Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedमहाराष्ट्राची लोककला...जपून ठेवा, वाढवू तिला... - वैजयंती सिन्नरकर

महाराष्ट्राची लोककला…जपून ठेवा, वाढवू तिला… – वैजयंती सिन्नरकर

लोककला…नावाप्रमाणेच लोकसहभागांची कला…लोकांसाठीची कला…लोकभावनांची कला…या लोककलेतून विचार, परंपरा, संस्कृती प्रचार-प्रसाराचे काम संतांनी सुरु केले होते. सहजसोप्या पद्धतीने सामान्यापंर्यंत पोहोचण्याचे म्हणजे लोककला आहे. त्यातील सौंदर्य, त्याचे महत्व जाणून घेतले तर लोककलेचा हा वारसा पुढे नेणे सोपे होणार आहे. कालौघात काही लोककला लोप पावल्या आहेत, तर काही टिकून आहेत…या सगळ्याच लोककलांचा नव्याने अभ्यास व नव्याने स्वीकार आपण करु या…

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा…

- Advertisement -

प्रणाम घ्यावा माझा, हा श्री महाराष्ट्र देशा…

असा हा महाराष्ट्र विविधतेने नटलेला आहे . त्यामध्ये लोककला या सर्वार्थाने महत्वाच्या दिसून येतात. त्यांचा विचार करत असतांना अनेक बाबी समोर येतात.

लोककलेचे महत्व आणि स्वरूप ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे लोककलांची निर्मिती ही मानवी संस्कृतीच्या अगोदर असून त्याचे अस्तित्व समाज जीवनात संस्कृतीच्या निर्मितीच्या अगोदरच आहे. त्यातूनच संस्कृतीची निर्मिती आणि विकास हा विचार पुढे आला. कलेचा मूळ गाभा म्हणजेच लय. लय हे जीवनाचे सार आहे. त्यातूनच कलांची निर्मिती होते. पारंपारिक जीवन जगणार्‍या व्यक्तींचे जीवन लयीतून निर्माण झालेले दिसते. ते करत असलेल्या कामांमुळे शरीराची हालचाल होऊन त्यांच्या शारीरिक हालचालींच्या आवृत्तीमुळे लय निर्माण होते.

याच लयीतून कला निर्माण होतात. त्यातूनच लोककला उदयास येते. व्यक्ती, समूह यातून होणारे उत्सव हे व्यक्तिशः नसून त्यांचे स्वरूप सामाजिक असते. त्यात नात्यागोत्यातील, गावातील सर्व प्रकारचे लोक समूहाने एकत्र येऊन समूहभाव प्रकट करतात.

सामूहिक स्वरूप अलौकिक असून त्यातून सांस्कृतिक एकात्मतेची लय चालत आलेली आहे. त्यातूनच आविष्कार, शब्द, अंगिक हालचाल, पदन्यास, मुद्रा त्यातील बदल हे सर्व घडत असते. त्यातून लोककलांची नवनिर्मिती होते. या लोककलांमध्ये काळानुसार बदल होत असला तरी लोककलेचा मूळ गाभा मात्र अव्याहत असतो. लोककला स्वाभाविक असतात.

प्राचीन काळापासून गायन, वादन, नृत्य, नाटक या कलांना महत्वाचे स्थान असून कोणत्या ही उत्सवाची सांगता या कलेनेच होते.

कला ही कलाच असते,

तिचा घ्यावा ध्यास,

करू नये उपहास…

उत्सव, उत्सवातील कला आणि समाजातील संमेलन राष्ट्राची उन्नती करणारे असतात. पूजविधी झाले की गायन, वादन, नृत्य करण्याची प्रथा आहे. याच परंपरेनुसार घरात मंगलकार्यानंतर देवतांचे जागरण, गोंधळ असे कुळाचार अस्तित्वात आले आहेत. भक्तांना बोलावणे, सर्व एकत्रित येणे आणि कुळाचार करणे गोंधळी, आराधी, भराडी असे लोककलाकार लोककला आणि संकीर्तन करून देवतेला प्रसन्न करतात. वातावरणात ऊर्जा निर्माण होते.

