसे की चिरोटे, निरनिराळ्या वड्या, बर्फी आणि फरसाणचे प्रकार.

- Advertisement -

पूर्वी दिवाळी म्हटले की फराळ करण्याची मजाच वेगळी होती. या सर्व पदार्थांचा केव्हा फडशा पडायचा समजत नव्हते. आता मात्र वेगळे चित्र दिसते. जो कोणी फराळ बघितला की नको, फराळ नको असे म्हणतो. का तर त्यात भरपूर साखर आहे, तेल आहे म्हणून. आपले पारंपरिक पदार्थ आपण का करतो आणि का खातो याला पण महत्त्व आहे. हा थंडीचा काळ असतो. जेव्हा आयुर्वेदाप्रमाणे आपला अग्नी चांगला असतो व अन्न चांगले पचते.

तसे बघितले तर थंडी असल्यामुळे आपल्याला ऊर्जेची अधिक गरज असते आणि हाच काळ असतो ज्यावेळेस शरीर असे पदार्थ चांगले पचवू शकतो. भारतभर दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ त्या-त्या स्थानिक ठिकाणी मिळणार्‍या किंवा पिकणार्‍या धान्यानुसार बनलेले असतात. म्हणूनच एकच पदार्थ थोडासा फरकाने अनेक ठिकाणी आढळून येतो. चकली म्हटले की ती भाजणीची, तांदळाची, मैद्याची, ज्वारीची, पोह्यांची अशी अनेक प्रकारे केली जाते. उपनिषदमध्ये चक्रीका अशा पदार्थाचा उल्लेख आहे.

तीच आताची चकली. तमीळ भाषेमध्ये ज्याला आपण मुरुकू म्हणतो. परंतु दिवाळीमध्ये महाराष्ट्रात चकली केली जाते ती शक्यतो भाजणीचीच असते. यामध्ये हरभरा, उडीद, मूग डाळ, पोहे, तांदूळ यांचा समावेश होतो. वर्षभर कुठलीही चकली चालते. परंतु दिवाळीला भाजणीचीच चकली करतात महाराष्ट्रात. दुसरा पदार्थ जो आवर्जून दिवाळीत असायलाच पाहिजे म्हणजे लाडू. पूर्वी लाडवाला मोदक म्हणायचे. मोद म्हणजे आनंद देणारा लाडू. पण महाराष्ट्रात मोदक हे निराळेच.

उत्तरेकडील लड्डूचा काहीसा अपभ्रंश म्हणजे लाडू. मात्र लाडू हवा तो रवा बेसनाचा, फक्त बेसनाचा किंवा फक्त रव्याचा. लाडवाचे आता हल्ली अनेक प्रकार दिसतात. त्यामध्ये सुक्यामेव्याची पण भर असते.फराळाच्या ताटात महत्त्वाचे स्थान असलेला एक पदार्थ म्हणजे करंजी. उत्तर प्रदेशातील गुजिया, छत्तीसगडमधली कुसली, बिहारमधले परुकिया, बंगालमधली पेडकिया किंवा गुजरातमधली घुगरा. अशा अनेक नावाने ओळखली जाणारी करंजी. येथे आवरण मैद्याचे किंवा कणकेचे असते आणि आत सारण खोबरे-पिठीसाखर, कधी सुकामेवा, खसखस यांनी बनलेले असते.

काही ठिकाणी जसे की कोकणात ओल्या नारळाच्या गूळ टाकून करंज्या केल्या जातात.कोकणातील अजून एक पदार्थ म्हणजेच कडबोळी. फारशा घरांमध्ये नाही परंतु कोकणात किंवा पुणे-मुंबईत अजूनही आढळून येते ते म्हणजे कडबोळी. कन्नडमधील कडबू ज्याचा अर्थ गोंधळ असा आहे. म्हणूनच कडबोळ्यांचा असा आकार असावा. तांदूळ, फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ नाहीतर भाजणीपासून बनवलेले हे कडबोळे लोणी टाकून करतात. चकलीनंतर हातात घेऊन खायला कडबोळी छानच.फराळाच्या थाळीतला एक अजून पदार्थ म्हणजे अनारसा.

जो करणे म्हणजे प्रत्येक सुग्रणीच्या पाक कौशल्याची परीक्षाच असते. हा अनारसा महाराष्ट्राशिवाय बिहारमध्ये आढळतो. फक्त दिवाळीत केला जाणारा किंवा अधिक महिन्यांमध्ये केला जाणारा अनारसा हा तांदळापासून गूळ किंवा साखर टाकून केला जातो.फराळाचा एक पदार्थ म्हणजे शेव. दिवाळीतील शेव म्हणजे थोडेसे जाड चविष्ट अशी असते. नाहीतर वर्षभर आपण शेव खातच असतो निरनिराळ्या पदार्थांमध्ये. परंतु दिवाळीतील शेवांची मजा काही वेगळीच असते. शेवांची उत्पत्ती ही रतलाम या शहरात झाली असल्याचे आढळते.शेवांचे पण अनेक प्रकार आहेत.

तिखट-फिकट, जाड, बारीक तसेच पालक शेव, लसूण शेव असे अनेक प्रकारची शेव बनवली जाते. यात गोड शेव किंवा गुडीशेव हा पण एक प्रकार दिसतो. हा जास्त करून गावांमध्ये दिसून येतो. फराळातील अजून एक पदार्थ म्हणजे चिरोटे. महाराष्ट्रातील चिरोटे किंवा कर्नाटकातील चिरोटी एकदम हलका असा गोड पदार्थ आहे. थोडाफार ख्वाजाशी मिळताजुळता परंतु आकाराने वेगळा. हल्ली बाजारात येणार्‍या बकलावासारखे हलके पण चहासोबत सुंदर लागणार हा पदार्थ आहे.

