Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedपरंपरेचा अन्वयार्थ... - स्वानंद बेदरकर

परंपरेचा अन्वयार्थ… – स्वानंद बेदरकर

परंपरा ही नेहमी शुद्ध स्वरूपाची आणि काळानुरूप नव्या तेजाला प्रकट करणारी असते. त्यामुळे रूढी, परंपरा अशी सांगड घालत स्पष्टीकरण करणे हे चुकीचे आहे. दोन्ही स्वतंत्र गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळी परंपरांचे बलवत्तर असणे नेहमीच अधोरेखित होत राहील. एखाद्या परंपरेत नव्या काळानुसार, नव्या काळाच्या नियमानुसार बदल होत असेल तर त्या बदलासह ती परंपरा जपली जाणे गरजेचे असते. जर तसं झाले नाही तर यामुळे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर नुकसान होत असते. परंपरेकडे सजगतेने पाहा…

ज्या काळात आपण जगतो, वावरतो आसपास घडणार्‍या घटनांकडे पाहातो ते त्या त्या काळाचे प्रतिबिंब असते, असे आपण म्हणतो; मात्र खरंच तशीच स्थिती असते का ? की त्या पाठीमागे एक नव्हे दोन नव्हे अनेक पिढ्यांची काही एक बरी-वाईट परांपरा उभी असते ? हा विचार समजून घेत समंजस किंवा असमंजसपणाने वागणारी माणसं जेव्हा पुढे जातात तेव्हा बघणारे लोक नेहमी म्हणतात की, त्यांना विचारांची परंपरा कुठे आहे किंवा यांच्या विचारांची परंपरा हीच आहे. विचार चांगला असेल अथवा वाईट, देशहितासाठी महत्त्वाचा असेल अथवा नसेल तो विघातक असेल अथवा प्रगतीच्या दिशेने देणारा असेल काहीही असले, तरी त्याला जोडून येणारा परंपरा हा शब्द मात्र काहीतरी वेगळे सुचित करतो.

- Advertisement -

आम्ही परंपरा मानत नाही आणि आम्ही परंपरा मानतो असे दोन भिन्न-भिन्न गट समाजात दिसतात. त्यांच्याबद्दल जाणून घेताना मला एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे की कोणताही माणूस हा परंपरेच्या बिंदूपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. तो कुठल्या ना कुठल्या परंपरेच्या रांगेत उभाच असतो. ती परंपरा स्वीकारण्याचे व नाकारण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात. ते त्यांनी वापरावेदेखील; पण मग मी परंपरा मानत नाही या त्याच्या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही. म्हणून मी आता या निष्पत्तीपर्यंत आलो आहे, की जगातला कुठलाही माणूस हा परंपरेच्या रांगेतच उभा असतो. भारतीय परिप्रेक्ष्यात याचा विचार करायचा झाला, तर आपल्याकडे एक ना अनेक परंपरा आहेत. परंपरा म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचे, तर जगण्याची रीत असे म्हणता येईल. माणसं सश्रद्ध असली तर म्हणतात, आम्ही परंपरेला धरून आहोत आणि अश्रद्ध असली तर मग आम्ही परंपरा नाकारतो असे म्हणतात; पण नाकारणार्‍यांच्या हे लक्षात येत नाही की, परंपरा नाकारणार्र्‍यांची जी परंपरा आहे त्याचाच ते पाईक होत असतात. म्हणजे परंपरा सुटत नाही हे खरे.

परंपरा या लोकांच्या जगण्या-वागण्या-भोगण्यातून तयार होतात. जादूची कांडी फिरवली की त्या प्रत्यक्षात येतील वा लुप्त होतील असे होत नाही. निदान सलग तीन-चार पिढ्यांचे त्या विशिष्ट परंपरेकडे दुर्लक्ष झाले तर आणि तरच परंपरा नष्ट होत जाते. त्यामुळे मागच्या पिढीने जरी एखाद्या चांगल्या परंपरेकडे लक्ष दिले नाही आणि हे येणार्‍या नव्या पिढीच्या लक्षात आले, तर त्यांनी ती जपायला हवी. तिचे पुनरुज्जीवन करायला हवे. हे पुनरुज्जीवन करताना विद्यमान काळ आणि परंपरेचा जुना म्हणजे प्राचीन काळ यांचे हस्तांदोलन कसे होईल हे पाहाणे गरजेचे ठरते. असे झाले तरच पुढच्या काही पिढ्या तो बदल, ती परंपरा टिकून राहायला मदत होते. नाहीतर बुरसटलेले विचार किंवा बुरसटलेल्या परंपरा म्हणून येणारा काळ त्या काळाची अपत्य असणारी माणसं त्याचा विचार हा कालबाह्य पद्धतीने करत राहातात. म्हणूनच एखाद्या परंपरेत नव्या काळानुसार, नव्या काळाच्या नियमानुसार बदल होत असेल तर त्या बदलासह ती परंपरा जपली जाणे अत्यंत गरजेचे असते. असे झाले नाही, तर चांगल्या गोष्टी हळूहळू नष्ट होत आपण फक्त वांगल्या विचारांना ओंजळीत ठेवून जगत राहातो आणि यामुळे वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आणि राष्ट्रीय जे नुकसान व्हायचे ते होते. म्हणूनच लोकपरंपरा, लोकभाषा, लोकसाहित्य, लोकनीती ते लोकशाहीपर्यंत सारे काही समजून घ्यायला हवे.

