नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज आज (५ मार्च) हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज चेंबरमधून सभागृहाला संबोधित केले. अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नव्या कार्यकाळात ट्रम्प यांनी पहिल्यांदाच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हजला संबोधित केले. सत्तेत पुन्हा आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड आक्रमक झाले आहेत. टेरिफ वॉर, इतर देशांना दिली जाणारी मदत रोखणे आणि सरकारी कर्मचारी कपात यामुळे त्यांनी गेल्या ४३ दिवसांत अमेरिकेतच नाही तर जगभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारही कोसळत आहेत. यामध्ये त्यांनी भारतासह अन्य देशांची नावे घेत मोठी घोषणा केली आहे.
ट्रम्प यांनी तब्बल १ तास ३० मिनिटांचे भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी दोन वेळा भारताचा उल्लेख केला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी आयात शुल्काच्या मुद्द्यावरून भारतावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “भारत आपल्यावर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. हा काही योग्य निर्णय नाही. आम्ही देखील आगामी २ एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल आमेरिका त्यांच्यावर तितकच आयात शुल्क लादेल.
ते पुढे म्हणाले, ही मोठी स्वप्ने आणि धाडसी निर्णय घेण्याची वेळ आहे. अमेरिकेला पुन्हा परवडणारा देश बनवायचे आहे. आता आम्ही वोक राहणार नाही. कॅनडा, मेक्सिको, भारत आणि दक्षिण कोरिया सारखे अनेक देश आपल्या उत्पादनांवर मोठे टेरिफ लादतात, आता आम्ही या देशांवर येत्या २ एप्रिलपासून परस्पर कर लादणार आहोत, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच अमेरिकेवर टेरिफ लादणाऱ्या देशांची यादी वाचून दाखवली आणि त्यांच्यावरील नाराजी उघड केली. ट्रम्प म्हणाले, युरोपियन संघ, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडाने आपल्यावर टेरिफ लादले आहे. हे देश आपल्या वस्तूंवर टेरिफ आकारतात. या प्रमुख देशांबरोबरच इतरही अनेक देश आमच्याकडून भरमसाठ टेरिफ आकारतात. ते आपल्याकडून जितके टेरिफ वसूल करतील, तितकेच टेरिफ आता आपण त्यांच्याकडून वसूल करायचे आहे. भारतासारख्या देशांनी अमेरिकेकडून टेरिफ आकारण्याचा घेतलेला निर्णय अनुचित आहे.
आमच्याकडून लुटलेले पैसे वसूल करून अमेरिकेतील महागाई कमी केली जाणार आहे. मी अजूनही बायडेन यांच्या अयशस्वी धोरणांना दुरुस्त करण्याचे काम करत आहे. अमेरिकेत आता दोनच जेंडर असणार आहेत. पुरूष आणि स्त्री. मी पुरुषांना महिलांचे खेळ खेळण्यास बंदी घातली आहे. गेल्या ४३ दिवसांत आम्ही खूप काम केले आहे. एक निर्णय घेऊन आधीचे १०० बेकार निर्णय रद्द केले आहेत. आम्ही हास्यास्पद धोरणे रद्द केली आहेत. भ्रष्ट आरोग्य धोरणे देखील रद्द करण्यात आली आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
“मी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. मी माझ्या पहिल्या कार्यकाळात अनेक नियम बनवले होते. यावेळी सुद्धा तसच करतोय. अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत आलय. इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्यासंबंधीच्या एका आदेशावर मी स्वाक्षरी केलीय” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मेरिटच्या आधारावर नोकऱ्यांमध्य भरती होईल असे ट्रम्प म्हणाले. बायडेन यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, “त्यांच्या सरकारमध्ये अंड्याची किंमत गगनाला भिडलेली. पण आम्ही महागाईवर नियंत्रण मिळवतोय. आम्ही पॉवर प्लांट बनवत आहेत. आमचा फोकस त्यावर आहे” “आमचे सरकार अलास्का येथे गॅस पाईपलाईनवर काम करत आहे. करदात्यांचा पैसा वाचवण्यासाठी आम्ही DOGE ची स्थापना केलीय. त्याची जबाबदारी मी इलॉन मस्कवर सोपवलीय” असे ट्रम्प म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा