Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधदुःख कालिंदीचा डोह

दुःख कालिंदीचा डोह

सुजाता राऊत Sujata Raut

एखादा गूढसा वाटणारा डोह असतो. त्यात वाकून पाहिलं तर आजूबाजूच्या झाडांच्या हिरव्या सावळ्या छाया पडलेल्या दिसतात. वरचं आभाळही मध्ये चमकून जातं. कधीतरी डोह डहुळतो. पण त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या खोलीचा अंदाज येतो आणि वाटतं खोल उतरलं या डोहात तर काय दिसेल समोर?

- Advertisement -

तिचे डोळे पाहताना अशाच डोहाची आठवण येते. वाटतं या अंतर्मनात खूप काही दडवून ठेवलंय. चित्रपट साहिब बीबी और गुलाम Sahib Bibi aur Ghulam नायिका छोटी बहूची भूमिका साकार केलीय मीना कुमारीने Meena Kumari. शाळेत असताना हा चित्रपट टीव्हीवर पाहिला होता. तेव्हा नावासकट काहीच कळला नव्हता. पण लक्षात राहिलं त्यातलं अप्रतिम पण दुःखाची धार असलेलं संगीत. गीता दत्तचा तो काळीज कापणारा आवाज आणि मोठं कुंकू लावलेली डोक्यावर बंगाली साडीचा पदर घेतलेल्या छोट्या बहूचे गर्द डोहाप्रमाणे गूढ डोळे.

बंगालमधल्या सरंजामशाहीतला तो प्रचंड वाडा. खानदानी श्रीमंती, नाना प्रकारचे विलास आणि उपभोग. जमीनदारांचं आयुष्य तसंच असायचं. त्या श्रीमंती भरजरी वातावरणात एकाकीपणाचं, पतीच्या उपेक्षेचं दुःख भोगणारी छोटी बहू आहे आणि तो आहे गावाकडून कलकत्त्यात नशीब आजमवायला आलेला तरुण. साधा सरळ मनाचा, संवेदनशील व निष्कपट वृत्तीचा. सिंदूरच्या कारखान्यात कामाला लागला आहे. छोटी बहू त्याला आपल्या घरी बोलावते कोणाच्याही नकळत. कारण तिला त्याच्याकडून कुंकू घ्यायचं असतं, तिच्या पतीचा बाहेर खालीपणा रोखायचा असतो. तशी तिची भाबडी आशा असते. तिला हवा असतो आपल्या पत्नी पदाचा हक्क.

तरुण येऊन जमिनीवर बसतो. त्याला नाव विचारल्यावर म्हणतो, भूतनाथ. हे नाव त्याला कधीच आवडलं नसतं. ती म्हणते भगवान के कईं नामोंमें से एक है ये। मी तर तुला भूतनाथ म्हणूनच बोलावणार. तो नजर उचलून वर बघतो आणि समोर बघून अक्षरशः स्तिमित होतो. समोर ती बसली आहे. छोटी बहू. मोठं गोलाकार कुंकू. माथ्यावर भरजरी पदर, कुंकवाच्या खाली कमानदार भुवया आणि तिचे भावपूर्ण डोळे, समईसारख्या शांत नेत्रज्योती… तो थक्क होऊन पाहात राहतो. ते फक्त सौंदर्य नसतं. ते आहे शुद्ध सत्वशील समर्पणशील व्यक्तिमत्त्वाचं तेज. तो दिपून जातो. तिला मनापासून मदत करायचं ठरवतो. पण ते कुंकू घेतल्यानेही काही फरक पडत नाही. प्राक्तनाची जळती रेषा नाही, ओलांडता येत शेवटी.

छोटी बहू आहे शाही ऐश्वर्याची मालकीण आणि तो आहे एक यकश्चित् नोकर. पण त्यांच्यातलं नातं माणुसकीचं आहे. तिचं दुःख त्यातला सल त्याला कळत जातो. एक तुम ही तो हो मेरा मन जाननेवाले असं ती बोलते, तसंच त्याच्या साध्या निरागस आयुष्यातल्या गोष्टीही समजून घेते. हे दोन निर्मळ व्यक्तींमधले विशुद्ध मैत्रीचं उंचीवर पोहोचलेलं नातं आहे.

स्त्रीला हवं असतं प्रेम आणि आत्मसन्मान, तिचं स्वतःचं स्थान. छोट्या बहूला हे सगळं दुष्प्राप्य आहे. तिच्या पतीचे विलास, जमिनदारीतील हेवेदावे वाढत जातात. माझ्यासाठी मद्यपान करशील या पतीच्या प्रश्नाला मी उत्तर देते मैं कुछ भी कर सकती हूँ कुछ भी।

तिचं प्रेम अक्षरशः आत्म्यातून निपजलेलं होतं. ती मद्यप्राशन करू लागते आणि मग आहारी जाते. वैभवाच्या लयालाही सुरुवात होते. 1962 मध्ये आलेला हा चित्रपट, काळाच्या कितीतरी पुढे होता. विमल मित्रांच्या बंगाली कादंबरीवर आधारित असणारा हा चित्रपट ऑस्करला जाणार होता, असं म्हणतात. पण मद्य घेणारी स्त्री ही प्रतिमा तिथेही रुचली नाही.

मग छोटी बहू का बरं अशी विनाशाच्या दिशेने गेली असेल?

तिचं समर्पण इतकं टोकाला पोहोचलं की, तिने मिटवून टाकले स्वतःला. भूतनाथही तिला रोखण्याचा प्रयत्न करतो. पण मग असहाय्यपणे बघत राहतो तिचा विनाशाकडे चाललेला प्रवास.

छोट्या बहूची भूमिका मीनाकुमारीच्या जणू प्राणांत भिनली आहे. ती तिच्या आत्मचरित्रात म्हणते, छोट्या बहूची अगतिकता, आशा, दुःख, तिचे क्लेश, तिची सहनशक्ती आणि तिची तितिक्षा हे सर्वकाही मी त्या काळात अक्षरशः जगत होते आणि ते आपल्याला पडद्यावर साकार झालेलं ठायीठायी दिसतं.

पिया ऐसो जिया मे समाये गयो रे आणि न जाओ सैंया चुरा के बैंयाँ ही गीता दत्तच्या आवाजातली गाणी. त्यात असीम व्याकुळता, निस्सीम प्रेमभावना, आवेग आणि अनुनय याचं काय विलक्षण मिश्रण आहे. तो दर्दभरा आवाज मीनाकुमारीच्या व्यक्तिमत्त्वात मिसळून जातो. आणि वाटतं याला म्हणतात गाणं!

शेवटी छोटी बहू गूढरीत्या नाहीशी होते. वैभवाला अवकळा लागलेलीच असते. वर्ष उलटतात. भूतनाथ ओव्हरसियर झालाय. त्याच्याच देखरेखीखाली त्या हवेलीच्या जागेचे उत्खनन चाललंय; आणि तिथे सापडतो मानवी सांगाडा. उत्खननात असं कैकवेळा सापडू शकतं. पण या सापळ्याच्या हातात एक कंकण असतं. तेच ते छोट्या बहूच्या हातातलं. छोट्या बहूची नखशिखांत तेजस्वी, सजलेली सुंदर सात्विक मूर्ती त्याचवेळी पडद्यावर पार्श्वभूमीला दिसत राहते, तिचा आवाज तिचे शब्द कानावर पडत रहातात. संगीताचे करूण स्वर येत राहतात आणि भूतनाथबरोबर आपणही स्तब्ध होतो. दुःख कालिंदीच्या डोह डहुळत राहतो….

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या