Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedखाद्य संस्कृतीतून निरामय जीवनशैली... - तेजा परुंडेकर

खाद्य संस्कृतीतून निरामय जीवनशैली… – तेजा परुंडेकर

आपले सणवार, त्यानिमित्त केले जाणारे आणि ऋतु यांची अत्यंत सुरेख सांगड आपल्या खाद्यसंस्कृतीत आढळते. जगाच्या पाठीवर इतकी विविधता, आहाराबाबत इतका विचार कोणत्याच खाद्यसंस्कृतीत नसेल. प्रत्येक ऋतुतील उपलब्ध धान्य, भाजीपाला, त्याचा शरीराच्या निरोगी आरोग्यासाठीची उपयुक्तता याचा फार सुंदर मेळ या पदार्थांमध्ये दिसतो. शिवाय चवीला देखील हे पदार्थ अप्रतिम. इतका सुंदर ठेवा जर आपल्या खाद्यसंस्कृतीने दिला आहे तर त्याचा आनंदाने प्रचार-प्रसार आपण करायला हवा…

खरंच! आपल्या खाद्य संस्कृतीत विविध पदार्थांची रेलचेल आहे. मुळात भारतीय खाद्य संस्कृती म्हणजे काय ?…

- Advertisement -

जसजसा माणूस कळपाने लागला तसं तसे राहण्याचे, खाण्याचे, जगण्याचे नियम तयार करणे भाग पडले. आणि मग त्यांच्या म्होरक्यांनी, ऋषीमुनींनी त्याला धर्माचे अधिष्ठान देऊन त्यात सुसूत्रता आणायचे काम केले. पंचमहाभूतांची पूजा करून राहणारा माणूस मूर्तिपूजा करू लागला. सणवार कुळधर्म व वृत्तवैकल्ये याचा त्याच्या दैनंदिन जीवनात प्रवेश आला आणि मग उदयाला आली ती आपली खाद्य संस्कृती!….

भारताच्या विविध प्रदेशात असणार्‍या सणावारांवर याचा खूप प्रभाव दिसतो रोजच्या स्वयंपाकापेक्षा सणावाराचा स्वयंपाक हा खास असतो. आपल्या खाद्य संस्कृतीत देवाला नैवेद्य दाखवणे, त्याला त्यासाठी त्याला आवडतात ते पदार्थ करणे, खाली जमिनीवर बसून खाणे, केळीच्या पानावर अन्न वाढून खाणे, हाताने खाणे आणि अतिथी देवो भव! या उक्तीला अनुसरून माधुकरी देणे, दारी आलेल्या दान देणे, सणाला लोकांनी एकत्र जेवायला बसणे, ही आपली खासियत!!! स्थलकालाप्रमाणे यात भरपूर बदल होत गेले. पण आजही आपण विविध सणांना ठराविक पदार्थ करतोच करतो.

महाराष्ट्राच्या सणावारांबद्दल बोलायचे तर हे सणवार, उत्सव आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. आपला निसर्ग, देव देवता, मानवी नातेसंबंध यांच्या बद्दल कृतज्ञता, प्रेम, संवेदनशीलता दर्शवणारे आपले सण समाजाला एका समान बंधनात बांधतात हे नक्की….

सार्वजनिक उत्सव सोडले तर आपण या प्रथा परंपरा कुठलेही अवडंबर, दिखावा न करता साजरा करु या आणि त्यातील खाद्य संस्कृतीला वैज्ञानिक महत्त्व आहे हे लक्षात घेऊन निरामय जीवनशैली त्यातून निर्माण करू या.

हिंदू दिनदर्शिकेनुसार मराठी महिने,ऋतू आणि येणारे सण तसेच हंगाम लगेच लक्षात येतात.

एकूण सहा ऋतु: वसंत, ग्रीष्म,(उन्हाळा) वर्षा, शरद,(पावसाळा) हेमंत,शिशिर.(हिवाळा).

