संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) डॉक्टरनेच अत्याचार (Torture) केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.6) पहाटे घडली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह संगमनेर (Sangamner) तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, बारावीत शिकणारी सोळा वर्षीय पीडित तरुणी नवीन नगर रोड येथील एका रुग्णालयात 4 एप्रिलपासून उपचार घेत होती. दरम्यान, रविवारी पहाटे डॉ. कर्पे याने तिची विचारपूस करत रुग्णालयाच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार करत धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराची माहिती पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना दिली.
त्यानंतर पीडितेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन डॉ. अमोल कर्पे याच्यावर अत्याचारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फराहनाज पटेल या करत आहे. दरम्यान, घटनेनंतर पसार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने वैद्यकीय वर्तुळासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.