दोंडाईचा – Dondaicha :
शहरातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरुन झालेल्या वादाने वेगळेच वळण घेतले. यातील संशयीतांना सोडविण्यासाठी एका समाजाच्या जमावाने थेट पोलीस ठाण्यावर चाल केली.
दोंडाईचा शहरात यापुर्वी मोहन मराठे या तरुणाचा संशयीत मृत्यू झाल्यानंतर आपण तत्काळ हे प्रकरण सीआयडीकडे सोपवून संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करुन मोहन मराठेंच्या कुटुंबियांना न्याय दिला. याप्रकरणात देखील अशाचप्रकारे निपक्ष चौकशी केली जाईल. दोषी कोणीही असो त्यांची अजिबात गय केली जाणार नाही. मात्र जनतेने पोलीस प्रशासनाला तपासकामी सहकार्य करावे.
चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक धुळे
पोलिसांना धक्का बुक्की, शिवीगाळ इतकेच नव्हे तर दगडफेक केल्याने संतप्त जमाव पांगविण्यासाठी पोलीसांनी दोन राऊंड फायर केले. यात एकजण जखमी झाला.
तर जमावाच्या हल्ल्यात एकाचा बळी गेला. या घटनेमुळे दोंडाईचा शहराचे नाव कु-अर्थाने पुन्हा एकदा राज्यभर छळकले. तर शहरात काहीकाळ तणावही निर्माण झाला.
युवतीने दिली फिर्याद
एका 17 वर्ष सात महिने वयाच्या युवतीने फिर्याद दिली असून त्यात तीने म्हटले आहे की, आई व भावासह आपण शहरातील मेहतर कॉलनी, मालपूर चौफुली येथे राहतो. पाच वर्षापुर्वी वडील वारले असून आई धुणे-भांडीचे काम करते.
31 रोजी आई एका कामनिमित्त शहादा येथे जाणार असल्याने सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास आम्ही निघालो.
दरम्यान काकुला फोन करुन मुलीला तुमच्याकडे सोडून जाण्याचे आईने सांगितले. यामुळे उड्डाण पुलानजीकच्या हॉटेल जयस्वालच्या पुढे उभी असतांना मोटर सायकलवरुन तीन जण आले. त्यापैकी एकाने छेड काढली. तो आपल्याच गल्लीत राहणारा व भावाच्या ओळखीचा लुल्या उर्फ शरिफ शेख असल्याचे आपण ओळखले.
ते छेड काढत असतांनाच काकू व काका आले. त्यांच्यात वाद झाला. त्या तिघांनी काका-काकुला व नंतर आलेल्या माझ्या भावालाही मारहाण केली.
यासंदर्भात तिच्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलिसात चार जणांविरुध्द भादंवि 354 अ, ड, 504, 506, 420, 34 सह पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट अनेकांचे जीव घेत असतांना काही समाज कंटाकानी शहराचे वातावरण खराब करणयाचे काम केले आहे. ही घटना अत्यन्त दुर्दैवी असून भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचा शहराध्यक्ष असलेल्या निर्दोष व्यक्तीचा यात बळी गेला, याचे दुःख आहे. अशा घटना घडल्याने निश्चितच शहराची मान खाली घालायला लावणारी असून यातील दोषींना कडक शिक्षा व्हावी.
आ.जयकुमार रावल, दोंडाईचा
पोलीस निरिक्षकांची फिर्याद
युवतीची छेड काढल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेबद्दल निरिक्षिक ज्ञानेश्वर वारे यांनी स्वतःच फिर्याद दिली आहे.
यात म्हटल्यानुसार सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार लुल्या उर्फ शरिफ शेख सलिम शेख व इम्रान शेख सलिम शेख या दोघांना ताब्यात घेवून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन पुन्हा त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
मात्र रात्री 11 वाजेच्या सुमारास दीडशे ते दोनशे जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर चाल करुन शिवीगाळ, दमदाटी करीत अशांतता माजवली. तसेच ठाणे अंमलदार यांच्या कक्षात बसविलेल्या दोघांसंशयितांना जबरदस्तीने पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेवून गेलेत.
इतकेच नव्हे तर पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, हाताबुक्यांनी मारहाण केली. पोलीस ठाण्यावर अंदाधुंद दगडफेक करुन आम्हाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
सरकारी कामात अडथळा, गोंधळ, दगडफेक, साथरोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याने या सगळ्यांविरुध्द भादंवि 307, 353, 332, 333, 335, 143, 145, 147, 149, 269, 270, 271, 504 सह महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
जुबेर शेख मुशीर यांची फिर्याद
सामाजिक कार्यकर्ते जुबेर शेख मुशीर यांनी स्वतंत्र फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, पोलिसांनी मेहतर नगर मधील काही तरुणांना अटक केल्याची माहिती मिळाल्याने समाजातील व्यक्तींनी पोलीस ठाण्यात गर्दी केली.
दगडफेक केल्याचेही समजले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कादीर नूर मोहम्मद लोहार रा.अशोक नगर, हा जखमी झाला. त्याला पाहण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेलो असता तेथे समोरुन दीपजित महाजन, चेतन राजपूत, युवराज पहेलवान (वंदे पहिलवानचा मुलगा) व त्याच्यासोबत 15 ते 20 जणांचा जमाव हातात दांडके, हत्यार घेवून दगडफेक करीत येतांना दिसल्याने आपण तेथून जीव वाचवून पळालो.
मात्र शाहबाज शाह गुलाब शाह यास जीवे ठार मारल्याची बातमी पहाटे समजली. त्यानुसार आपण ही फिर्याद देत आहोत. जुबेर शेख यांच्या फिर्यादीनुसार संशयीतांविरुध्द भादंवि 302, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहबाज शाह गुलाब शाह हे सामाजिक कार्यकर्ते होते. मात्र जमावाच्या तावडीत सापडल्याने त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत करुन त्यांना जीवे मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींना तत्काळ अटकेची मागणीही केली आहे.