नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, त्यांच्या प्रशासनाने पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. या कराराद्वारे दोन्ही देश इस्लामाबादच्या तेलसाठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत मोठ्या तेल कराराची ही घोषणा केली. ट्रम्प यांनी सांगितले की, ‘अमेरिका आणि पाकिस्तान एकत्रितपणे ‘मोठा तेल साठा’ विकसित करतील.’ ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, ‘कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल.’
ट्रम्प यांची ट्रूथवर पोस्ट आणि भारताला डिवचलं
ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “आम्ही नुकताच पाकिस्तानसोबत एक करार केला आहे, ज्याद्वारे पाकिस्तान आणि अमेरिका तेलसाठे विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील.” पोस्टमध्ये पुढे ट्रम्प म्हणाले, “आम्ही या भागीदारीचे नेतृत्व करण्यासाठी तेल कंपनी निवड प्रक्रिया राबवत आहोत. कोण जाणे, कदाचित ते भविष्यात भारतालासुद्धा तेल विकतील.”
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्विटने पाकिस्तानमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतीलही पण त्यांना भारतीय परराष्ट्र नीतीचा राग आलाय हे निश्चित मानण्यात येत आहे. मोदी सरकारने इंधन खरेदीत अमेरिकेला किंमत न दिल्याने त्याची तो भारताला किंमत मोजायला लावण्याचा प्रयत्नात आहे. अर्थात रशिया या काळात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा ठाकण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पाकिस्तानसोबतच्या कराराबाबत घोषणा करण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. याशिवाय त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंडात्मक कारवाई करण्याबद्दलही सांगितले. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा अजूनही सुरू आहेत आणि आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती स्पष्ट होईल.
ट्रम्प यांनी ट्रूथवर असे ही पोस्ट केले आहे की, भारतावरील ही कारवाई १ ऑगस्टपासून लागू केली जाईल. ते पुढे म्हणाले, “भारताने नेहमीच आपली लष्करी उपकरणे मोठ्या प्रमाणात रशियाकडून खरेदी केली आहेत आणि चीनसोबतच ते रशियाचे सर्वात मोठे ऊर्जा खरेदीदारही आहेत. रशियाने युक्रेनमधील हत्या थांबवाव्या अशी सर्वजण अपेक्षा करत असताना हा व्यापार होत आहे, ही बाब चांगली नाही.”
ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये ब्रिक्सबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ‘भारत हा अमेरिकाविरोधी गटाचा एक भाग आहे.’ त्यांनी ब्रिक्सला अमेरिकन डॉलरवरील हल्ला म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही. व्हाईट हाऊसमधील त्यांच्या ‘व्यस्त दिवस’चा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, ‘ते जगातील अनेक देशांच्या नेत्यांना भेटत आहेत जे अमेरिकेला कर सवलत देत आहेत.’ त्यांनी पुढे असा दावा केला की, ‘या प्रयत्नांमुळे अमेरिकेची व्यापार तूट मोठ्या प्रमाणात कमी होईल.’
दरम्यान, अमेरिकेने २५ टक्के कर लादल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले. या संदर्भात भारत सरकारने एक पत्रक जारी करत म्हटलं की, भारत सरकारने द्विपक्षीय व्यापाराबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विधानाची दखल घेतली आहे. अमेरिकेच्या २५ टक्के टॅरिफच्या परिणामाबाबत सरकार अभ्यास करत आहे. सरकारने म्हटले आहे की, “भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी वाटाघाटी करत आहे. आम्ही या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