वसंत, ग्रीष्म, वर्षा ह्या पहिल्या तीन ऋतूनी उत्तरायण होते.त्याला अदानकाल असे म्हणतात. या काळात उष्णता जास्त असल्याने शारीरिक बल कमीकमी जाते .तसेच कदू तिखट तुरट ह्या रसांची वृद्धी होते. शरद, हेमंत,शिशिर ह्या तीन ऋतूनी दक्षिणायन होते त्याला विसर्ग काल म्हणतात. ह्या काळात शीतलता असल्याने माणसाच्या बलाची वृद्धी होते. आंबट खारट गोड ह्या रसांची वृद्धी होते.

आता ह्या सगळ्याचा आपल्या आहारावर आणि सणावर कसा परिणाम होतो ते बघू.

भारतीय वर्षाची सुरुवात होते ती वसंताच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजेच गुढीपाडव्यापासून. म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासू. ह्या दिवशी मुख्यतः कडुलिंबाचे सेवन आणि वापर केला जातो कडूलिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात मीठ ओवा साखर हिंग मिरे आणि नारळ , भिजवलेली डाळ घालून केलेली चटणीचे सेवन केले जाते तसेच कडुलिंबाची पाने आंघोळीच्या गरम पाण्यात घालून त्याने अंघोळ केल्यास त्वचा रोगांनाही आळा बसतो. या सणाला तसेच आपल्या जवळ जवळ प्रत्येक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. त्याचे कारण म्हणजे त्यासाठी लागणारा गुळ, हरभरा डाळ, गहू याची आपल्या प्रदेशात असणारी मुबलकता.आणि सगळ्यांना परवडणारी किंमत.

गव्हाच्या पिठात कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे तसेच फायबर, बी-कॉम्प्लेक्स, आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच कणिक आणि डाळ एकत्र केल्याने तसेच प्रथिने, अमिनो अ‍ॅसिड तुम्हाला मिळत असल्याने शरीरास अधिक फायदा होतो. तर गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही खनिजे असतात.

चैत्रातच आपण तृतीयेला चैत्रगौरीची पण स्थापना आणि पूजा करतो. हळदी कुंकू करतो. त्यावेळेस आपण कैरीचे पन्हे, कैरी घालून केलेली वाटली डाळ, भिजवलेले हरभरे यांचे सेवन करतो. याच वेळेस आपण माठ वापरायला सुरू करतो. त्यात घातलेल्या वाळ्याने उन्हाळा सुखकर होतो. बाजारात टरबूज खरबूज इत्यादी फळे येत असल्याने याही फळांचे सेवन आपण भरपूर प्रमाणात करू शकतो. चैत्रातच राम नवमीला सुंठवडा करतो. आणि पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा करतो.

त्यानंतर वैशाखात येते ती अक्षय तृतीया! या काळात तयार होणारे फळ म्हणजे आंबा ! अक्षय तृतीयेपासून आपण आंबा आणि आमरस खाण्यास सुरुवात करतो आणि पुढील दोन महिने खाऊ शकतो. या दिवसात जुने ज्वारी, बाजरी, गहू, मका ,मध ,जव इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.तसेच धने, जिरे ,यांचे पाणी आणि मुळा पालक गाजर मेथी पडवळ इत्यादी भाज्या खाव्यात. एकंदरच वसंत ऋतु हा ऊर्जा देणारा म्हणून आपण त्याचे मनापासून स्वागत करतो.

त्यानंतर येणारा ग्रीष्म ऋतू म्हणजेच जेष्ठ आणि आषाढ हे महिने. जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. बाराही महिने चोवीस तास ऑक्सिजन हवेत सोडणार्‍या वडाची म्हणून स्त्रिया पूजा करून उपास करत नसतील?

आषाढ महिन्यात येणारी पहिली एकादशी म्हणजे आषाढी एकादशी! यावेळेस शरीर आणि मनावरील संयम राखण्यासाठी उपास जरूर करावा, पण एकादशी आणि दुप्पट खाशी, असे न करता, पचायला हलके आणि तंतुमय पदार्थ खावेत. पाच तुळशीची पाने पण जरूर खावीत. उपास सोडताना पण हलक्या पदार्थांनी उपास सोडावा.