अजून एक पारंपरिक पदार्थ जो बराच काळाच्या पडद्याआड होत चाललाय म्हणजे खजुर्‍या. बाजरी आणि गव्हाच्या पिठात गूळ टाकून शंकरपाळ्यासारखा केलेल्या खजुर्‍या पौष्टिक तर आहेत परंतु या थंडीच्या काळात शरीराला ऊर्जा तसेच इतर पोषक तत्त्वे पुरवतात. लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही आवडणारा एक पदार्थ म्हणजे शंकरपाळे. मग ते गोड असतील, तिखट असतील, आकाराने मोठे असतील किंवा अगदी छोटे छोटे चिजलिंगसारखेदेखील असतात.

येता-जाता तोंडात टाकायला शंकरपाळे किंवा चहासोबत छानच लागतात. हे आहेत काही आपले पारंपरिक फराळाचे पदार्थ जे आपण दिवाळीला आवर्जून करतो. आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर हे पदार्थ पारंपरिक आहेत आणि आपल्याकडे पूर्वीपासून बनत आहेत. हे पदार्थ काहीजणांना वर्ज्य असतील त्यांनी ते कमी खावे किंवा टाळावे, जसे की मधुमेहींनी गोडाचा मोह कमी करावा किंवा हृदयरोग असलेल्या लोकांनी तळेलेले पदार्थ जपून खावे. ज्यांना घशाचा किंवा श्वासासंबंधित तक्रारी आहेत त्यांनी तेलकट पदार्थ जपून खावे. खाल्ल्यावर थोडे गरम पाणी घ्यावे. तरुण पिढीने किंवा ज्यांना काही त्रास नाही त्यांनी थोड्याफार प्रमाणात फराळाचे खायला काहीच हरकत नाही.

उलट या पदार्थांनी शरीराला हेमंत ऋतूत लागणारी ऊर्जा तसेच इतर पोषकतत्त्वे मिळतात. यात आपण वापरणार्‍या डाळींच्या मिश्रणातून चांगल्या प्रतीची प्रथिने मिळतात. आपल्या शरीराला लागणारे स्निग्ध हे तेल आणि तूप वापरल्याने मिळतात. वनस्पती तुपापेक्षा साजूक तुपाचा थोडासा वापर केला तर चांगलाच असतो. पदार्थांमध्ये वापरणारे खोबरे, खसखस, तीळ यातून कॅल्शियम मिळते. तर बाजरी, गूळ, डाळी यातून लोहदेखील मिळते. या फराळाच्या पदार्थातून मिळणारे पोषकतत्त्व जरी कमी-जास्त असले तरी यातून जो खाताना आनंद मिळतो तो जास्त महत्त्वाचा असतो. दिवाळीच्या आनंद उत्सवात भर घालतो. आपण खात असताना माईंड फूल इटिंग किंवा मन लावून तो जर पदार्थ खाल्ला तर तो शरीराला अपायकारक होत नाही.

फराळ हा तेलकट आहे किंवा त्यात जास्त साखर आहे असे म्हणत राहण्यापेक्षा तो कसा बनवला आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. आपण घरी करतो तो चांगल्या जिन्नसापासून बनवलेला असतो. आई, आजी करतात ते पदार्थ आपल्याला आवडणार्‍या चवीप्रमाणे बनवलेले असतात. बाजारात मिळणारे पदार्थ कदाचित दिसायला जास्त चांगले असतील परंतु त्यामध्ये वापरले जाणारे तेल, तूप, मैदा किंवा डाळींचे प्रमाण हे कमी-जास्त असते. तसेच त्यात इतर गोष्टी जसे की रंग, इसेन्सही असतात. काही वेळेस भेसळही असू शकते, म्हणूनच दिवाळीचे पदार्थ हे घरी करण्याची प्रथा आहे

.हल्ली ग्लोबलायझेशनमुळे आपण देशभरातील काय तर जगभरातील पदार्थ बनवतो आणि खातो; परंतु पारंपरिक पदार्थ हे आपल्या आजूबाजूला होणारे धान्य आणि तिथे मिळणारे पदार्थ यापासून बनलेले असतात, जे तिथल्या वातावरणात खायला अनुकूल असतात. म्हणूनच आपण आपल्या इथे म्हणजेच महाराष्ट्रात भाजणीची चकली, रवा-बेसनाचे लाडू, शेव, चिरोटे, कडबोळी, अनारसे करतो. हे पदार्थ असेच पारंपरिकरीत्या खाल्ले पाहिजे. दिवाळीत फराळासोबत आहाराचे नियोजन केले तर उत्तम. फराळ तसा पचायला जड. शर्करा आणि स्निग्धयुक्त असतो म्हणून आपल्या जेवणात पदार्थ निवडताना ते पचायला हलके असे निवडावे.

पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड पुरी, छोले अशा पदार्थांबरोबर फराळ पचायला अवघड जातो म्हणून असे जर जेवणामध्ये पदार्थ असतील तर त्यावेळेस फराळाचे पदार्थ खाऊ नये. एका वेळेचे जेवण थोडे हलकेच असावे ज्यामध्ये सूप, सार किंवा मुगाचे कढण आणि त्यासोबत पचायला हलके होतील असे पदार्थ जसे की फुलका आणि एखादी साधी परतवलेली भाजी आणि डाळ-आमटी किंवा मसाले भात आणि सार असे घ्यावे. आहारात त्यासोबतच कोशिंबीर, सलाड आणि फळांचा समावेश करावा. जेणेकरून पचन व्यवस्थित होईल आणि दिवसभराच्या कॅलरीज पण फार वाढणार नाही.

कुंदा महाजन.

- Advertisment -

ताज्या बातम्या