अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटेसह चौघांना अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांंनी अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहे. तपासादरम्यान चेअरमन सुरेश कुटे आणि व्हा. चेअरमन यशवंत वसंतराव कुलकर्णी यांना पुण्यातील कार्यालयात नेण्यात आले होते. या ठिकाणी गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि बीड पोलिसांनी आधीच या कार्यालयावर छापा टाकत सर्व संपत्ती जप्त करून कार्यालय सील केले होते. त्यामुळे नगर पोलिसांना तेथे काहीच मिळाले नाही. यासंदर्भातील कागदपत्रांची प्रत मागवण्यासाठी पोलीस ईडी आणि बीड पोलिसांशी संपर्क साधणार आहेत.
चेअरमन सुरेश कुटे, व्हा. चेअरमन यशवंत कुलकर्णी, संचालक वैभव यशवंत कुलकर्णी, आशिश पद्माकर पाटोदेकर यांना जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जामखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा फसवणुकीचा आकडा सुमारे 45 कोटींवर गेला आहे. गुन्हे शाखेकडे आतापर्यंत सुमारे 870 ठेवीदारांनी संपर्क केला असून त्यावरून हा आकडा 45 कोटींवर पोहचला आहे. मात्र या गुन्ह्याचे ‘मनीट्रेल’मध्ये हा आकडा सुमारे 70 कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. सुमारे 1200 ते 1500 ठेवीदारांचे जामखेड शाखेत ठेवी अडकल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी चेअरमन सुरेश कुटेसह चौघांना बीड पोलिसांनी अटक केली होती. त्यांना मध्यंतरी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले होते. त्यावेळी ईडीने कुटेसह इतरांची संपत्ती जप्त करून ती सील केली आहे. त्यांच्या कार्यालयातील गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रेही जप्त केली आहे. कार्यालय सील केले आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुटेसह चौघांना बीड पोलिसांच्या ताब्यातून घेतल्यानंतर जामखेडच्या गुन्ह्यात अटक करून तपास सुरू केला. तपासकामी सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी यांना शनिवारी पुणे येथे येण्यात आले होते. त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे पोलिसांना जप्त करायची होती. मात्र ते कार्यालय याआधीच सील केले असल्याने व संबंधीत कार्यालयातील कागदपत्रे पंचनामा करून जप्त केलेली असल्याने नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ईडी व बीड पोलिसांना संपर्क करून जप्त कागदपत्रांच्या पंचनामा केलेल्या प्रती मागितल्या जातील व त्या सदर गुन्ह्याच्या दोषारोपपत्रात जोडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रीरामपूर गुन्ह्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट
दरम्यान, जामखेड गुन्ह्याचा ‘मनीट्रेल’ करण्यात येत असून लवकरच त्याचा अहवाल मिळणार आहे. तसेच श्रीरामपूर गुन्ह्याच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक ऑडिटचा निर्णय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घेतला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून, लवकरच ऑडिट करणार्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. या फॉरेन्सिक तपासणीनंतर गुन्ह्याचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होईल.
‘ज्ञानराधा’चे 98 गुन्हे
ज्ञानराधा मल्टिस्टेटविरोधात एकूण 98 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यात 77, अहिल्यानगर जिल्ह्यात 2 आणि इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत कुटेसह संशयित आरोपी जामखेड गुन्ह्यात अटकेत असून, त्यांना पुढे श्रीरामपूर येथील गुन्ह्यातही अटक केली जाणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी दिली.