त्यानंतर येणार्‍या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणतात.एकंदरच ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या शरीराला पुढे येणार्‍या वर्षा ऋतूसाठी तयार करायचे काम आपले सण करतात. शेवटी येते ती दिव्याची आवस म्हणजे दीप अमावस्या अर्थात दीपपूजा. पूर्वी घरात इलेक्ट्रिसिटी नसल्याने पावसाळ्यापूर्वी घरातील सर्व दिवे कंदील इत्यादी गोष्टी घासून पुसून ठेवल्या जात तेच हे दीपपूजन! त्या दिवशी कणिक-गुळ एकत्र भिजवून, त्याचे दिवे करून उकडून त्याचा नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. पावसाळ्याची सुरुवात पाचायचा हलक्या उकडलेल्या पदार्थाने करतात. हे दिवे तुपाबरोबर खायची पद्धत आहे.

त्यानंतर भरपूर सणवार घेऊन येणारा ऋतू म्हणजे वर्षा! म्हणजेच चातुर्मासाची सुरुवात आणि त्याचे महिने आहेत श्रावण भाद्रपद. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा ह्या दिवसात अन्न पचनशक्ती मंद असते. शरीरातील वात वृद्धी होते. म्हणून पचण्यास हलका परंतु गोड, आंबट, खारट चवीचा, अशा सर्व चवीचा पण शरीरातील उष्णता आणि स्निग्धता वाढणारा आहार पथ्यकर असतो. यांत शिजवलेले अन्न ग्रहण करावे ,कच्चे सॅलड, पालेभाज्या ह्या किडींच्या असल्याने सावध असावे. गरम पाणी, मऊ भात-तूप, मुगाची खिचडी, भाज्यांचे गरम सूप याचा विशेष समावेश असावा. तसेच पचन क्रियेला जास्तीत जास्त आराम देण्यासाठी उपास करतात. या महिन्यात केलेले उपासतापास, व्रतवैकल्य यामुळे खरंच मनावर संयम राखला जातो आणि शरीरशुद्धीही होते . जिभेवर आणि मनावर ताबा ठेवल्याने आत्मसंतुलन आणि सात्विकता याचा उगम होतो.

म्हणूनच श्रावण महिन्यात तर प्रत्येक दिवस नुसता उत्साहाने भरलेला आणि भक्तीने भारलेला.श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शंकराची उपासना केली जाते. त्यावेळी फळे किंवा दूध सेवन करून उपास केला जातो. मंगळवारी नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र येऊन सकाळी मंगळागौरीचे पूजन करतात. संध्याकाळी हळदी कुंकू करून त्यात मटकीची उसळ, भाजणीचे वडे, नारळाची करंजी यांसारखा साधाच पण पौष्टिक मेनू असतो. रात्री जागरण असते. त्यानिमित्त नवीन नवरीची तिच्या वयाच्या युवतींची आणि इतर महिलांची ओळख होते.

बुधवारी बुध पूजन, गुरवारी बृहस्पति पूजन, शुक्रवारी जिवतीची पूजा आणि सवाष्ण भोजन, शनिवारी शनी देवाची पुजा, रविवारी आदित्य पूजन असे वेगवेगळे दिवस पूजापाठ आणि उपास तापास करून साजरे केले जातात. या काळात पचायला सोपे, सात्विक असे पदार्थ खाल्ले जातात. पूजेच्या निमित्त बेल-तुळशी दुर्वा, आघाडा, शमी अशी मुबलक प्रमाणात उगवलेली वेगवेगळी पत्री खुडून त्यांचे औषधी उपयोग माहित करून घ्यायची संधी आपल्याला मिळते.

याशिवाय श्रावणातले मुख्य सण म्हणजे नागपंचमी ! या दिवशी हल्ली आपण नागाची प्रतीकात्मक पूजा करून त्याला दूध लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवतो. शेतकरी बंधू या दिवशी शेतात नांगर फिरवत नाहीत, आपणही काहीही न कापता, न भाजता पुरणाचे दिंड करतो. कुठल्याही पद्धतीने जीव जांतूना इजा होऊ नये तर त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी हाच त्यामागचा हेतू.