परंपरांचे काळानुरूप स्वरूप सिद्ध केले तरच आपली पाऊले उत्कर्षाच्या दिशेने पडू शकतील. अर्थात हे करणे सोपे नाही. त्यासाठी काळाचा अभ्यास, काळाचे भान तो बदल करणार्‍यास असावे लागते. तसे ते नसेल तर अनेक जुन्या, चांगल्या तरल परंपरांचे केवळ ती न समजल्यामुळे कचर्‍यात रूपांतर झाल्याची अनेक उदाहरणे सांगता येतात.

याच विषयातला दुसरा मुद्दा म्हणजे परंपरा आणि वारसा यात आपल्याकडे नेहमीच गल्लत होताना दिसते. परंपरा या शब्दाला विचारांचे भक्कम अधिष्ठान आहे. वारसा या शब्दाच्या मुळाशी ते असतेच असे नाही. रक्तसंबंधाच्या नात्यातून मिळणारी परंपरेची शिदोरी त्या त्या व्यक्तीचा सक्षम-असक्षमतेनुसार पुढे जात असते. म्हणूनच परंपरा म्हणजे वारसा असे म्हणणे चुकीचे आहे. वारसा हा पणजोबा-आजोबा-नातू आणि मुलगा अशा पद्धतीने पुढे जातो. परंपरा ही विचारसंपृक्तच असते. त्यामुळे ती पेलण्यासाठी वारसदारांकडे परिपक्वता अथवा तेवढे वैचारिक बळ असावे लागते. अनेक कुटुंबांमध्ये वारसा हक्काने परंपरा चाललेल्या दिसतात; पण ती परंपरा पुढे चालवणे म्हणजे दरवर्षी फक्त ती एक कृती करत राहाणे उरते. त्या कृतीच्या मागचा विचार केव्हाच संपलेला असतो. असे होता उपयोगी नाही. जर एखाद्या परंपरेचे वैचारिक दायित्व आपण निभावू शकत नसू तर ती परंपरा सांभाळू शकणार्‍या दुसर्‍याला आपण ती देऊ शकलो पाहिजे आणि हा नियम सगळ्याच बाबतीत लागू आहे. उदाहरण घ्यायचे झाले, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतला सूर्यप्रकाश म्हणजे तेजस्वी विचार पुढे नाशिकच्या भूमीत स्वातंत्र्यशाहीर गोविंदांच्या कवितेत, राजकवी चंद्रशेखर यांच्या कवितेत आणि त्यानंतर तो कुसुमाग्रजांच्या कवितेतही दिसला. त्यामुळे सूर्यपूजक कविता ही जी सावरकरांच्या कवितेची वैचारिक परंपरा आहे (ती त्यांनी वेद, उपनिषदे यांतून आणली) ती कुसुमाग्रजांनी तितक्याच ताकदीने पुढे नेलेली दिसते. विचारांचा सूर गवसून तो सूर नव्या काळात, नव्या पद्धतीने त्याचे जुने पवित्र ढळू न देता आळवता येणे म्हणजे परंपरा पुढे नेणे होय.

याच विषयात आणखी एक गल्लत होते ती रुढी या शब्दामुळे. रुढी आणि परंपरा एकच आहेत असे अनेक लोक म्हणतात; मात्र वस्तुस्थिती तशी नाही. रुढी श्रद्धा-अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असते, तर परंपरा ही नेहमी तटस्थपणे जीवनाचा अन्वयार्थ सांगणारी असते. रुढी माणसाच्या स्वार्थाच्या गोष्टींचा अंतर्भाव होऊन समाजापुढे आलेल्या असतात. रुढी पाळण्याचा आग्रह नेहमी धरला जातो. कौटुंबिक पातळ्यांवर तर अनेकदा रुढी पाळण्यामागे वर्चस्वाचा भाग अधिकांशाने असतो. जात, पात, धर्म, पंथ यांच्या स्वतंत्र रूढी त्या त्या समुदायाने, व्यक्तीने तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्या पाळताना इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, आपले स्वतंत्रपण, अस्तित्व काकणभर सरस असणे सिद्ध करता यावे यासाठी रुढीची व्यवस्था लावलेली दिसते. रुढींचा शोध घेणे, त्याचा अन्वयार्थ लावणे घडत नाही. अनेकदा तर देवाच्या नावाने त्याच्याभोवती कडे तयार करून एक प्रकारची भीती आणि त्या भीतीपोटी त्या रूढीची अंमलबजावणी असे कृत्य करून घेताना अनेक लोक दिसतात. त्यामुळे परंपरेचा संबंध रुढीशी नाही. परंपरा ही नेहमी शुद्ध स्वरूपाची आणि काळानुरूप नव्या तेजाला प्रकट करणारी असते. त्यामुळे रूढी, परंपरा अशी सांगड घालत स्पष्टीकरण करणे हे चुकीचे आहे. दोन्ही स्वतंत्र गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळी परंपरांचे बलवत्तर असणे नेहमीच अधोरेखित होत राहील.

– स्वानंद बेदरकर

(लेखक युवा साहित्यिक व प्रकाशक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या