Monday, November 18, 2024
HomeUncategorizedभरजरी आणि शालीन... - वंदना चिकेरूर

भरजरी आणि शालीन… – वंदना चिकेरूर

सामवेदापासून ते 21 व्या शतकापर्यंत भारतीय वस्त्र परंपरेला दैदीप्यमान इतिहास, अधिष्ठान लाभले आहे. संस्कृती, सन्मान, आपुलकी, प्रेम,आदर यांचे प्रतीक म्हणून आपल्या वस्त्र परंपरेकडे पाहिले जाते.त्याचबरोबर शालिनता, सभ्यता, नम्रता याचेही द्योतक म्हणून भारतीय वस्त्रपरंपरा जगात ओळखली जाते…नानाविध धागे, हातमाग, भरतकाम यांनी ही वस्त्र परंपरा महान बनवली आहे. त्याचबरोबर ही वस्त्रे परिधान करण्याच्याही अनेक पद्धती, प्रकार आपल्याकडे आहेत. त्यामुळे देखील ही वस्त्र परंपरा अनोखी ठरते. जगभरात भारतीय पारंपरिक वस्त्र प्रकारांना मागणी आहे…लोकप्रियता आहे…

वस्त्र ही मानवाची गरज असल्यामुळे वस्त्र परंपरेचा आढावा घेताना वस्त्र मानवाच्या उत्क्रांतीचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. भरजरी ग पितांबर दिला फाडून … द्रौपदीस बंधू शोभे नारायण… कृष्णाच्या बोटाला पितांबराची चिंधी करून बांधलेल्या द्रौपदीला पुढे अखंड वस्त्र पुरवठा करणार्‍या श्रीकृष्णापासूनची वस्त्र परंपरा आजही अखंड चालू आहे आणि असणार आहे.

- Advertisement -

माणसाच्या उत्क्रांतीपासून वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक बदल झाले. अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा विस्तारत गेल्या. माणसाने बुद्धी वापरून, कौशल्य मिळवून तीनही आघाड्यांवर वर्चस्व मिळविले. झाडांची पाने, साले यांचा वल्कले म्हणून वापर केला. पुढे शिकार करून प्राण्यांच्या कातडीचा वस्त्र म्हणून वापर केला. वाघाचे कातडे आणि हरणाचे कातडे यापासून थंडी ऊन पाउस आणि लज्जा रक्षण यासाठी सुरु झालेला हा प्रवास आज जगभरात वस्त्रोद्योगात झालेला अफाट आणि अचाट बदल आणि आर्थिक उलाढाल नक्कीच स्तिमित करतो.

रेशीम किड्यांपासून मिळालेलेे तलम धागे, मेंढीच्या लोकरीपासून बनलेला घागा किंवा केळीच्या सोपटापासून बनलेला चिवट धागा हे जगातील पहिले घागे. हे धागे विणण्याचे कौशल्य प्रथम स्त्रियांनी हस्तगत केले. ऋषी मुनींची परंपरा किंवा कालखंड पाहता गृत्समद ऋषींना कापसाचे प्रथम उत्पादन धागा निर्मितीचे श्रेय जात.

वेद उपनिषदांमध्ये इसावास्यम या उपनिषदामध्ये वास्यम या पदाचा अर्थ वस्त्राच्छादित करणे असा आहे. ऋग्वेदामध्ये जरतारी वस्त्राचा उल्लेख हिरण्यद्रपी म्हणून आला आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अनंत वल्कलांचा उल्लेख आहे. सोन्या चांदीच्या तारांचे जरी काम त्याचबरोबर हिरे, रत्न, माणके, मोती यांनी जडित वस्त्रे देव-देवता पुढे राजे राजवाडे, राजे महाराजे यांनी वापरल्याचा संदर्भ मिळतो.

मोहेंजोदारो हडप्पा संस्कृतीतील पुरुषांच्या अंगावरील एका खांद्यावरून घेतलेली शाल किंवा स्त्रीच्या कंबरेभोवतीचे वस्त्र हा ठसठशीत पुरावा आहे. शरीराचे सरंक्षण, लज्जा रक्षण आणि सौंदर्यवर्धन अशा विविध प्रेरणा वस्त्र परिधानामागे आहेत. सहाव्या शतकात चीनमधून आलेला पहिला प्रवासी आपल्या भारतातून रेशमाच्या धाग्यापासून बनेलेले वस्त्र ही महत्वाची विद्या चीनमध्ये घेऊन गेला. आज चीनमध्ये बनणारे रेशमी वस्त्र हे जगात प्रथम क्रमांकाचे ठरले आहे.

सामवेदात अंगभर वस्त्र म्हणजेच साडी याचा उल्लेख आहे. याचं सहाव्या सातव्या शतकाच्या आसपास पोर्तुगीजांनी भारतीय वस्त्र परंपरेबद्दल लिखाण केले आहे. पुरातन शिल्पे किंवां मंदिरातील मूर्तींच्या अंगावरील वस्त्र पाहता त्या त्या काळातील वस्त्र परंपरा समजते. अजिंठा, कार्ले, किंवा पितळ खोरा येथील लेण्यांमधील भित्तीचित्रे याची साक्ष देतात. स्त्रियांच्या मूर्तीचे निरीक्षण केल्यास दोन्ही पायांच्या मधोमध चुण्या करून कमरेला खोचलेली साडी पाहायला मिळते. याला उचा ( आता ओचा म्हणतात ) पद्धत म्हणतात. नुकत्याच गाजलेल्या बाहूबली चित्रपटात शिवगामी ही राणीची भूमिका साकारणार्‍या राम्या कृष्णन यांनी कुचा पद्धतीची रेशमी साडी परिधान केली आहे.