देवदेवता, वीरपुरुष यांच्या प्रसन्नतेसाठी जागर नृत्य करणे सर्वत्रच प्रचलित आहे. यामुळेच प्रबोधनात्मक आणि रंजन प्रधान लोककलाकार निर्माण झाले. कीर्तन, भारुड, सत्यशोधकी व आंबेडकर जलसे ही प्रबोधन प्रधान तर तमाशा हे रंजन प्रधान लोकनाट्य महाराष्ट्रात जनमानसावर प्रभाव गाजवत राहिले. वासुदेव, पिंगळा, नंदी बैलवाला, गारुडी, मदारी, मानवी वाघ, बहुरूपी, लळीत, जात्यावरची गाणी, दशावतारी खेळ अशा अनेक लोककला लोकांचे मनोरंजन करत असत. याव्यतिरिक्त काही कला प्रबोधनही करत.

मात्र औद्योगिकरण, शहरीकरण, ब्रिटिश शिक्षण प्रणाली, यांत्रिकीकरण यामुळे जीवनसरणीचा घटक असलेले हे काही लोककलाप्रकार लुप्त झाले तर काही खंडित झाले. काही लोककलाप्रकार मात्र काळानुरूप बदलत गेले. समाजातील परिवर्तनामुळे बदल होणे अनिवार्य आहे तसेच पारंपारिक लोककलाही आधुनिक होणे आवश्यक आहे. म्हणूनच जागतिकीकरणाच्या दबावात आपली संस्कृती जपून सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करत जपवणूक होणे आवश्यक आहे. लोककलांमध्ये जीवनसाधर्म्य आढळते. त्यामुळे त्यांची महती टिकविण्यासाठी काही गोष्टीं करणे आवश्यक आहे.

लोककलांची माहिती पुढच्या पिढीला सांगून त्याबद्दलची उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे. या लोककला जपण्यासाठी अभ्यासात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. शाळांमध्ये लोककला हा एक स्वतंत्र विषय अभ्यासासाठी असावा असं मला वाटते.

रंजन आणि प्रबोधन

करू त्यांचे चिंतन

शाळेशाळेत लोककला

व्हावे आता मंथन

लोककला या फार पूर्वीपासून अस्तित्वात, मानवी जीवनाचा भाग असल्यामुळे या लोककलांचा संत साहित्यात विचार मांडलेला दिसून येतो. अभंग, रूपक, भारुड या माध्यमातून संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर माऊली व इतर सर्व संतांच्या साहित्यात लोककलेला स्थान असल्याचे दिसून येते. तर छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे व तत्सम सर्व राजवटीतही लोककलेचा वापर करून शत्रूची माहिती मिळवणे व लोककलांच्या माध्यमातून शत्रूंपर्यंत पोहोचणे व त्यावर विजय मिळविणे हे सहज शक्य होत होते. अशा परंपरा परंपरेने पुढे नेणे हे काळाची गरज आहे त्या टिेकविण्यासाठी सर्वांनीच आपल्या परीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

या लोककला आता परंपरेने देखील बंद होताना दिसत आहेत कारण या लोककलाकारांची पुढची पिढी वेगवेगळ्या व्यवसायात अथवा नोकरीमध्ये स्वतःला गुंतून घेत आहेत. व्यवसाय अथवा नोकरी करूनही या परंपरा पुढे नेल्या गेल्या पाहिजेत. श्रोत्यांनी त्या टिकवल्या पाहिजे. तरच लोककलांची परंपरा अव्याहतपणे चालू राहील .

महाराष्ट्राला समृद्ध लोककलेचा वारसा लाभला आहे.

स्वाभिमान आणि प्रेरणा

महाराष्ट्राची लोककला

जपून ठेवा, वाढवू तिला

तिचाच असू द्या बोलबाला

– वैजयंती सिन्नरकर.

(लेखिका लोककला अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या