Monday, November 18, 2024
HomeUncategorizedदीपोत्सवातील आरोग्य उत्सव - वैद्य विक्रांत जाधव

दीपोत्सवातील आरोग्य उत्सव – वैद्य विक्रांत जाधव

आपले सण, त्यांची ऋतुनुसार खाद्य परंपरा खरंच महान आहे. दीपोत्सवात केले जाणारे पदार्थही ऋतुशी सांगड घालणारेच आहेत. मात्र या पारंंंंपरिक पदार्थांबरोबच आयुर्र्वेेदाभ्यानुसार काही पाककृतींची जोड या फराळा देता आली तर? भन्नाट आहे ना आयडिया ?

दिवाळी म्हटली की, उत्सव आणि उत्सव म्हटले तर तो खाद्यौत्सव असे मी नाही शास्त्र म्हणते. श्रावण महिन्यापासून सुरु होणार्‍या सणवारांमध्ये खाद्य परंपरेची वैविध्यता दिसून येते. श्रावणानंतर गणेशोत्सव, पितृ पक्ष, नवरात्रीपर्यंत हा खाद्योत्सव अखंड सुरु असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या मसाला दुधानंतर वेध लागतात ते दिवाळीतील खाद्योत्सवाचे.

- Advertisement -

सण आणि त्यानिमित्त होणारा हा क्रम पाहिल्यास इथे ऋतू विचार, आरोग्य विचार दिसून येतो. पावसाळ्यात अग्नी मंदावलेला असतो. त्यानुसार आखलेला लघु आहार, सहज पचन होईल असा आहार, त्या मधील श्रावण उपवास म्हणजे लंघनच… यावरुनच आपल्या पचनशक्तीला आराम मिळेल अशी ही या काळातील आहाराची पद्धती दिसून येते. हळू हळू वातावरण कोरडे होऊ लागते. अग्नी प्रदीप्त होऊ लागतो. आणि खाण्याच्या नियमांचे बंधने सैल होऊ लागतात. त्या वातावरणाची साथ घेऊन शरीरातील अग्नी विचार ( त्याला आधुनिक भाषेत apetite, digestion असे म्हणता येईल ) असा आरोग्य विचार करून धर्म शास्त्राने निरोगी शरीरासाठी केलेली आखणी होय.

ग्रीष्म ऋतूत येते दिवाळी. शरीरात अग्नी प्रदीप्त होतो. अति पोषक पदार्थांचे शरीरासाठी, आरोग्यासाठी, प्रतिकार क्षमतेसाठी नियोजनच दिवाळी करुन येते. आणि म्हणूनच दिवाळीचे अभ्यंग स्नान, जे वाताला प्रतिबंध करणारे आहे, अग्नी वाढवणारे आहे, ते झाल्यावर आपल्या समोर येते ते फराळाचे ताट. या फराळात लाडू काटेरी, खमंग चकली, खुसखुशीत करंजी, जाळीदार अनारसे, तोंडाला चव आणणारी ओवा घातलेली तिखट शेव, चुरचुरीत चिवडा, गोडाचे प्रकार अशी विविधता दिसून येतात .

शास्त्राचा विचार करता हे पदार्थ खूपच छान दिसतात. हे पदार्थ पचण्यासाठी आणि ते शरीरासाठी उपयुक्त पडायला ज्या अग्नीची आवश्यकता असते तो हिवाळ्यात म्हणजे थंडीत असतो. म्हणूनच दिवाळीच्या या पदार्थांमध्ये खोबरं, खवा, मैदा ( हा पदार्थ शास्त्रातील वेगळा असावा जो आज उपलब्ध आहे.अभिप्रेत नाही) विविध मसाल्याचे पदार्थ अशा घटकांचा आणि तळणासारख्या प्रक्रियांचा समावेश आढळतो. थोडे पचायला कठीणपासून ते पचायला अगदी जड अशी विविधताही या पदार्थांमध्येे दिसते. एक विशेष जाणवते, ते म्हणजे बरेच पदार्थ हे तळलेले असतात.

