Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमShirdi : शिर्डीत पिस्तुल रोखून दहशत माजवणारा ‘डॉन’ जेरबंद

Shirdi : शिर्डीत पिस्तुल रोखून दहशत माजवणारा ‘डॉन’ जेरबंद

काटवनातून पाप्या शेखला पोलिसांनी फरफटत काढले

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पवित्र शिर्डी नगरीत पिस्तुलाचा धाक दाखवून सर्वसामान्यांचे रक्त गोठवणार्‍या आणि गुन्हेगारी जगतात दहशत निर्माण करू पाहणार्‍या मुजोर गुन्हेगाराचा माज अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने उतरवला आहे. सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या असून, या कारवाईने जिल्ह्यातील गुन्हेगार टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

या खळबळजनक प्रकरणाची सुरुवात 4 नोव्हेंबर 2025 रोजी झाली होती. फिर्यादी दीपक किसन जाधव आणि त्यांचा मुलगा निलेश हे शिर्डीकडून सावळीविहीरकडे जात असताना पाप्या शेख आणि त्याच्या टोळक्याने त्यांचा रस्ता अडवला. भररस्त्यात पिस्तुल रोखून अंगावर धावून जात जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेने शिर्डीत भीतीचे सावट पसरले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने या गुंडाच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते.

YouTube video player

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दिवस-रात्र आरोपीचा माग काढत होते. अखेर 26 डिसेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, पाप्या शेख हा शिर्डी परिसरातील एका फायबर कारखान्याजवळ असलेल्या हॉटेल रेणुकाच्या पाठीमागील दाट काटवनात दबा धरून बसला आहे. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता परिसराला घेराव घातला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला झडप घालून पकडले. 45 वर्षीय पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (रा. कालिकानगर, शिर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेताच त्याची सगळी गुर्मी उतरली.

पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 आणि आर्म ऍक्ट अंतर्गत कलमे लावली आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. 964/2025 नुसार आरोपीवर कलम 189 (2) (बेकायदेशीर जमाव), 191 (2)(3) (दंगल), 190, 351 (2) (जिवे मारण्याची धमकी), 352, 126 (अडवणूक करणे) आणि आर्म ऍक्ट कलम 3/25 (विनापरवाना शस्त्र बाळगणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कलमांमुळे आरोपीला आता प्रदीर्घ काळ तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि दीपक मेढे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोउपनि सागर काळे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, विजय पवार, राहुल द्वारके, राहुल डोके, भीमराज खर्से, सतिष भवर, सुनील मालणकर, प्रशांत राठोड आणि प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली आहे. सध्या आरोपीला पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याचे इतर साथीदारही आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...