नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतासह जगभरातील देशांवर आयात कर (Import Tax) लागू केला आहे. सर्व देशांवर सरसकट १० टक्के कर लागू केला असून काही निवडक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार भारतावर (India) २६ टक्के व्यापार कर लागू झाला आहे.
रेसिप्रोकल टॅरिफ (Reciprocal Tariff) कर म्हणजे समन्यायी कर (आयात कर) होय. भारत त्या वस्तू अमेरिकेकडून (America) आयात करतो त्यावर हा कर लागणार आहे. टॅरिफ कर म्हणजे भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर आता कर लावला जाणार आहे. यात भारताकडून (India) २६ टक्के कर आकारला जाणार आहे. तर चीनवर हेच प्रमाण ३४ टक्के तर व्हिएतनामवर ४६ टक्के इतका व्यापार कर लागू करण्यात आला आहे. हे प्रमाण प्रत्येक देशाच्या बाबतीत वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. तसेच याचे पडसाद शेअर मार्केटवरही पाहायला मिळाले आहेत.
अमेरिकेच्या २६ टक्के शुल्कामुळे अनेक भारतीय कंपन्या आणि क्षेत्रांना व्यावसायिक नुकसान सहन करावे लागू शकते, ज्यामध्ये कृषी, रसायन, औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरण निर्मिती कंपन्या आणि वाहन उद्योगांचा समावेश आहे. तसेच अमेरिका इतर देशांमधून (Countries) आयात केलेल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर १२ ते १५ टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याची शक्यता आहे. विशेषतः अमेरिका चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान येथून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जास्त शुल्क आकारणार आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “भारताच्या पंतप्रधानांचा नुकताच दौरा आटोपला. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. पण मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही चांगले मित्र आहात, पण तुम्ही आम्हाला चांगली वागणूत देत नाही’. ते आपल्यावर ५२ टक्के व्यापार कर आकारतात. पण आपण मात्र त्यांच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून जवळपास शून्य कर आकारत आलो आहे”, असे त्यांनी म्हटले.
अतिरिक्त कर आकारणीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून समर्थन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अतिरिक्त कर आकारणीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, “मी या धोरणाला दयाळू समन्यायी व्यापार कर असं म्हणेन. हे खरंतर पूर्णपणे जशास तसे कर नाहीत. आम्ही त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या कराचे दर फक्त निम्मे केले आहेत. त्यांना अडचण असेल तर त्यावरचे उत्तर खूप सोपं आहे. जर तु्मची काही तक्रार असेल, जर तुम्हाला हे व्यापार कर शून्य हवे असतील तर तुम्ही तुमची उत्पादनं थेट अमेरिकेत तयार करा. इथे कोणतेही व्यापार कर नाहीत”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम
अमेरिकेच्या या निर्णयामुळे निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क वाढल्याने निर्यात कमी होऊ शकते. तसेच भारतातून अमेरिकेत कपडे, औषधे, टेक्निकल सेवा, रासायनिक उत्पादने निर्यात होतात. निर्यात घटल्याने संबंधित क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय भारत अमेरिकेकडून तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादने आयात करतो. जर भारताने आयात शुल्क वाढवले तर संबंधित गोष्टींच्या किंमतीत देखील वाढ होऊ शकते.
या गोष्टींवर आयात शुल्क नाही
अमेरिकेकडून सोनं, प्लॅटिनम, व्हिटामिन, इन्सुलिन, स्टील आणि कागद या गोष्टींवर आयात शुल्क आकारले गेले नाही. जर आयात शुल्क वाढले तर त्याचा परिणाम इंधन उत्पादनावर होतो. जागतिक बाजारपेठेत तेल उत्पादन कमी होते. परिणामी तेल महाग होऊ शकते. तसेच सोन्यावर आयात शुल्क न लागल्याने कदाचित गुंतवणूक वाढू शकते.