त्यानंतर येणारी श्रीकृष्ण जयंती आणि दही हंडी म्हणजे तारुण्याचा उत्सवच! घराघरांतून आलेल्या ज्वारीच्या लाह्या, पोहे, धुवून दह्यात भिजवून त्यात भिजवलेले दाणे, डाळ, मिरची, कैरीचे आणि लिंबाचे लोणचे एकत्र करून तयार केलेला गोपाळ काला आपल्याला सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीची तर आठवण करून देतोच पण त्यानिमित्ताने केवळ अप्रतिम चवीच्या एक हेल्दी डिशची ओळखही होते.

त्यानंतर येणारी निसर्गचक्र लक्षात घेऊन कोळी बांधवांनी केलेली समुद्र पूजा म्हणजे नारळी पौर्णिमा.त्या दिवशी कोस्टल भागात मिळणारे मुख्य पदार्थ म्हणजे नारळ,गूळ आणि तांदूळ यापासून बनवलेला नारळी भात म्हणजे कमीत कमी घटक पदार्थ वापरून होणारा सुंदर पदार्थ.

त्याच सुमारास बहीण भावाच्या सुंदर भावबंधाचे प्रतीक म्हणजे राखी पौर्णिमापण आपण साजरी करतो.

श्रावणाची सांगता पोळा सणाने होते. शेतकरी बांधवांनी त्याचा जिवाभावाचा सखा बैलाची साग्रसंगीत केलेली पूजा आणि पुरणपोळीचा दाखवलेला नैवेद्य, म्हणजे आपल्या दैदिप्यमान संस्कृतीचे प्राणिमात्रांचे ऋण मानण्याचे प्रतीक!

आता भाद्रपद महिन्यात येणारे सण म्हणजे तर उत्साहाचा जल्लोषच. तृतीयेला येणार्‍या हरतालिका व्रताच्या दिवशी माता भगिनी ह्यावेळी कडकडीत उपास करून शिवलिंग आणि पार्वतीचे पूजन करतात.

त्यानंतर गणेशचतुर्थीला विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन होते. सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा सण! दीड दिवस ते दहा दिवस चालणार्‍या ह्या उत्सवात मोदकाचे विविध प्रकार आणि विविध पदार्थ ह्यांची रेलचेल असते. ह्याच दरम्यान येणारी ऋषी पंचमी म्हणजे ऋषी मुनींप्रमाणे व्रतस्थ राहून फक्त कंदमुळे आणि परसदारी आलेल्या भाज्या एकत्र शिजवून भगरीबरोबर खाणे म्हणजे संयमाची एक परीक्षाच !

त्यानंतर होणारे महालक्ष्मी किंवा गौरींचे आगमन म्हणजे स्त्रीत्वाच्या सर्जन शिलतेचा एक सोहळाच. गौरींंना माहेरवाशीण मानून अगदी साधी मेथीची भाजी आणि भाकरीचा बेत पहिल्या दिवशी असतो. दुसर्‍या दिवशी त्यांचे साग्रसंगीत पूजन होते. त्यादिवशी आपण सोळा भाज्या, पंच पक्वान्ने करतो. वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना नैवेद्य दाखवला जातो. घावन घाटल्यापासून ते सामिष आहार असा नैवेद्य असतो. आणि विसर्जनाच्या दिवशी खीर आणि कानोले करून त्यांना निरोप दिला जातो. गणपती विसर्जन वेळी कच्ची वाटली डाळ आणि खिरापत मोदक असा नैवेद्य असतो.

