Saturday, May 18, 2024
Homeअग्रलेखसातत्यपुर्ण प्रयत्न हा व्यवहार्य उपाय

सातत्यपुर्ण प्रयत्न हा व्यवहार्य उपाय

प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट मृत्यू आहे. तो अटळ आहे हे माणसे जाणून आहेत. ‘मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है’ अशा आशयाच्या अनेक रचना माणसाच्या परिचयाच्या आहेत. माणसाला मृत्यूचे अपार भय वाटते हेही खरे. तथापि ते भय अनेक पटींनी वाढावे अशीच सध्याची परिस्थिती आहे. घराबाहेर पडल्यावर कारण अथवा विनाकारण कधीही कोणीही हल्ला करेल आणि किडामूंगीसारखे चिरडून टाकेल याचीच टांगती तलवार माणसावर असावी का? अगदी क्षुल्लक कारणांसाठी देखील माणसे सहज एकमेकांच्या जीवावर उठतात. बिडी पेटवायला काडी दिली नाही, पेट्रोलचे पैसे मागितले, फुकट खायला दिले नाही, मित्राने चेष्टामस्करी केली ही एखाद्याचा जीव घ्यायची कारणे आहेत का? पण तसेच घडत आहे. दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी.

कायद्याची जरब निर्माण व्हायलाच हवी. तथापि तो या समस्यवरचा वरवरचा उपाय ठरेल का? त्याबरोबरीने समस्येच्या मुळाशी घाव घातला जायला हवा आणि त्यासाठी मुळाशी जायला हवे असे मानसतज्ञ म्हणतात. एखाद्याचा जीव घ्यावा इतका पराकोटीचा राग माणसांना का येत असावा? मनुष्यत्वावर अहंकार मात कसा करतो? अनेकांना केल्या कृत्याचा पश्चाताप देखील होताना आढळत नाही. मग हे अवगुण माणसात आले कुठून आणि कसे? क्रौर्य का वाढतेय? राग कसा हाताळावा आणि भावना-ताणतणावाचे नियंत्रण कसे करावे हेच माणसांना कळत नसावे. हा बदल अचानक होत नाही. माणसे अचानक स्वनियंत्रण घालवत नाहीत. त्याची लक्षणे दिसायला लागतात. स्वभावदोष निर्माण व्हायला लागतो. अनेकदा परिवारातील सदस्यांच्या तो लक्षात देखील येत असावा. पण तरुण वय म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जात असू शकेल का? हूडबुद्धी म्हणून त्याकडे पाहिले जात असावे का? म्हणूनच कदाचित समज दिली जात नसावी. आणि तेच वर्तनदोष वाढत जात असावेत असे मानसतज्ञांचे निरीक्षण आहे. हिंसकपणा, आक्रमकता घरातच अनुभवास येत असेल तर त्या घरातील सदस्यांना विशेषतः युवा पिढीला आक्रमकता गैर वाटू शकेल का? कुटुंबातच सुसंवाद, चर्चा यांवर अधिक भर दिला गेला पाहिजे.

- Advertisement -

मानसतज्ञ म्हणजे वेड्यांचे डॉकटर नाहीत याची खूणगाठ मनाशी मारण्याची गरज आहे. शरीराबरोबरच मनाचे आरोग्य देखील बिघडते आणि त्यासाठी डॉक्टराकंडे जायचे असते ही जाणीव रुजायला हवी. एकदा का ती रुजली तर कुटुंबातील सदस्यांमधील वर्तनदोष सुधारण्यासाठी मानसतज्ञांकडे जायला माणसे कदाचित कचरणार नाहीत. मानसिकता बदलासाठी जाणत्यांचे सतत प्रयत्न आवश्यक आहेत. सरकारनेही यासाठी पुढाकार घेतला आहे. मानसिक रुग्णांशी वर्तन, त्यांचे समुपदेशन, औषधोपचार, योग आणि ध्यानधारणा यांचा फायदा याविषयी डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. यासाठी मानसिक रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, समुपदेशक, समाजसेवक, प्रशिक्षित परिचारिका यांचा स्वतंत्र व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी माध्यमांना सांगितले. कोणत्याही स्वरूपाच्या सामाजिक समस्यांवर उपाय ही कोणा एकाची जबाबदारी नाही. वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर सातत्यपूर्ण प्रयत्न हा व्यवहार्य उपाय आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या