Friday, October 25, 2024
HomeUncategorizedधमाल मैदानी खेळांचे ते उनाड दिवस... - मोहन उपासनी

धमाल मैदानी खेळांचे ते उनाड दिवस… – मोहन उपासनी

मनसोक्त उनाडक्या करत, उन्हातान्हात गोट्यांचे डाव मैदानांवर एकेकाळी रंंगत असत. गुळगुळीत, रंगीबिरंगी गोट्या मैदानात भिरकावून दिल्या की मग धरला जायचा नेम, आपल्या आवडत्या गोटीवर. अर्जुनाला पाण्यातील प्रतिबिंब पाहून माश्याच्या डोळ्यावर निशाणा साधायचा होता, त्यावेळी तो जसा एकाग्र झाला होता, अगदी तसाच नेम आपल्या आवडत्या गोटीवर धरला जायचा. ते दिवस, ते खेळ, ती धमाल काही वेगळीच होती. या मैदानी खेळांनी दिलं सुदृढ शारिरीक व मानसिक आरोग्य…अपार आनंद…खिलाडूवृत्ती…

आजपासून 45 वर्षापूर्वीचे नाशिक आणि आताचे नाशिक…बरंच म्हणजे बरंच काही बदलून गेले आहे. थोडं बालपणात डोकावले मी…तर सहजच लक्षात आले की त्याकाळी आम्ही खेळत असलेले खेळ आणि आताच्या…अ‍ॅपल आय फोन आणि 5 जी, आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या पिढीतील मुलांचे खेळ यात जमीन आस्मानाचा फरक आहे. म्हणून या विषयाचा लेखप्रपंच…

- Advertisement -

माझ्या लहानपणी आम्ही अगदी मध्य नाशिकमध्ये म्हणजेच कानडे मारुती लेन येथे राहायला होतो. आणि अद्यापही आम्ही तिथेच राहतोय. तसं पहायला गेलं तर या पिढीतील लहान मुले, तरुणांची मित्र मंडळे, त्यांचे ग्रुप, क्लब आणि त्यांचे खेळ बघताना तसेच आपण दुसर्‍याशी सहज बोलून जातो, बघा आम्ही जी मजा केली ना लहानपणी त्याची सर तुमच्या या पिढीतील खेळाला, त्या आनंंदाला येणारच नाही …अगदी असंच काही मलाही आता जाणवू लागलंय. कारण आताच्या पिढीच्या हातात मोबाईल 24 7 आलाय. जोडीला कॉम्प्युटर असतोच. मग ओघाने त्यावरील तासन्तास खेळले जाणारे कुठलेही आउटपुट नसलेले पण सतत खेळून मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढविणारे हिंसक व्हिडिओ गेम्स आलेच. त्याशिवाय या पिढीचे बालपणच या मुलांसोबत त्यांचे पालकही इमॅजिन करु शकत नाही. तास न् तास एका जागेवर बसून, सतत त्या स्क्रीनकडे टक लावून पबजी किंवा त्या सदृश्य विविध कॉम्पुटराईज्ड हिंसक गेम्स तहानभूक विसरून खेळत असलेले अनेक बाल, कुमार आणि तरुण पाहताना मनोमन खूपच वाईट वाटले. कारण या अनेक तासांच्या मोबदल्यात त्यांना गिफ्ट मिळालेली एकमेव गोष्ट म्हणजेच जाड भिंगाचा आणि न शोभणारा चष्मा… कुठलाही शारीरिक व्यायाम या खेळातून होत तर नाहीच पण उलट अत्यंत नाजूक व महत्वाच्या अशा अवयवांपैकी एक असलेल्या डोळ्यांच्या आणि खूप किंमती असलेल्या मानवी बुद्धीची मात्र हानी होतेय हा विचार सारखा अस्वस्थ करत राहिला.

मग नकळत मन भूतकाळात गेले…आमच्या गल्लीत खेळांचा एकेक सिझन होता. त्या त्याप्रमाणे खेळ खेळले जायचे. सगळ्यांचा फेवरेट खेळ होता, तो म्हणजे क्रिकेट. जो बारमाही म्हणजे अगदी वर्षभर अगदी मनसोक्त खेळला जायचा. मात्र जिल्हा क्रिकेट वगळता आपण अन्य कुठेही सिलेक्ट न झाल्याची एक सल आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम करूनही, रणरणत्या उन्हातान्हात बेधुंद होऊन खेळताना पोळलेले अंंग, काळे पडलेले अंग एवढेच काय ते हाती लागले. पण एख मात्र छान झाले, या क्रिकेटमुळे. ते म्हणजे, क्रिकेटने आम्हाला सतत पळवलं. थांबू दिले नाही. त्यामुळे मिळालेला दमसाज (स्टॅमिना) आणि स्नायूंना मिळालेला पिळदारपणा ही मोलाची कमाई मात्र झाली. क्रिकेट खालोखाल गोट्या खेळणे हा तर आमचा जीव की प्राण. प्रचंड आवडीचा खेळ, स्वस्तात मस्त असा हा खेळ होता. बरं त्या गोटयाही इतक्या सुंदर दिसायच्या. चकचकीत, पाचूच्या रंगाच्या या गोट्या उचललो की चाललो मैदानात आम्ही. या गोट्यांमध्ये गलढाय, धुस , राजराणी आणि अन्य काही लोकप्रिय खेळ आम्ही खेळायचो. यात हार-जीत चालुच असायची. पण जी धमाल यायची, त्यातून व्यवहारही कळला आम्हाला.