दिवाळी हिवाळ्यात येणारा सण आणि या सणांच्या दिवसात शरीराला आवश्यकता असते ती स्नेहाची, आपल्या शास्त्रात तूप, तेल , वसा, मज्जा हे स्नेह सांगितले आहेत. आपल्या शास्त्राने तूप , तेल्या स्नेहचा वापर केलेला आहे, शरीरातील साठलेला वात कमी करणे हे मुख्य कार्य स्निग्धतेने उत्तम घडून येते. शरीरातील रक्त, मौस, अस्थी, शुक्र या घटकांची वृद्धी होताना दिसून येते.

दिवाळीतील फराळाचे वर्णन आहार ग्रंथांमध्ये विविध नावाने केलेले दिसते. हा आहार ग्रंथ सुमारे 2000 वर्षे पूर्वीचा असावा. मात्र घटक आज जे आहेत ते मात्र पूर्वापारचे आहेत. चकली ही शरीरपोषक, चव आणणारी, मौस वर्धन करणारी असून शरीराला बळ देणारी आहे. करंजीत नारळाचे सारण/पुरण व त्या सारणातील घटक उदाहरणार्थ वेलची, काजू, खसखस (काही केशर ही टाकतात ) रक्त धातू वर्धन करणारी, मौस वर्धक, मज्जा वर्धन करणारी, शरीर स्निग्ध करणारी आहे. अनारसे हा पदार्थ अस्थी वर्धन करणारा, मौस वर्धन करणारा, पित्त कमी करणारा, रक्त धातू प्रसाधन कारण आहे.

लाडूचे अनेक प्रकार दिवाळीमध्ये केले जातात. पण जास्त आवडीने खाल्ला जातो तो बेसनाचा लाडू. खोबर्‍याचा / नारळाचा लाडू, रव्याचा लाडू आणि अहळीव खोबर्‍याचा लाडू, ह्या मध्ये सुक्या मेव्याचे प्रमाण हे प्रत्येक बनवनार्याचे वेगळे असते.लाडू चा मुख्य घटक बदलतो परंतु त्यतील इतर घटक जवळ पास सारखे दिसतात.बेसन लाडू..हा चवीला अगदी सुंदर पचायला थोडासा जड,पण मौस,मेदाचे वर्धन कारण वजन वाढवणारा,त्यात वेलची दालचिनी नसल्यास कफ वाढवणारा, यामध्ये साखरे ऐवजी स्टीविया ही नैसर्गिक साखर टाकल्यास अधिक उत्तम. सर्व गोड पदार्थ मध्ये स्टीवियाचा वापर केल्यास आरोग्याला हितकारी ठरते. लाडवात मध टाकून ते वळले तर अधिक उत्तम बांधले जातात आणि आरोग्यदायी ठरतात.

खोबर्‍याचा लाडू हा विशेष करुन मुले, स्त्रिया, वृद्ध व्यक्तींसाठी उत्तम असतो. वसंत ऋतूची सुरुवात होईपर्यंत याचे रोज सेवन करायला हवे. खोबरं हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. तसेच रक्त वाढवणारे असते. वात दोष, नाड्यांसाठी उत्तम असल्याने मुलांच्या बौद्धिक वाढीसांठी उत्तम कार्य करणारा घटक पदार्थ आहे. खोबर्‍यात काजू व अक्रोड टाकून लाडू केल्यास टाकल्यास बुद्धीवर्धन हे कार्य नेमकेपणाने घडते. रव्याचा लाडू हा रक्तवर्धन करणारा, गर्भिणीसाठी एक उत्तम, आणि रस वर्धन करणारा, चेहरा टवटवीत करणारा आहे, शरीराची झीज भरून काढणारा, चव आणणारा त्वचेला उत्तम असा आहे. अहलीव ( अळीव ) आणि खोबरं यांचा लाडू या ऋतुत सर्वोत्तम असाच आहे. ज्यांना उंची वाढवायची असेल अर्थात वयाच्या मर्यादेत त्यांनी याचे सेवन रोज करावे. गर्भिणीसाठी जीवन सत्व ड आणि अस्थिधातू म्हणजेच कॅल्शियमसाठी उत्तम. यामध्ये खोबरं असल्याने हाडं, त्वचा, केसांच्या आरोग्यासांठी अत्यंत उपंयुक्त आहे. अहलीव ( अळीवाची )खीर सर्वांना आवडेतच असे नाही पण हा लाडू सर्वांना आवडतो. लाडू करताना यात वेलची, दालचिनी, केशर, आवडत असल्यास दगडफूल, पीठीसाखर पण त्याला पर्याय नैसर्गिक साखर टाकावी, खजूर तर आणखीनच उत्तम. मनुकेही रक्तवाढीसाठी, पोटाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत, त्यामुळे ते घातले तरी चालतील.