मधल्या काळात इस्लामी आक्रमणांनी भारतीय वेश भूषेत अनेक बदल झाले. आंतरवस्त्र, अधो वस्त्र आणि परी वस्त्र यात स्त्रियांसाठी चोळी, कंचुकी, साडी तर पुरुषांसाठी पितांबर, कद, धोतर, विजार, महमदी, झगा, अंगरखा, बाराबंदी, किनखापी, पगडी, पागोटे, मंदिल, फेटा, शिरपेच, पटका, दुपट्टा, शाल किंवा शेला अशी वस्त्रे होती.

अमीर खुस्रो या कवीने तलम वस्त्रांचे वर्णन करताना चंद्रासारखे शीतल, मुलायम, असे केले. बंगालमधील मलमल तर अगदी काड्यापेटीत दाबीत मावत असे. झुळझुळीत अस्सल रेशीम असे असावे की ते सुईच्या नेढ्यातून आरपार जावे, हा कडक संकेत होता. औरंगाबादची हिमरू, पैठणची पैठणी, शहागडची शागडी, धनवडची धौडी, जैनाबादची जैनाबादी, कालिकतचे कॅलिको आणि मसोलची मस्लीन या नावाने असंख्य वस्त्रे ओळखली जातात.

स्त्रियांच्या परिधानांबाबत काही संकेत किंवा प्रथा आहेत. निरनिराळे प्रदेश आणि जाती धर्मा नुसार यात वैविध्य आहे. मुलगी वयात येण्यापूर्वीचा पर्वंटा (परकर-पोलके), मुलगी वयात आल्यावर बाळी ही साडी, लग्नातले शालू पैठणी, सुन्मुखाची साडी, पहिल्या संक्रांतीची काळी चंद्रकळा, गर्भवती झाल्यावर नेसविली जाणारी हिरवी साडी, बाळाच्या बारशाला मिळणारी साडी, मुलाच्या लग्नात विहीणीने दिलेली साडी आणि मरण आल्यावर येणारी शेवटची माहेरची साडी बहुतेकांना ठाऊक असतील.

अजूनही लग्न समारंभात वस्त्रांच्या देवाण घेवाणीला फार महत्व आहे. वधूला लग्न लागण्याआधी तेल साडी घेतली जाते. लग्नात शालू तर लग्नानंतर तळी असे विविध प्रकार आहेत. लोकसाहित्यात वस्त्र परंपरांचे खूप छान वर्णन आढळते. काही अभंग, जात्यावरच्या ओव्या, सणांची गीते, गवळणी, लावण्या यातून अनेक वस्त्र संदर्भ मिळतात.

एखाद्याला अधिकार, सन्मान देतानां वस्त्र देणे हा शब्दप्रयोग रूढ झाला. उदाहरणार्थ छत्रपतींनी बाजीरावांना दिलेली पेशवाईची वस्त्रे. छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊनच सन्मानाने पाठवले होते.

काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राजाची स्वतःची वस्त्र परंपरा आहे. गुजरातचे हवामान वस्त्रोद्यागासाठी पूरक असल्यामुळे वस्त्रनिर्मितीचे मँचेस्टर ठरले आहे. दरम्यान, काश्मिरी स्त्रीचे लौनचारी, राहीदे, डोक्यावरचा रुमाल, पत्तू तर पुरुषांचे रिन्गोया, सुथान, गछांग हा वेश असतो तर आसामी लोक मुगां, मेखला, चादर, संपा, रिका, मिबू वापरतात. गुजराथी अंगरखा धोती साडी तर पंजाबी स्त्रिया पतियाला, सलवार कुर्ता धारण करतात. राजस्थानी स्त्रियांचा घागरा किंवा चनिया चोळी तर दक्षिणेत स्त्रियांचा साडीचा पेहेराव, पुरुषांचा सदरा धोती लुंगी हा पेहेराव असतो. हरियानवी स्त्री घागरयावर शर्ट घालते. केरळमधील पांढरी सोनेरी काठ असलेली साडी विशेष प्रसिद्ध आहे. मणिपुरी स्त्री इनापी आणि फानेक असे वस्त्र घालते. दाक्षिणात्य रेशमाच्या सद्या जवळ नाही अशी एकही भारतीय स्त्री सापडणार नाही.

कांजीवरम, कांचीपुरम, बांधणी, संबलपुरी, जमदानी, बनारसी, कासावू, मुगा सिल्क, तसर सिल्क, चंदेरी, पोचमपल्ली, म्हैसूर सिल्क, कांथा साडी, फुलकारी, मंगलागिरी, इक्कत, बाटिक, पटोला, लहरिया, इरी, बालुचरी, गढवाल, बोमकाई, उपाडा, व्यंकटगिरी, या सगळ्या साड्यांना जगभरात प्रचंड मागणी आहे. लहान मुलींपासून ते वृद्धे पर्यंत साडी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कॉलेज कन्यकासुद्धा पारंपारिक दिवसाला पारंपारिक वेशभूषा करतात. लहान मुली कल्पना साडी नेसून आनंदित होतात.

पारंपारिकतेबरोबर आधुनिक वस्त्र परंपरा जपणारी आपली भारतीय संस्कृती उत्तरोत्तर अधिकच प्रगल्भ आणि सौंदर्यपासक होत आहे.

– वंदना चिकेरूर

(लेखिका उद्योजिका व लेखिका आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या