अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये जामखेडमधील ठेवीदारांचे सुमारे एक कोटी 10 लाख 68 हजार रुपये अडकले आहेत. याप्रकरणी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळासह 19 जणांविरूध्द जामखेड पोलीस ठाण्यात 7 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. दरम्यान, श्रीरामपूर येथील ठेवीदारांचेही सुमारे 66 लाख रुपये ‘ज्ञानराधा’ मध्ये अडकले असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 29 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सदरचा गुन्हा अद्याप आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेला नाही. तो गुन्हा वर्ग झाल्यास दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथील ठेवीदारांच्या सुमारे चार हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. या मल्टिस्टेटचा चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे याच्यासह संचालक मंडळाविरूध्द बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. बीड पोलिसांनी चेअरमन सुरेश कुटे याच्यासह व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी, आशिश पद्माकर पाटोदेकर यांना अटक केली आहे. ते सर्व जण सध्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत आहेत. दरम्यान, त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड व श्रीरामपूर येथील ठेवीदारांच्या ठेवी दिल्या नसल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
जामखेड पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह 19 जणांविरूध्द तर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन कुटेसह 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलीस ठाण्यातील गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला आहे. मात्र श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा अद्याप आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेला नाही. तो गुन्हा वर्ग झाल्यास दोन्ही गुन्ह्याचा एकत्रित तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना करता येणार आहे.
ठेवीदारांच्या पैशांची व्यवसायात गुंतवणूक
चेअरमन सुरेश कुटे, त्याची पत्नी संचालक अर्चना कुटे व सर्व संचालक, बँक मॅनेजर व कर्मचारी यांनी ठेवीदारांशी वारंवार संपर्क करून आमची बँक खूप मोठी आहे. इतर बँकेपेक्षा एफडीवर जास्त व्याज दर देत असून तुम्ही फिक्स डिपॉझिट करा असे सांगितले. त्यानुसार सदर संस्थेत ठेवीदारांनी डिपॉझीट केले. तसेच आरडी पुस्तकातही एफडी केले. मात्र ‘ज्ञानराधा’ च्या जामखेड व श्रीरामपूर शहर येथील शाखा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. कुटे व इतरांनी ठेवीदारांचे पैसे वैयक्तिक वापरासाठी सुरूवातीला रोख काढले. तसेच त्यांनी प्रॉपर्टी, शेअर बाजार, ट्रान्सपोर्ट कंपनी, तिरूमला ऑईल व इतर व्यवसायात गुंतवणूक केली असल्याचे तपासातून समोर आले आहे.