एकूणच लाडू हा प्रकार शरीराची प्रतिकार क्षमता वाढवणारा, निरोगी ठेवण्यासाठी मदत करणारा, वर्षभर धातुंची झीज होऊ नये म्हणून कार्य करणारा पदार्थ आहे. फराळातील आणखी एक चवीन खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चिवडा. तिखट आणि चटपटीत चवीचा, तृप्ती देणारा, पचन शक्ती वाढवणारा आणि पुष्ठी देणारा तसेच पचनशक्ती सुधरवणारा आहे. पोहे, राजगिरा, साळीच्या लाह्या, मका, ज्वारी लाह्या यांचा चिवडा दिवाळीनिमित्त केला जातो. चिवडा व त्यातील घटक पदार्थ देखील मौस वर्धन ,शरीर पुष्ठी, तत्काळ तृप्ती, उत्तम पचन करणारे आहेत. चिवडा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी न घेतल्यास पचन उत्तम होते. हाच नियम लाडूसाठी लागू आहे. विविध आकाराच्या बर्फी हे दिवाळी फराळाचे आणखी एक वैशिष्ट्य. बर्फीतील घटकही त्याच हेतूचे म्हणजेच धातू वर्धन, तृप्ती-शक्तीवर्धन, थंडीतील व्याधी टाळणारे आहेत.

दिवाळीतील आहार हा सर्व भारतात तर-तम प्रमाणात सारखा असतो. यावरूनच दिवाळी या सणातील खाद्यसंस्कृतीचे नियोजन धर्मशास्त्राने शरीराची उजा र् वर्षभर वाढलेली राहावी, पचन उत्तम राहावे अवयवांची प्रतिकारक्षमता उच्च राहावी यासाठी केले आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. प्रदेश, स्थानिक गरज, आवश्यकता, मिळणारे पदार्थ यामुळे त्यातील घटक बदलतील पण शास्त्राचा हेतू ठरलेला आहे हे निश्चित.

दिवाळीतील आहार म्हणजे हेमंत ऋतुतील आहार असे मानावे. यात मौैसाहाराचा सुद्धा समावेश येतो. यात मसाल्याच्या वापर करून मौसला पचवण्याची पद्धत शास्त्राने सांगितली आहे.

गोड पदार्थ जे धातू वर्धक आहेत हे भारताचे वैशिष्ठ्य आहे. एव्हढे गोड खाणारा आणि पचावणारा भारतासारखा इतर देश नसावा हे अभिमानाने आपण सांगतो. भारतीय सण उत्सवांनी ज्या पद्धतीनेे आहांराची, पदार्थांची रचना करून आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला आहे तो इतर शास्त्रांमध्ये दिसून यते नाही. मात्र काही पाश्चात्य पदार्थांनी लहान मुलांच्या, युवा पिढीच्या जीभेचे चोचले पुरवायला सुरुवात केली आणि त्यांच्या आरोग्याचं गणित थोडे फिस्कटले आहे. आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी वयात समोर येऊ लागल्या आहेत. याचा विचार सर्व पालकांनी करायला हवा. दीपावली हा एक आरोग्यासाठीसाठी निर्मित खाद्य उत्सव आहे हे नक्की .

– वैद्य विक्रांत जाधव.

(लेखक ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या