Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedस - सणांचा सकारात्मक संदेशाचा - सुहासिनी रत्नपारखी

स – सणांचा सकारात्मक संदेशाचा – सुहासिनी रत्नपारखी

आपले सण, आपले उत्सव हे आपल्या रोजच्या जगण्यातील, रोजच्या जीवनातील मरगळ झटकून नवा उत्साह, चैतन्य, आशा, जोश देण्याचे काम करतात. मुख्य म्हणजे या सणांच्या निमित्ताने माणसं माणसांपर्यंत पोेहोचतात. त्यामुळेच या सणांना सामाजिक, कौटुंबिक पातळीवर अनन्यसाधारण महत्व आहे. विशेष म्हणजे ऋतुनुसार या सणांची असलेली आखणी ही तर आणखीनच कौतुकाची बाब आहे. किती सखोल विचार या सणांच्या परंपरेमागे आहे. विविध सणांच्या निमित्ताने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची पूजा करून आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करता, ही देखील सर्वात विलक्षण गोष्ट….

उठी श्रीरामा, पहाट झाली किंवा उठी गोविंदा, उठी गोपाळा अशा भुपाळ्या जिथे गायल्या जातात, तो आपला देश भारत. भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण होणारा. सूर्योदयाच्या तेजाने आपली सकाळ होते तर सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो, तो रात्री प्रकाश मिळावा म्हणून. भारतात अनेक राज्य, अनेक पंथ, अनेक धर्म अशी विविधता असली तरी तेजाच्या प्रकाशात सगळेच न्हाऊन निघतात.

- Advertisement -

आपल्या भारतीय संस्कृतीत सणांचे महत्त्व आहे ते वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर उत्साह वाढवण्यासाठी. विविध सणांच्या निमित्ताने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची पूजा करून आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ईश्वरीय शक्तीपुढे नतमस्तक होतो आपण.

सण हे आपल्याला शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक, कलात्मकदृष्ट्या समृद्ध करतात. आपल्या देशात कोणताही सण असला की रांगोळी काढली जाते. अनेक ठिपके एकमेकांना जोडून छान सुरेख सुबक रांगोळीचे रेखाटन होते. यातून एकमेकांना जोडून घ्या हा संदेश मिळतो. त्याच रांगोळीत विविध रंग भरले की, रांगोळी आकर्षक दिसते. असेच एकमेकांकडून चांगले गुण घेऊन आणि तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक होऊ द्या, हा संदेश मिळतो. सण जवळ आला की घरात आणि बाहेर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असते. एक प्रकारचं चैतन्य जाणवतं. सण ज्या ऋतूत असतो त्या ऋतूत निसर्गाकडून मिळणारी फळे, फुले, भाज्या याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शरीरावर, मनावर, बुद्धीवर सकारात्मक बदल घडतो तो या सणावारांच्या आहारातून. ऋतूनुसार आहार हे समीकरण आपल्याला समृद्ध करते. प्रत्येक सणाला वेगळा पदार्थ असतो नैवेद्याला.

ग्रीष्म ऋतूत आंबट-गोड पदार्थ, वर्षा ऋतूत वाफवलेले, पचनाला सुलभ पदार्थ तर थंडीच्या दिवसात थोडे जड आणि गोड पदार्थ अशी साधारण विभागणी असते सणांच्या निमित्ताने केले जाणार्‍या पदार्थांची.

यानिमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, पाहुणे यांचे घरी येणे होते. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा होतात. हास्यविनोदाने घर भरून जाते. एकमेकांना टाळ्या देत, आवाज करत अनेक कामे सहजतेने केली जातात. यातून कळत नकळत घरातील मुले शिकत जातात, समृद्ध होतात.

संवादातून आपुलकी वाढते. सुखदुःखाच्या गोष्टीतून माणसं एकमेकांना कळतात. विचारांच्या कक्षा रुंदावतात. सणांच्या निमित्ताने सकारात्मक ऊर्जा सर्वत्र भरून राहते, ती अनुभवायला मिळते.

