Saturday, May 25, 2024
Homeनाशिकघरात घुसून बिबट्याने श्वानाचा पाडला फडशा

घरात घुसून बिबट्याने श्वानाचा पाडला फडशा

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri taluka) नांदूरवैद्य (Nandurvaidya) येथील मुकुंदा यंदे (Mukunda Yande) या शेतकऱ्याच्या घरात घूसून बिबट्याने (Leopards) श्वानाचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…

- Advertisement -

नाशिक तालुक्यातील दारणा (Darna) पट्यात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वंजारवाडी व नांदूरवैद्य गावच्या सीमेवर असलेल्या यंदे यांच्या मळ्यात बिबट्याने हल्ला चढविला.

दोनच दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे (Belgoan Kurhe) येथील बिबट्या जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच नांदुरवैद्य येथील शेतकरी मुकुंदा तानाजी यंदे यांच्या घराजवळच असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने त्यांच्या पाळीव श्वानाला घरातून ओढुन नेऊन हल्ला चढवला.

या हल्ल्यात श्वान ठार झाला आहे. हा बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होता. परंतु आज अचानक नांदूरवैद्य येथील कर्पे मळ्यामध्ये राहत असलेल्या नामदेव यंदे या शेतकऱ्याला भर दुपारी समोरच दोन बिबट्याचे दर्शन झाले होते.

या ठिकाणी वनविभागाच्या वतीने (Forest Department) पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी (Farmers) करीत आहेत.

नांदूरवैद्य येथील कर्पे मळा, सायखेडे मळा, शिवाचा ओहोळ आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी असलेल्या सायखेडे मळा परिसरात संतू सायखेडे यांच्या गायीवर या हल्लेखोर बिबट्याने हल्ला चढवत गायीला ठार केले होते.

बिबट्या आपले भक्ष शोधण्यासाठी भर दुपारीदेखील निदर्शनास येत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नांदूरवैद्य ते वंजारवाडी दरम्यान ऊसशेती आहे. तीन ते चार पोल्ट्री फार्म असल्यामुळे बिबट्याचा भक्ष शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी दत्तू काजळे, कैलास कर्पे, रोहीदास सायखेडे, प्रवीण सायखेडे, मुकुंदा यंदे, सोपान कर्पे, ज्ञानेश्वर कर्पे, त्र्यंबक डाके, विजय कर्पे, नवनाथ कर्पे, शिवाजी सायखेडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या