आमच्या गल्लीत ज्याने पहिला टीव्ही घेतला ( तेव्हा ज्या घरात टीव्ही असायचा, ते श्रीमतांचे घर समजले जायचे.) त्यांचा मुलगा आमच्याकडून 5 गोट्या तिकिट म्हणून घ्यायचा, तेंव्हाच आम्हाला टीव्ही बघण्यासाठी त्याच्या घरात सोडायचा. यातून मला गोट्या ह्या किती होन ,मोहरा द्याव्यात तीतक्याच मूल्यवान होत्या असे मनोमन वाटायचे …माझे दोन मामेभाऊ या खेळातील एकदम पारंगत खेळाडू होते. धुस या आणि गलढाय या प्रकारात सुभाष आणि विनायक यांंच्याशी गल्लीतील कोणीही सहजासहजी गोट्या खेळण्यास धजत नसत.

कारण ते दोघेच हमखास जिंकणार हे ठरलेले असायचे. कारण त्यांच्यातील एकाग्रता ! दोघांचाही गोट्या खेळण्यातील नेम कमालीचा होता. म्हणजेच खाली बसून, हाताच्या तर्जनीमध्ये गोटी पकडून दुसर्‍याची गोटी ताडकन उडविण्यात सुभाषचा हातखंडा.. अगदी सांगितलेली गोटी तो तीन चार मीटर वरून सहज उडवायचा ! तर विनायक खाली गल खणलेली असायची, आपण जेवढा गोट्यांच्या डाव असेल त्या एका विशिष्ठ अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचे म्हणजेच सगळ्या हातातील गोट्या तिकडे गलीकडे फेकायच्या. गलीत म्हणचेच त्या छोट्या खड्यात जेवढ्या गोट्या जातील त्या तुमच्या. आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी तुम्हाला एक विशिष्ठ गोटीवर नेम धरून उडविण्यास सांगणार, ती जर तुम्ही नेमकी उडवली तर सगळ्या गोट्या तुमच्या. पण जर चुकून दुसर्‍या गोटीला जर स्पर्श झाला तर त्याला त्याकाळी गच्चू (फाउल) म्हणत. आणि संपूर्ण ढाय म्हणजेच गोट्या प्रतिपक्ष्याच्या होत असत. असे काहीसे नियम धुस या खेळातही होते. त्यात विनायक ताडकन नेमकी गोटी उडवायचा आणि हे दोघे दिवसाला 300/ 400 गोट्या जिंकायचे.

पण सगळ्यात वाईट गोष्ट अशी ्रहोती की, सनातनी, कर्मठ वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या घरात हे दोघे वाढलेले होते. म्हणूनच त्यांच्या घरात मात्र या गोट्या खेळण्याचे आणि ते किती जिंकतात याचे अजिबातच कौतुक नव्हते. उलट त्याचे आजोबा वाड्यात असलेल्या आडात सगळ्या जिंकलेल्या गोट्या फेकून देत. हळूहळू हे दोघेही गोट्या ढाकित (एका सुरक्षित जागेत) लपवून ठेवत. पण ती जागाही आजोबांनी हुडकून काढली तर गोट्यांची गच्छंती विहीरीत व्हायची …भविष्यात हा आड जर तेलविहिरी सापडव्यात तसा त्या काळातील लोकांना सापडला तर लक्षावधी गोट्या त्यातून सापडून गोट्या या हिरेमाणकांसारख्या वाटून अब्जोवधीचा खजिना गवसल्याचा आनंद त्या लोकांना निश्चित मिळेल असे मला मनोमन वाटते…

असो या खेळात सुद्धा सतत होणारी उठबैस हा व्यायामाचाच प्रकार होता आणि त्यातूनही शरीराला सुदृढता मिळाली हे आता प्रकर्षाने जाणवते. त्यानंतर येते ती पतंगबाजी. संक्रांतीच्या अगोदर आम्ही सगळे घरांच्या कौलावर, पत्र्यावरच मुक्कामीच असायचो. कारण दोन महिने पतंगबाजी सुरु व्हायची. तासन्तास, हवा नसतानाही पतंग उडवित राहण्याच्या आनंदातून आमचे खांदे मजबूत झाल्याचा विशेष आनंद आज मिळतोय.

हे असे धमाल खेळ रोज गल्लीत खेळून जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात मस्त कित्येक तास आम्ही मनसोक्त डुंबून राहायचो. पोहायचो. आनंदही दमसाज आणि मजबूत शरीरयष्टी प्रदान करून गेला हे तेवढेच महत्वाचे..गुलालवाडी व्यायाम शाळेत रोजचा मल्लखांब , कबड्डी, जिनमास्टिक आणि इतरही खेळ व्यायामदायी होते.चोरपोलिस खेळताना गल्लीचे मर्यादित क्षेत्र नव्हते तर अगदी सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ ते गंगाघाट असा विस्तीर्ण अवकाश होता. त्यामुळे पकडापकडीच्या या खेळात खूप पळणे व्हायचे, यामुळे शरीर कमावता आले आमच्या पिढीला. घोडी घोडी हा लाँगजम्पचा खेळ तर सुई सुई हा नेमबाजीचा खेळ हे ही खेळ आम्ही खेळलो. हल्लीच्या पिढीत मात्र नक्कीच कुठेही हे लोप पावलेले आरोग्यदायी , शरीराला व्यायाम मिळवून देणारे खेळ खेळले जाताना दिसत नाहीत. काळाच्या ओघात सगळेच खेळ लुप्त झाल्याचे आणि हानिकारक मुलांना हिंसक बनविणारे खेळ त्यांच्या जागी आल्याचे मनोमन वाईट वाटतेय.

– मोहन उपासनी

(लेखक प्रसिद्ध बासरीवादक आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या