आपली समाज रचना ही बारा बलुतेदार पद्धतीवर आधारित आहे. सोनार, कुंभार, लोहार, सुतार, माळी,…. अशा अनेकांच्या सहकार्याने, सहभागाने आपण येणारा सण आनंदाने साजरा करतो. सणांकरता लागणार्‍या वस्तू पाने, फुले, सुगडी, बोळकी, माठ, करा, कलश, घट, पणत्या, परड्या, रांगोळ्या, देवी- देवतांचे वस्र, आसन, अशा अनेक वस्तू, पदार्थ, दागिने, फुले, कपडे, सजावटीचे सामान अशा गोष्टींची मोठ्या प्रमाणात विक्री आणि खरेदी होते. यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. सगळ्यांच्या चरितार्थाची सोय होते.

नवीन घराचे बुकिंग करणे, फर्निचरची खरेदी, वाहन खरेदी यामुळे बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होते. अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते.

सणांचे दिवस सगळ्यांचे आनंदात आणि उत्साहात संपन्न होतात. आपली भारतीय संस्कृती त्यागावर आधारित आहे. फक्त भोगवादी नाही. त्यामुळे दान करा, देत रहा हा संदेश पण पुढे जातो. सणांच्या निमित्त ब्राह्मणाला जेवायला बोलावणे, मेहूण बोलावणे, कुमारी पूजन, सवाष्णींची ओटी, दाराशी येणारा वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, नंदीबैल घेऊन येणारे भोपे, अमावस्या मागणार्‍या ताई, देवी नवरात्र जोगवा मागणार्‍या ताई, डोंबारी ….अशा अनेकांना दान करा, ते त्यांच्या चरितार्थाचे साधन आहे. सण हे निमित्त आहे. दिलं की मिळतं असं सांगितलं जातं आपल्याला. ज्याप्रमाणे भिंतीवर आपण चेंडू फेकला की तो परत आपल्याकडे येतो, तसंच दानाचं असतं. चांगल्या मनाने चांगल्या भावनेने दिलं की आपल्याला मिळतं तेही चांगलंच… असे सकारात्मक संदेश आपल्याला सतत मिळतात.

आपले दर महिन्याचे सणांचच बघा ना… चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आपली नवीन वर्षाची सुरुवात घराघरांवर गुढ्या उभारून, तोरण लावून, रांगोळ्या काढून आपण उत्साहाने घर सजवतो. चैत्र आणि वैशाखातील उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून शारीरिक आरोग्यासाठी थंडगार माठातलं वाळ्याचे पाणी, कैरीचं पन्ह, विविध सरबते, आंब्याचा रस, श्रीखंड …अशा अनेक पदार्थांचा आपण आस्वाद घेतो. त्यामुळे मनही उल्हासित होते.

ज्येष्ठातील वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आपण. जे वडाचे झाड भरपूर प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन देते त्याच्याप्रती असते ही कृतज्ञता. आषाढ महिन्यातील व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. जे आम्हाला ज्ञान देतात ते गुरु. त्यांचे स्मरण करुन पूजन करण्याचा, त्यांना वंदन करण्याचा दिवस.

आषाढ अमावस्या निमित्ताने दीपपूजा करतो. बाहेर काळोख दाटून आल्यावर घरातील दिवे आपण पेटवतो, त्यांच्यामुळे प्रकाश मिळतो म्हणून त्या दिव्यांचे पूजन केले जाते. श्रावण, भाद्रपदात सणांची रेलचेल असते. मंगळागौर, हरतालिका, गणेशोत्सव यानिमित्त निसर्गातील औषधी वनस्पतींची ओळख होते. आणि त्या पत्री पूजनाला वापरतो. निसर्गाच्या सानिध्यात खेळही खेळतो. नागपंचमी, पोळा, यानिमित्ताने प्राण्यांची पण पूजा करतो. त्यांच्याप्रति कृतज्ञता असते ही आपली.

भाद्रपदात गणपती आणि महालक्ष्मी पूजन असते. महालक्ष्मी पूजनाला दोन सवाष्णी बोलावतो आपण. एक सोवळ्यातली आणि एक ओवळ्यातली. म्हणजेच काय… भेदभाव करू नका आपण सगळे समान आहोत, असे समजते आपल्याला.

