नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत शहरात महापालिका क्षेत्रात घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती अद्ययावत करणार आहेत. मतदार यादी बिनचूक अद्ययावत होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, महानगरपालिका उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक फयाज मुलाणी, उपजिल्हाधिकारी निवडणूक डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी रोहयो नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शर्मिला भोसले, तहसीहलदार नरेशकुमार बहिरम, तहसीलदार (निवडणूक) मंजूषा घाटगे, गणेश जाधव, वैशाली आव्हाड, नायब तहसीलदार (निवडणूक) एम. एम. शिवडे, योगेश शिंदे, व्हि. आर. मोराणकर यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, महानगरपालिका उपविभागीय अधिकारी, माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, शहरी भागात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने मतदारांच्या नोंदी अचूक होण्यासाठी महापालिकेची भूमिका महत्वाची आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करणार आहे. येत्या डिसेंबरपर्यंतचा कालावधी हा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व निवडणूक यंत्रणा यांच्यासाठी आव्हानात्मक संधीचा आहे. यात निवडणूक यंत्रणेसह नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.
शर्मा पुढे म्हणाले, सदनिका, गृहनिर्माण संस्था यांच्या पदाधिकार्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना भेटी सर्वेक्षण दरम्यान पूर्ण सहकार्य करण्यात यावे. शाळा व महाविद्यालयांच्या शिक्षकांनी सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेळेचे नियोजन करून सर्वेक्षण वेळेत पूर्ण करावयाचे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सहाय्यक मतदान अधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. सर्वेक्षण करतांना 80 वर्षाच्या पुढील नागरिकांची स्वतंत्र यादी बनविण्यात यावी तसेच मयत झालेल्या नगारिकांची नावे यादीतून वगळण्यात यावीत. या कामात कसूर व दिरंगाई होणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी .मतदार सर्वेक्षण मोहिमेत आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन शर्मा यांनी केले.
घंटागाडीतून जिंगल्स प्रसारित करावे
मतदान केंद्राच्या शाळा, महाविद्यालये येथे स्वच्छतागृहे व अनुषंगिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे. तसेच 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 दरम्यान राबविण्यात येणार्या मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरात फिरणार्या घंटागाडीतून जिंगल्स प्रसारित करून नागरिकांना प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना उपजिल्हाधिकारी निवडणूक डॉ. मंगरूळे यांनी यावेळी दिल्या.