त्यानंतर येतो तो पितृपंधरवडा! आपल्यातून गेलेल्या पितराचे स्मरण करण्याचे हे पंधरा दिवस. त्या त्या तिथीला इतर पदार्थांबरोबर डाळीचे वडे, तांदुळाची खीर हे विशेषे पदार्थ असतात. त्यानंतर सुरू होते ते नवरात्र….म्हणजे देवीचा म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर…ह्या नऊ दिवसात पण फलाहार, दुग्धजन्य पदार्थ ग्रहण करणे,एक भुक्त राहणे, एक धान्य खाणे, उपास करणे, किंवा भाजलेले धान्य दळून आणून धान्य फराळ करणे इत्यादी प्रकार करून शरीरावर आणि पर्यायाने मनावर संयम पाळण्याचे सांगितले आहे. दसर्‍याच्या दिवशी बल वर्धक आणि स्नेहवार्धक श्रीखंड पुरीचा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. ह्याच काळात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी आपल्या भगिनी संध्याकाळी भोंडला,भुलाबाई यासारखे खेळ खेळतात. घरोघरचे वेगवेगळे पदार्थ त्यानिमित्ताने खायला मिळतात.

शरद ऋतूत प्रकुपित झालेल्या पित्तदोषाच्या शमनासाठी कोजागरीला चांदण्यारात्री मसाल्याचे दूध घेण्याची पद्धत आहे. शरद ऋतू म्हणजे आश्विन आणि कार्तिक हे दोन महिने. सूर्याचे दक्षिणायन! शीतलता असल्याने शरीरातील जठराग्नी प्रज्वलित करून, आंबट, तिखट खारट पदार्थांचे सेवन करून, पुढील वर्षासाठी बलकारक पदार्थ ग्रहण करणे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवणे हा मुख्य उद्देश.

त्यानंतर येणारी दिवाळी म्हणजे तर आपल्या खाद्य संस्कृतीचा परमोच्च बिंदू. थंडी असल्याने या दिवसात सगळेच अन्न चांगले पचते. सगळीकडे धन धान्याची सुबत्ता आणि स्थैर्य आल्याने प्रत्येकजण हा सण आनंदाने साजरा करतो. दिवाळीला गोड, तिखट, खारट तळलेले असे विविध पदार्थ केले जातात आणि तितकेच अगत्याने खिलवले जातात. आलेपाक, डिंकाचे, अळीवाचे लाडू शरीरात उष्णता आणि बल वृद्धी करतात. काकड आरती अन्नकोट साजरे करताना कुठेही हात आखडता घेतला जात नाही.

हेमंत ऋतू म्हणजे मार्गशीर्ष पौष हे महिने. मार्गशीर्ष महिन्यात येणारे खंडोबाचे नवरात्र म्हणजेच वांगे सट. चातुर्मासात ज्यांनी वांगी खायची सोडली असतील ते आता लसूण, कांदा आणि वांगी खायला सुरवात करतात. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला पण बहुतेक ठिकाणी उपास करतात. पौष महिन्यात येणार्‍या संक्रांतीला थंडी असते. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करणारे दोन पदार्थ म्हणजे तीळ आणि गुळाचे लाडू ,गुळाच्या पोळ्या, साखरेचा काटेरी हलवा यांचा नैवैद्य दाखवून ते आपापसात स्नेहवृद्धीसाठी वाटतात.

शिशिर ऋतू म्हणजे माघ फाल्गुन हे दोन महिने.माघी चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती ! यालाच तिलकुंद चतुर्थी पण म्हणतात. त्यावेळेस तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवितात. रथ सप्तमीपर्यंत हळदीकुंकू करतात.

एकूण काय तर त्या त्या ऋतूत तयार होणार्‍या विविध भाज्या, फळे धान्य,कडधान्य हे सगळे विचारात घेऊन त्याचा आपल्या उपयोग आणि विचार आपल्या सणावारांमध्ये करून त्यांची आरोग्यास उपकारक अशी आखणी आपल्या पूर्वजांनी केली आहे .महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात तिथे जी स्थानिक पिके होतात त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून ते ते पदार्थ त्या त्या सणाला जरूर करून खावेत.

– तेजा परुंडेकर

(लेखिका प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि पाककला तज्ज्ञ आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या