अश्विनातील देवी नवरात्र उत्सव. परडीतील माती ही पृथ्वी, कलशातील पाणी (जल) म्हणजे आप, दिवा हे तेज, वायू सर्वत्र भरून आहे आणि कलशावर वरून (आकाशातून खाली) सोडतो ती माळ अशी ही पंचमहाभूतांची पूजा भक्तीने केली की शक्ती वाढते. प्रसन्न अंतकरणाने आरती करतो आपण. षड्रस अन्ने नैवेद्यासी ही ओळ आहार कसा असावा हे सांगणारी आहे. तिखट, खारट, आंबट, गोड, कडू, तुरट अशा या सहाही रसांनी परिपूर्ण आपला आहारा असावा असे सुचवले जाते. नऊ दिवस – नऊरात्र दिवा अखंड तेवत असतो घरात तो घरातला आणि मनातला अंधार दूर करण्यासाठी. वाट दाखवण्यासाठी. मन सशक्त करण्यासाठी. मनातील भीती नाहीशी करण्यासाठी. दिव्याच्या त्या शांतपणे तेवणार्‍या स्निग्ध ज्योतीकडे पाहत राहिलं तर मन खरंच शांत आणि स्थिर होतं, हे अनुभवता येतं. दिव्यावर काजळी धरली, ज्योत मालवली, तरी त्याच स्थिर आणि शांत मनाने वातीची काजळी काढून पुन्हा ती वात पेटवली जाते. यात शकून – अपशकुन असा काहीही भाग नसतो. श्रद्धा असावी – भीती नसावी हे खरं नवरात्र.

दवाळी हा तर सणांचा राजा. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्षमी, धान्य लक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, राजलक्ष्मी या अशा विविध रूपात असणारी लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. कार्तिक प्रतिपदेला पाडवा तर द्वितीयेची भाऊबीज. अभ्यंगस्नान, सुवासिक तेल, उटणे, सुगंधी साबण, फराळाचे पदार्थ, फटाके, कपडे, पाहुणे, पणत्या, रांगोळ्या, दिव्यांची रोषणाई हे सारं काही आपला उत्साह वाढवते.

मार्गशीर्ष महिन्यातील श्री विष्णूचे पूजन आणि गुरुवारी लक्ष्मी पूजन आवर्जून केले जाते. पौष महिन्यातील मकर संक्रमण बदल सांगते निसर्गातला. ऊस, बोरं, हरभरा, गहू, गाजर, मटार, हे नवीन धान्य, भाज्या याच काळात बाजारात येते. त्याची पूजा केली जाते. वाण म्हणून ते सवाष्णींना दिलं जातं. तिळाचा स्नेह, गुळाची गोडी हे एकमेकांना जोडून ठेवा हे सांगते संक्रांत. तसेच आपली शेती, त्याचा नवीन हंगाम, त्याचं उत्पादन यांचा सन्मान करा असे पण सांगते बरं का !

माघ महिन्यातील महाशिवरात्र शंकराची उपासना आणि भक्ती करायला सांगते तर माघी गणेश जयंती गणपतीची भक्ती आणि उपासना करायला सांगते. फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा, धुळवड, रंगपंचमी. होळी पेटवून सर्व अमंगल जळून जाऊ देत अशी कामना असते. गायीच्या शेण्याच्या गोवर्‍या, एरंडीच्या फांदीने वातावरण शुद्ध होते. होळीच्या राखेने धुळवड खेळून आनंद लुटला जातो. रंग एकमेकांना लावून रंगपंचमी साजरी करतात. समाजाला एकत्र आणणारा सण आहे हा.

संयम शिकवणारे, त्याग शिकवणारे, भक्ती जागवणारे, शक्ती प्रदान करणारे हे सण आपले आयुष्य समृद्ध करतात. भारतातील सर्व राज्यात वेगवेगळ्या प्रकारे असे अनेक सण, उत्सव, व्रतवैकल्ये साजरे केले जातात ते व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला भक्कम करण्यासाठी, सुद्धृड करण्यासाठी.

– सुहासिनी रत्नपारखी

(लेखिका राष्ट्रसेविका समिती शहर कार्यवाह आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या