Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारचक्क घरात फुलविली केशर शेती

चक्क घरात फुलविली केशर शेती

डॉ.सतीश चौधरी

खेतिया ।

- Advertisement -

शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात संगणक शाखेत शिक्षण घेत असलेल्या हर्ष पाटील याने पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत चक्क घरातील खोलीत केशरचे उत्पादन घेतले आहे.

तरुणाई म्हटली म्हणजे विविध प्रयोग आणि जगावेगळ्या गोष्टी करण्यासाठी कायम पुढे असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कुठलाही क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याकडे तरुणाईचा कल असतो. शेती क्षेत्राचा विचार केला तर आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा शिरकाव होताना दिसून येत आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत या तरुणांनी वेगवेगळे प्रयोग करत शेती क्षेत्रामध्ये देखील खूप मोठी प्रगती केली आहे.

पशुपालन व्यवसाय असो किंवा कुक्कुटपालन व्यवसाय यामध्ये आता तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठी झेप घेतलेली आहे. घेतलेल्या शिक्षणाचा कौशल्याने शेतीत वापर करत हे तरुण आता शेतीचा विकास झपाट्याने करताना दिसून येत आहेत. खेडदिगर (ता. शहादा) येथील हर्ष पाटील या तरुणाने संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्याचा वापर खूप कौशल्याने केशर लागवडीसाठी केला. नंदुरबारसारख्या जिल्ह्यात केशर उत्पादन घेऊन या तरुणाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने केळी, पपई, कापूस, गहू, डांगर, टरबूज, तांदूळ, सोयाबीन, हरभरा, दादर, ज्वारी, मका, ऊस, एरंडा अशी पीके प्रामुख्याने घेतली जातात. नंदुरबार जिल्हा हा केळी उत्पादन क्षेत्रात अव्वलस्थानावर आहे. खेडदिगर या छोट्याशा 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या खेड्यात राहणार्‍या हर्ष मनिष पाटील या तरुणाने शिक्षणाचा बहुमूल्य असा उपयोग करत नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. उच्च शिक्षित अंतिम वर्षाच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील संगणक शाखेत शिक्षण घेत असताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत खेड दिगर येथील त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या 15 बाय 15 आकारमानाच्या खोलीमध्ये केशर उत्पादन घेण्याची किमया साध्य केली आहे. केशर उत्पादनाकरिता जे काही थंड वातावरण लागते त्याची निर्मिती या तरुणाने 15 बाय 15 च्या खोलीतच केली. दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये हर्ष मनिष पाटील यांनी केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. खेड दिगर हे गाव शहादा तालुक्यात असून 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावामध्ये तंत्रज्ञानाच्या जोरावर हर्ष पाटीलने ही किमया करून दाखवली आहे. केशर लागवड करण्याआधी त्याने इंटरनेटच्या माध्यमातून याबद्दल माहिती घेतली. तेव्हा त्याला कळाले की काश्मीरयासारख्या ठिकाणी केशरचे उत्पादन घेतले जाऊ शकते. परंतु केशर शेतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी नंदुरबार सारख्या भागात केशर उत्पन्न घेण्याची इच्छा बाळगली व त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. केशर लागवड करीता काश्मीर येथील मोगरा जातीच्या केशरचे फ्लॉवर कंद आणले व त्यांची लागवड करून केशर शेती करायला सुरुवात केली. फ्लॉवर कंद हर्ष पाटील यांनी श्रीनगर जवळ असलेल्या पाम्पोर येथून प्रति किलो 1000 रुपये या दराने आणले व घरात जवळ असलेल्या 15 बाय 15 च्या खोलीमध्ये लागवड केली.

अशाप्रकारे केली तयारी

हर्ष पाटील यांनी घराजवळ असलेल्या 15 बाय 15 च्या खोलीमध्ये त्यांनी केशर शेतीला सुरुवात केली व याकरीता तयारी म्हणून त्यांनी या खोलीमध्ये पूर्ण थर्माकोल चिकटवला व त्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण खोली वातानुकूलित केली. 24 तास ते थंड राहील अशा प्रकारे काळजी घेतली. केशरचा एक सीड कंद लावला तर त्यापासून तीन महिन्यात तीन ते चार केशर निघते. सीड कंदाचे वैशिष्ट्य म्हणजे एका सीड कंद पासून आठ ते दहा वर्षापर्यंत उत्पन्न मिळत राहते व या एका सीड कंदापासून हळूहळू चार सीड कंद तयार होतात. अडीच ते तीन महिने केशर कंद लागवड करून झाले असून आतापर्यंत पाच लाख रुपयांचा खर्च हर्ष पाटील यांना आलेला आहे. या सीडला आता फुल बहरत असून एका फुलांमध्ये तीन केशर बाहेर निघत आहेत. म्हणजेच हर्ष पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीला आता फळ मिळत आहे. केशरचे उत्पादन आता सुरू झाले आहे. 300 ग्रॅम पर्यंत उत्पादन मिळेल अशी शक्यता त्यांना आहे. जर केशरचे आज बाजारपेठेतील दर पाहिले तर एका ग्रॅमला पाचशे रुपयांचा दर असल्याचे देखील हर्ष पाटील यांनी नमूद केले. हर्ष पाटील यांनी काश्मीर येथील टेक्निशियन टेक्नॉलॉजी यांच्याकडून माहिती घेत घराजवळील खोलीमध्ये केशर सिडकंद घेऊन रोप लावलेले आहेत.

साधारणपणे अडीच महिन्यानंतर आता त्यांना केशर चे उत्पन्न मिळायला लागलेले आहे. पहिल्या वर्षी याकरीता त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला परंतु दुसर्‍या आणि तिसर्‍या वर्षी त्यांना खर्च कमी परंतु उत्पन्न जास्त मिळणार आहे.यावरून दिसून येते की जर शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली व कष्ट करण्याची तयारी ठेवली तर शेतीतून देखील लाखो रुपये कमवता येणे शक्य आहे.हर्ष पाटील यांचे इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षण शहादा, उच्च शिक्षणासाठी नवी मुंबई येथील आरएआईटी डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झाले.

केशर शेतीविषय भविष्यातील नियोजन

सध्याच्या युगात तरुण युवक शेतीकडे ओढला जात असून हर्ष पाटील यांनी एक संकल्पना घेऊन भविष्यात कोणालाही केशरची शेती करायला आवडत असेल तर त्यांच्यासाठी मोफत दोन दिवसीय कार्यशाळा तसेच ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन केले जाणार आहे असे सांगितले. पाटील फार्म्स इनडोअर केशर शेतीवर व्यापक कार्यशाळा आयोजित करणार असून या कार्यशाळेत तांत्रिक तपशिलांपासून ते केशर लागवडीच्या शेवटपासून शेवटपर्यंतच्या प्रक्रियेपर्यंत, पायाभूत सुविधांची किंमत, आरओआई अंतर्दृष्टी आणि साइटला भेट देण्याची ऑफर देखील आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या