Saturday, June 15, 2024
Homeअग्रलेखमरणात खरोखर जग जगते

मरणात खरोखर जग जगते

मरणात खरोखर जग जगते; अधि मरण, अमरणपण ये मग ते.. ही कविवर्य भा.रा.तांबे यांची कविता १४ वर्षांचा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय खरोखर जगत आहेत. त्यांच्यामुळे सात जणांनी त्यांच्या रोजच्या मरण्यावर मात केली आहे. ही घटना पुण्यातील पिंप्रीची. त्या मुलाचा अपघात झाला. त्याचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डॉक्टरांनी त्यांचे अवयवदानाविषयी समुपदेशन केले. मुलाच्या कुटुंबीयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलाच्या अवयवांचे दान केले. अन्य सात गरजूंच्या शरीरात त्यांचे रोपण देखील करण्यात आले. हा पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरावा.

- Advertisement -

हा निर्णय त्याच्या कुटुंबीयांना काळजावर दगड ठेऊन घ्यावा लागला असेल. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पोटच्या गोळ्याच्या अकाली मरणाचे दुःख पेलणे पालकांसाठी सोपे नसतेच. आयुष्यभराच्या वेदना असतात त्या. तथापि दुःख क्षणभरासाठी बाजूला सारून गरजूंच्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. भारतीय संस्कृतीत दानाचे अपरंपार महत्व सांगितले आहे. दानाचा संस्कार करणाऱ्या अनेक पुराणकथा घरातील लहान मुलांना आवर्जून ऐकवल्या जातात. त्यांच्यावर तो संस्कार पक्का व्हावा यासाठी घरातील ज्येष्ठ पिढी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. अवयवदान हे जीवनदान मानले जाते. त्यामुळे गरजूंच्या आयुष्यात हसू उमलू शकते. या दानाच्या प्रतीक्षेत हजारो लोक असतात. अन्य अवयवांबरोबर किडनीच्या प्रतीक्षेतील रुग्णांची राज्याची यादी सुमारे पाच हजारांच्या पुढे तर लिव्हरसाठी एक हजारांच्या पुढे असल्याचे सांगितले जाते. हे नोंदणी झालेले आकडे आहेत. ज्यांना नोंदणीची प्रक्रिया किंवा अवयवदानाविषयी माहिती नसेल अशांचा आकडा मोठा असू शकेल. अवयवदान चळवळ रुजण्याची गरज यातून लक्षात यावी. उपरोक्त घटनेतील कुटुंबीयांचा आदर्श समाजाने घेण्याची गरज आहे. अशा घटना घडल्या की स्वयंस्फूत पुढाकारचे समाज कौतूक करतो. ते करायलाही हवेच. तथापि अशांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जायला हवे. अवयवदान कोणीही करू शकते. मेंदू मृत झालेल्या किंवा नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक असा निर्णय घेऊ शकतात. ज्याची इच्छा आहे त्यांच्या नावाची नोंदणी करता येऊ शकते. तथापि या एकूणच चळवळीविषयी समाजात जारुकतेचा अभाव आहे.

गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांना सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील. या प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी १९९४ साली कायदा संमत करण्यात आला आहे. ठाण्यात अवयवदान जागृती उद्यान विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. अशा प्रकारचे राज्यातील हे पहिलेच उद्यान असेल असे मुख्यमंत्र्यानी माध्यमांना सांगितले. अवयव रोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक अवयव प्रतिक्षेची तीव्रता रोज अनुभवत असतात. दात्यांची संख्या वाढावी अशीच प्रार्थना ते रोज परमेश्वराला करत असणार. तेही अशी चळवळ चालवणाऱ्या, समाजात जागरूकता वाढवणाऱ्या संस्थांना सक्रिय हातभार लावू शकतात. आवश्यक प्रशिक्षण घेऊन समुदेशन कार्यकर्ता बनू शकतात. अवयवदान जागृतीचा गोवर्धन उचलण्यासाठी असे लाखो हात आवश्यक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या