अहिल्यानगर । सचिन दसपुते
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणुक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, जामखेड व खर्डा शाखेचा ‘मनीट्रेल’ अहवाल येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती आला आहे. त्यानुसार या तीन शाखेतील सुमारे 1300 ठेवीदारांचे 77 कोटी 76 लाख 74 हजार 681 रूपये अडकले असल्याचे समोर आले आहे. हा सर्व पैसा चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे याच्या 12 कंपन्यांच्या कर्जखात्यावर गेला असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणुक प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणाचे बीडसह इतर जिल्ह्यात एकुण 98 गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील जामखेड व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. श्रीरामपूरच्या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. तर जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’ करण्यात आले आहे. त्याचा अहवाल गुन्हे शाखेला प्राप्त झाला आहे.
या अहवालातून फसवणुकीचा आकडा 77 कोटींच्या घरात गेला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चेअरमन सुरेश कुटे, व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी, आशिश पद्माकर पाटोदेकर यांना बीड पोलिसांच्या ताब्यातून जामखेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यांच्या कोठडीदरम्यान पोलिसांनी तपास केला आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
चेअरमन कुटे याने सुरूवातीला जामखेड व नंतर खर्डा, राहुरी येथे शाखा सुरू केल्या होत्या. या शाखेत ठेवीदारांनी पैशांची गुंतवणुक केली. मात्र सहा महिन्याच्या आत या शाखा बंद झाला. जामखेड येथील ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळासह 19 जणांविरूध्द 7 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’ ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जामखेडसह खर्डा व राहुरी येथील शाखेच्या व्यवहाराचे ‘मनीट्रेल’ करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार एकुण 1300 ठेवीदारांचे सुमारे 77 कोटी 76 लाख 74 हजार 681 रूपये ‘ज्ञानराधा’मध्ये अडकले असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
दरम्यान, या तिन्ही शाखेतील 870 ठेवीदारांनीच आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करून तक्रार दिली आहे. इतर ठेवीदार आलेले नाही. इतर ठेवीदारांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
84 लाभार्थी
या तीन शाखेतून जमा झालेले सुमारे 77 कोटी 76 लाख रूपये ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या बीड येथील मुख्य शाखेत वर्ग झाले. तेथून हा पैसा सुरेश कुटे याने स्थापन केलेल्या 12 कंपन्यांच्या कर्जखात्यात गेला. तेथून 84 लोकांच्या खात्यावर ‘आरटीजीएस’व्दारे वर्ग करण्यात आला असल्याचे ‘मनीट्रेल’ अहवालातून समोर आले आहे.
32 संशयित आरोपी
सुरूवातीला चेअरमन कुटेसह 19 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राहुरी, जामखेड व खर्डा शाखेचे मॅनेजर, संचालक व ज्या लोकांना व्यवहाराचे अधिकार दिले अशांना या गुन्ह्यांत संशयित आरोपी करण्यात आले आहे. 13 जणांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे संशयित आरोपींची संख्या 32 झाली आहे.